ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) 57 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे संबोधन


"पारदर्शक आणि सक्रिय दृष्टिकोनातून कार्य करत एफसीआय देशातील शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनून या व्यवस्थेला मदत करेल." गोयल यांचे प्रतिपादन

शेतकरी व ग्राहकांना कार्यक्षम, पारदर्शक व जबाबदार सेवा देण्यावर भर

एफसीआय शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करीत आहे आणि त्यांना एमएसपीच्या माध्यमातून पुरेशा खरेदीचा विश्वास देत आहे

Posted On: 15 JAN 2021 4:24PM by PIB Mumbai

 

केन्द्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 14 जानेवारी 2021 रोजी एफसीआयच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय कार्यालय, म्हैसुरूच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केले.

यावेळी मंत्री महोदयांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भारतीय अन्न महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना संबोधित केले. कोविड - 19 महामारीच्या काळात देशातील सर्व जनतेचा त्रास सुसह्य करण्यासाठी देशातील अंदाजे 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या एफसीआयच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. ही संघटना फक्त सरकारी आस्थापना नसून देशाच्या आणि विशेषकरुन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

महामारी दरम्यान एफसीआयने सुमारे 140 एलएमटी (लाख मेट्रिक टन) धान आणि 390 एलएमटी गहू खरेदी केला तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेएआय) 305 एलएमटी अतिरिक्त धान्य मोफत पुरविण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा पीएमजीकेएआयचे थर्ड पार्टीमार्फत लेखापरीक्षण करण्यात आले तेव्हा 94% समाधानकारक अहवाल होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात टाळेबंदी दरम्यान, अन्न आणि सर्व आवश्यक उत्पादने प्रत्येक व्यक्तीस उपलब्ध करुन देण्यात आल्या, हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे असे पीयूष गोयल यांनी आपल्या संबोधनात नमूद केले.

खरेदी केंद्राच्या संख्येत 50% वाढ झाल्याने शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन कार्यक्षम व सोयीस्करपणे विकण्यास झालेली मदत आणि यापूर्वी शेतकर्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समिती गाठण्यासाठी करावा लागणारा लांब पल्ल्याचा प्रवास या गोष्टींवरही मंत्र्यांनी प्रकाश टाकला.

खरेदी प्रक्रियेतील एफसीआयच्या भूमिकेबाबतही मंत्री महोदयांनी प्रकाश टाकला आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किमान समर्थन मूल्य एमएसपीमार्फत खरेदी बळकट करण्याबाबत त्यांनी मत मांडले. एफसीआय शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करीत आहे आणि त्यांना एमएसपीच्या माध्यमातून पुरेशा खरेदीचा विश्वास देत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर करण्यासाठी एफसीआय सातत्याने कार्यरत आहे.

पारदर्शक आणि सक्रिय दृष्टिकोनातून कार्य करून एफसीआय देशातील शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनून या व्यवस्थेला मदत करेल असे ते म्हणाले. शेतकरी, ग्राहक आणि इतर हितसंबंधितांना विशेषत: देशातील अल्पभूधारकांपर्यंत कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदार सेवा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून भविष्यात देशसेवेसाठी सज्ज राहण्यासाठी त्यांनी एफसीआयला प्रोत्साहित केले. नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करताना, नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा अवलंब करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. एफसीआय देशाची सेवा करण्यासाठी स्वत: साठी सर्वोच्च मापदंड ठरवेल. एफसीआयच्या परिवर्तनात्मक सुधारणा शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशभरात सुरू असलेल्या सण-उत्सवांसाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688810) Visitor Counter : 202