मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्यावतीने ‘कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ जाहीर
Posted On:
05 JAN 2021 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2021
देशभरातल्या सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कामधेनू अध्यक्ष, कामधेनू अभ्यास केंद्र किंवा कामधेनू संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आल्याबद्दल देशात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. स्वदेशी गाईंच्या महत्वाविषयी, या गाईंमध्ये असलेल्या मौल्यवान गुणधर्माविषयी जन जागृती करण्यासाठी तरूण विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत गाईंची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाने गौविज्ञानाविषयी अभ्यास सामुग्री तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यावर आधारित कामधेनू गौविज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे भारतीयांच्या मनात देशी गाईच्या उपयोगितेविषयी जागरूकता, कुतूहल निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. गाईंनी दूध देणे बंद केल्यानंतरही गाईची उपयोगिता खूप असते. त्यातून संभाव्य व्यवसाय करण्याच्या संधीही सर्वांना माहिती होवू शकणार आहेत.
कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा देशभरामध्ये दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या प्रस्तावित परीक्षेचा तपशील लवकरच kamdhenu.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा चार वर्गामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये
- प्राथमिक स्तर - इयत्ता 8वी पर्यंत
- माध्यमिक स्तर - इयत्ता 9वी ते 12 वी पर्यंत
- महाविद्यालयीन स्तर - इयत्ता 12 वी च्यापुढे
- सर्व सामान्य नागरिकांसाठी
कामधेनू विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा 100 गुणांची असून हिंदी, इंग्लिश आणि 12 प्रादेशिक भाषांतून असणार आहे. या परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. विचारण्यात आलेल्या वस्तूनिष्ठ प्रश्नांना पर्यायी उत्तरातून योग्य उत्तराला खूण करायची (एमसीक्यू) आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या संकेतस्थळावर सर्व परीक्षा सामुग्री, अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉग, व्हिडिओ आणि इतर वाचन सामुग्रीही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी “kamdhenu.gov.in” या राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या संकेतस्थळावर दुवा उपलब्ध आहे.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
Follow us on social media: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686355)
Visitor Counter : 379