मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झा संदर्भात देशातील सद्यस्थिती
Posted On:
14 JAN 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
14 जानेवारी 2021 ला एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झाच्या काही प्रकरणांची पुष्टी झाली असून गुजरातमधील डांग जिल्ह्यात कावळ्यांमध्ये एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झाचा संसर्ग आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात संसर्ग झालेले पक्षी नष्ट करण्याचे काम पूर्ण होऊन निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
हरियाणामध्ये 4 कुक्कूटपालन केंद्रांमध्ये एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झाचा (H5N8) प्रादुर्भाव आढळून आल्याची पुष्टी झाली आहे. ही केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. खतौलीमधील महाराजा पोल्ट्री फार्म, मौली या पंचकूला जिल्ह्यातील तारा पोल्ट्री फार्म, बतौर आणि सिंगला पोल्ट्री फार्म.
देशातील प्रादुर्भाव आढळलेल्या विभागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके संसर्ग आढळलेल्या जागी भेट देऊन रोगनिदानविषयक अभ्यासाच्या दृष्टीने पाहणी करतील. दुग्धविकास आणि पशुपालन विभागाने संसर्गाची शंका असलेले नमुने त्वरित रोगनिदान चाचण्यांसाठी विशिष्ट रोगनिदान प्रयोगशाळेत नेता यावेत म्हणून त्यांच्या वाहतुकीसाठी केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे.
इतर राज्यांमधून होणाऱ्या पोल्ट्री तसेच पोल्ट्री उत्पादनांच्या पुरवठ्यावर काही राज्ये बंदी घालत आहेत. अश्याने कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्यामुळे या प्रकारचे धोरण टाळावे असे सुचवण्यात आले आहे. याशिवाय प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये या विषाणूंच्या प्रादुर्भावाला पुष्टी देणारा कोणताही वैज्ञानिक अहवाल नाही. उत्तम रीतीने शिजवले गेलेले चिकन आणि अंडी यामुळे माणसांना कुठलाही धोका नाही असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे
वृत्तपत्रे, जाहीराती, समाजमाध्यमे अश्या विविध मंचांच्या माध्यमातून राज्यांनी जनतेमध्ये जागृती करावी. याशिवाय एव्हिअन एन्फ्ल्यूएन्झाचा संसर्गाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व संसर्गाच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील माहिती ट्विटर, फेसबुक अश्या समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोचवावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688666)
Visitor Counter : 148