आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 लसीकरण
देवी आणि पोलिओनंतर आता कोविडची वेळ, कोविडच्या अंताची ही सुरवात : डॉ हर्ष वर्धन
कोविडवर विजय मिळवण्यासाठी या लसीचे संजीवनीप्रमाणे स्मरण केले जाईल
Posted On:
16 JAN 2021 11:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021
कोविड -19 लसीकरणाच्या जगातल्या सर्वात मोठ्या अभियानाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन नवी दिल्लीतल्या एम्स मध्ये डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासह आघाडीच्या कर्मचाऱ्यांसमवेत उपस्थित होते. कोरोना विरोधातल्या देशाच्या लढ्यात त्यांच्या निः स्वार्थ सेवा आणि कटीबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली.
वर्षापूर्वी सुरु झालेल्या या महामारीच्या अंताचा शेवट सुरु झाला असून या महामारीच्या व्यवस्थापनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरवातीपासूनच सहभागी असून कोविड लसीकरण सुरु करण्यासाठीच्या पाच महिन्याच्या कठोर मेहनतीची ही परिणती असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.
देवी आणि पोलिओनंतर आता कोविडची वेळ आहे. दुर्गम, नागरी भागातल्या झोपडपट्टी, आदिवासी विभाग अशा सर्व क्षेत्रांचा आजच्या कार्यक्रमात समावेश होता असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत डॉ हर्ष वर्धन यांनी यावेळी विस्ताराने माहिती दिली.
प्रभावी सांघिक कार्य आणि खंबीर राजकीय कटीबद्धता यांनी लसीकरणाचा पाया रचला असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान आणि आपल्या सहयोगी आरोग्य मंत्र्यासह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी टीम म्हणून काम करत इतिहास घडवला असे ते म्हणाले.
कोविडवर विजय मिळवण्यासाठी या लसीचे संजीवनीप्रमाणे स्मरण केले जाईल असे त्यांनी सांगितले. कोविड लसी बाबत अफवांना थारा देता कामा नये यावर त्यांनी भर दिला. अपप्रचाराला बळी न पडता विश्वासार्ह आणि सत्य माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
Jaydevi P.S/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689228)
Visitor Counter : 255