कोळसा मंत्रालय

नाल्को, कंपनीच्या विस्तार आणि फेरबदल योजनेवर आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार: प्रल्हाद जोशी

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2021 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

 

नाल्को, कंपनीच्या विस्तार आणि फेरबदल योजनेवर आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत सुमारे 30000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा आणि खाणी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.  जोशी आज नाल्कोच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त भुवनेश्वर येथील कंपनीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या प्रस्तावित गुंतवणूकीपैकी कंपनी 5 वी स्ट्रीम रिफायनरी, पोतांगी बॉक्साइट खाणी, दक्षिण ब्लॉक आणि उत्कल डी आणि ई कोळसा खाणींमधून बॉक्साइटच्या वाहतूक व्यवस्थेसाठी 7000 कोटी रुपये खर्च करणार आहे. उर्वरित 22,000 कोटी रुपये स्मेल्टर आणि कॅप्टिव्ह पॉवर प्लांटच्या  (सीपीपी) विस्तारावर खर्च केले जातील, यामध्ये ओदिशामधील अंगुल जिल्ह्यातील कंपनीच्या स्मेलटर प्लांटच्या विस्तारासह 1400 मेगावॅट फीडर सीपीपीच्या बांधकामाचा समावेश देखील आहे.

भविष्यकाळातील नाल्कोच्या महत्वाकांक्षी विकासाच्या योजनांमुळे ते अ‍ॅल्युमिना आणि अ‍ॅल्युमिनियम क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, परिणामी या दोन्ही धातूंच्या उत्पादनात व वापरामध्ये अनेक पटीने सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य होईल, असे जोशी म्हणाले.

जोशी म्हणाले की, देशातील खनिज उत्पादनांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकार खनिज समृद्ध राज्य ओदिशाला सर्वतोपरी सहाय्य देत आहे.

ओदिशामधील लोहाचे उत्पादन जलद गतीने करण्यासाठी आम्ही ओडिशा मिनरल कॉर्पोरेशनला 02 लोह खनिज ब्लॉक व ओडिशा मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडला 01 ब्लॉक देण्याचा प्रस्ताव मंजूर केले आहेत, " असे जोशी म्हणाले.

ओदिशा मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएमईसीएल) आणि मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल) यांच्यात ओएमईसीएलच्या खनिज ब्लॉकच्या संशोधनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.  विस्तृत सर्वेक्षण आणि संशोधनाद्वारे राज्यातील संभाव्य खनिज क्षमतांचा शोध घेतला जाईल.

ओदिशामधील सहायक उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी नाल्को, अंगुलमध्ये त्याच्या स्मेल्टर प्लांटच्या जवळच, जागतिक स्तरावरील अल्युमिनियम पार्क स्थापित करीत आहे. यामुळे या क्षेत्रात रोजगार वृद्धिंगत होऊन  स्थानिक उद्योजकतेला चालना मिळेल असे जोशी म्हणाले. 

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1686783) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Odia , Tamil