आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी आत्मनिर्भर भारत-स्वतंत्र भारत या संकल्पनेवरील वेबिनारला संबोधित केले; कोविड महामारी दरम्यान विकसित उल्लेखनीय स्वदेशी तंत्रज्ञान अधोरेखित केले

"आत्मनिर्भर भारत हा आमच्या सरकारच्या लक्षित क्षेत्रांपैकी एक केंद्रबिंदू बनला आहे ज्याच्या सभोवती सर्व आर्थिक धोरणे आखली जात आहेत": डॉ हर्ष वर्धन

“आपण ज्या पद्धतीने किल्ला लढवला आणि कोविड संबंधित मृत्यू दर सर्वात कमी पातळीवर ठेवला त्याबद्दल जगभरात भारताचे कौतुक होत आहे” आज आपला मृत्यु दर 1.44 टक्के आहे : डॉ हर्ष वर्धन

Posted On: 14 JAN 2021 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021


केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भू विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवरील वेबिनारला संबोधित केले. वेदांतच्या सहकार्याने स्वराज्य या माध्यम संघटनेने या वेबिनारचे आयोजन केले होते.  वेबिनारला संबोधित करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "आत्मनिर्भर भारत हा आमच्या सरकारच्या लक्षित क्षेत्रांपैकी एक केंद्रबिंदू बनला आहे ज्याच्या सभोवती सर्व आर्थिक धोरणे आखली जात आहेत.  आमचे सरकार श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी दूर करण्यावर आणि  सर्व भारतीय नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जो अंत्योदयाचा  खरा अर्थ आहे ."

कोविड महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा उल्लेख करताना ते  म्हणाले, “जैव तंत्रज्ञान विभागाने लस निर्मिती व संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रगतीला  पाठिंबा देण्यात उल्लेखनीय कार्य केले. “मिशन कोविड सुरक्षा - भारतीय कोविड -19 लस विकास मिशन” च्या अंतर्गत आम्ही प्री-क्लिनिकल डेव्हलपमेंट, क्लिनिकल चाचण्या, उत्पादन आणि तैनातीसाठी नियामक सुलभतेच्या आधारे  लस विकसित करण्याची  गती वाढवली.

“लसीकरणासाठी लोकसंख्येच्या प्राधान्यक्रमाबाबत देखरेख व निर्णय घेण्यासाठी, तसेच लसीकरण प्रक्रियेचा मागोवा घेण्यासह लस पुरवठा संदर्भात पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली“ लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला. कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या वितरणासाठी स्वदेशी विकसित को-विन: हा  डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील विकसित करण्यात आला आहे. ” असे ते म्हणाले. 

“कोविड-19 लसीकरण मोहीमही‘ मेक इन इंडिया’ प्रेरित आहे आणि भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या दोन्ही लस देशातच विकसित करण्यात आल्या आहेत.  आम्ही देशभरात शीतगृह साखळीचे मूल्यांकन  देखील केले आहे आणि यासाठी आवश्यक उपकरणे शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहचतील हे सुनिश्चित करण्यासाठी निरंतर  क्षमता वाढवत आहोत. " असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. 

ते म्हणाले की, “लस, निदान आणि उपचार क्षेत्रातील जवळपास 120 प्रकल्पांना पाठिंबा देऊन महामारीचा  प्रतिकार करण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि बीआयआरएसी गेल्या दहा महिन्यांपासून अथक प्रयत्न करत आहेत.

तसेच डीबीटी जवळपास 15 लसीच्या विकासाला मदत करत आहे. यापैकी तीन  लसी  क्लिनिकल चाचणी  अवस्थेत आहेत आणि जवळपास दोन लसी प्रगत-प्रि - क्लिनिकल विकास टप्प्यात आहेत ”असे त्यांनी स्पष्ट केले.

“सुमारे 2000 सार्स -सीओव्ही -2 व्हायरल जीनोमचे सिक्वेन्सिंग आणि विश्लेषण करून सीएसआयआर प्रयोगशाळेने  विषाणूचा प्रसार  समजून घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

“सीएसआयआरने विशिष्ट औषधांच्या अभावी कोविड -19 उपचारांसाठी पुनरुत्पादित औषधांच्या विकासालाही प्राधान्य दिले आहे. सीएसआयआरने रेमदेसिव्हिर आणि फवीपिरावीर सारख्या पुनर्प्राप्त औषधांसाठी प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केले आणि तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित केले. सीएसआयआर च्या परवानाप्राप्त  तंत्रज्ञानाच्या आधारे, सिप्लाने किफायतशीर फवीपिरावीर बाजारात आणले . केवळ दहा महिन्यांत सर्व काही करण्यात आले अशा शब्दात त्यांनी या प्रयत्नांची प्रशंसा केली.  सीएसआयआर आणि इतर विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळांनी  कोविडविरोधी  लढाईत उल्लेखनीय  कामगिरी केली असे ते म्हणाले.

महामारीच्या काळात आपण ज्या पद्धतीने  किल्ला लढवला  आणि कोविड संबंधित मृत्यू दर सर्वात कमी पातळीवर ठेवला त्याबद्दल जगभरात भारताचे कौतुक होत आहे.  आजही आपला मृत्यूदर  1.44 टक्क्यांवर स्थिर आहे असे ते म्हणाले.

"स्वावलंबी बनण्यासाठी लोकांना अधिक जागरूक करण्याची गरज आहे. एकदा त्यांना हे समजले की ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात , की मग त्यांना ऊर्जा मिळेल.  ही वेबिनार मालिका हे त्या योग्य दिशेने एक पाऊल आहे ” असे ते म्हणाले.  

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1688680) Visitor Counter : 91