अर्थ मंत्रालय
पश्चिम बंगालमधील जलमार्गांची सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेबरोबर 105 दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षरी
Posted On:
05 JAN 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2021
पश्चिम बंगालमधल्या कोलकातामध्ये अंतर्गत जलवाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकार आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि जागतिक बँक यांच्यामध्ये 105 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पासाठी स्वाक्षरी करण्यात आल्या.
पश्चिम बंगालमध्ये वाहतुकीसाठी जलमार्ग विकसित करणे तसेच प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी हुगली नदीपात्राचा जलमार्ग म्हणून वापर केल्यास कोलकाता महानगर परिसरातल्या रहिवाशांच्या जीवनमानात कमालीची सुधारणा होऊ शकणार आहे. राज्याचा विविध क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वांना वाहतुकीच्या उन्नत सुविधा उपलब्ध होण्यासाठी या निधीतून कार्य करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापर अतिशय सुविधाजनक आणि सर्वांना परवडणारा त्याचबरोबर पर्यावरण स्नेही पर्याय ठरणार आहे, असे मत वित्त मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. सी.एस. मोहापात्रा यांनी व्यक्त केले आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम बंगालमध्ये नदीपात्रात वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे; कोलकाता महानगर क्षेत्रातील बाजारपेठ आणि रोजगार केंद्र यांना जोडणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. यामुळे राज्याचा आर्थिक विकास साधण्यास मदत होणार आहे, असेही मोहापात्रा यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पासाठी आयबीआरडी म्हणजे आंतरराष्ट्रीय पुननिर्माण आणि विकास बँकेकडून 105 दशलक्ष डॉलरचे कर्ज घेण्यात आले असून त्याची वैधता 17 वर्षे आहे. यामध्ये सात वर्षाच्या सवलतीच्या कालावधीचाही समावेश आहे.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686338)
Visitor Counter : 278