अर्थ मंत्रालय

आंध्र प्रदेशातील राज्य महामार्ग आणि जिल्ह्यांतील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी भारत सरकार आणि एनडीबी यांच्यात 646 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाचे दोन करार

Posted On: 06 JAN 2021 6:06PM by PIB Mumbai

 

भारत सरकार, आंध्र प्रदेश सरकार आणि एनडीबी अर्थात नव विकास बँक यांनी आज प्रत्येकी 323 दशलक्ष डॉलर्सच्या दोन प्रकल्पांसाठीच्या कर्जविषयक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यातील पहिला प्रकल्प, आंध्र प्रदेश रस्ते आणि पुलांची पुनर्निर्मिती हा असून त्यात 1600 किमीच्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करून दुपदरी मार्ग निर्माण करणे आणि राज्य महामार्गावरील मोडकळीस आलेल्या पुलांचे पुनर्निर्माण या कामांचा समावेश आहे. दुसरा प्रकल्प म्हणजे आंध्र प्रदेश तालुका संपर्क आणि ग्रामीण संपर्क सुधारणा प्रकल्प आहे.यामध्ये 1400 किमी लांबीच्या जिल्ह्यांतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण तसेच दुपदरीकरण करणे आणि या रस्त्यांवरील जुन्या झालेल्या पुलांचे नव्याने बांधकाम करणे यांचा समावेश आहे. रस्ते आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून आंध्र प्रदेश सरकार या प्रकल्पांची अंमलबजावणी करणार आहे.

या दोन प्रकल्पांचे काम झाल्यानंतर, प्रवाशांचे सामाजिक तसेच आर्थिक केंद्राकडे आवागमन आणि संपर्क सुधारेल, वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढेल, रस्ते सुरक्षा आणि प्रवासाच्या दर्जात सुधारणा होईल तसेच राज्यातील रस्ते वापरणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या ऋतुंमध्ये सुलभ प्रवासाची हमी मिळेल. या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर,रस्त्यांची क्षमता प्रतिदिन 15,000 प्रवासी वाहने वाढेल आणि वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात टळेल अशी अपेक्षा आहे.

ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांदरम्यान 15 जुलै 2014 ला झालेल्या आंतर-सरकारी करारानुसार एनडीबीची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिक्स देशांमध्ये तसेच इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था तसेच विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करून देणे हा एनडीबीच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.

या कर्जाचा कालावधी 32 वर्ष असून त्यात 5 वर्षांच्या स्थगन कालावधीचा समावेश आहे.

*****

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686577) Visitor Counter : 147