पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 04 JAN 2021 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

केन्द्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर हर्षवर्धन , प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर विजय राघवन , सीएसआयआरचे प्रमुख डॉक्टर शेखर सी. मांडे  , विज्ञान जगतातील सर्व मान्यवर, स्त्री आणि पुरुषगण !

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा . आज आपले वैज्ञानिक ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’ आणि ‘भारतीय निर्देशक द्राव्य  प्रणाली' राष्ट्राला समर्पित करत आहेत आणि त्याचबरोबर देशाच्या पहिल्या राष्ट्रीय पर्यावरणीय मानक  प्रयोगशाळेची पायाभरणी देखील झाली आहे. नव्या दशकात हे शुभारंभ, देशाचा गौरव वाढवणार आहेत.

मित्रानो,

नवीन वर्ष आपल्याबरोबर आणखी एक मोठे यश घेऊन आले आहे. भारताच्या वैज्ञानिकानी एक नाही तर दोन-दोन स्वदेशी  कोविड लस विकसित करण्यात यश मिळवले आहे. भारतात जगातील सर्वात मोठा कोविड लसीकरण कार्यक्रम सुरु होणार आहे . यासाठी देशाला आपल्या वैज्ञानिकांच्या योगदानाचा खूप अभिमान वाटतो , प्रत्येक नागरिक सर्व वैज्ञानिकांचा, तंत्रज्ञांचा आभारी आहे.

मित्रानो,

आज त्या काळाचे देखील स्मरण करण्याचा दिवस आहे जेव्हा आपल्या  वैज्ञानिक संस्था , तुम्ही सर्वजण कोरोनाचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्याच्या कामात दिवसरात्र झटत होतात. सीएसआयआर सह अन्य संस्थानी एकत्र येऊन प्रत्येक आव्हानाचा सामना केला, नवनवीन  परिस्थितींवर उपाय शोधले. तुमच्या याच समर्पणामुळे आज देशात आपल्या या  वैज्ञानिक संस्थाप्रति जागरूकता आणि आदराची एक नवी भावना निर्माण झाली आहे. आपले युवक आज CSIR सारख्या संस्थांबाबत आणखी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच मला वाटते की  CSIR च्या वैज्ञानिकानी देशातील जास्तीत जास्त शाळांबरोबर, विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर संवाद साधावा. कोरोना काळातील आपले अनुभव आणि या संशोधन क्षेत्रातील कार्याबाबत नवीन पिढीला माहिती द्यावी. यामुळे आगामी काळात तुम्हाला युवा वैज्ञानिकांची नवीन पिढी तयार करण्यात आणि त्यांना प्रेरित करण्यात मोठी मदत होईल.

मित्रानो,

थोड्या वेळापूर्वी साडेसात दशकांतील तुमच्या कामगिरीचा इथे उल्लेख झाला. इतक्या वर्षांमध्ये या संस्थेच्या अनेक  महान विभूतींनी देशाची सर्वोत्तम सेवा केली आहे. इथल्या संशोधनाने देशाचा मार्ग  प्रशस्त केला आहे. CSIR NPL ने देशाच्या विकासाच्या वैज्ञानिक उत्क्रांती आणि मूल्यमापनात आपली महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. गतवर्षांमधील कामगिरी आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आज इथे परिषदेचे आयोजन केले आहे.

तुम्ही मागे वळून पाहिले तर जाणवेल की या संस्थांची स्थापना  गुलामगिरीतून बाहेर आलेल्या भारताच्या नवनिर्माणासाठी करण्यात आली होती. काळाच्या ओघात तुमच्या भूमिकेत आणखी  विस्तार झाला आहे. आता देशासमोर नवीन उद्दिष्टे आहेत, नवीन ध्येय देखील आहेत.  देश वर्ष 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे, वर्ष 2047 मध्ये आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील. या काळात आपल्याला आत्मनिर्भर भारताचे नवीन संकल्प ध्यानात ठेवून नवीन मानके, नवीन निकष साकारण्याचा दिशेने पुढे जायचे आहे.

मित्रानो,

CSIR-NPL तर एकप्रकारे भारताचा वेळेचा पालक आहे. म्हणजे भारताच्या वेळेवर देखरेख, व्यवस्था तुमची जबाबदारी आहे. जर वेळेची जबाबदारी तुमची आहे तर कालानुरूप बदल देखील  तुमच्यापासूनच सुरु होतील. नवीन काळाचे, नवीन भविष्याचे निर्माण देखील तुमच्याकडूनच दिशा मिळवेल.

मित्रानो,

आपला देश अनेक दशके दर्जा आणि मोजमाप यासाठी परदेशी मानकांवरच अवलंबून राहिला आहे. मात्र या दशकात भारताला आपल्या मानकांना नवी उंचीवर न्यावे लागेल. या दशकात भारताची गति, भारताची प्रगती, भारताचे  उत्थान, भारताची प्रतिमा, भारताचे सामर्थ्य, आपली क्षमता निर्मिती आपल्या मानकांद्वारेच ठरवली जाईल. आपल्या देशात सरकारी क्षेत्रातील किंवा खासगी क्षेत्रातील सेवांचा दर्जा असेल, देशातील उत्पादनांचा दर्जा असेल,मग ती सरकारने बनवलेली असतील किंवा खासगी क्षेत्राने, आपली गुणवत्ता मानकेच हे निश्चित करतील की जगात भारत आणि भारतीय उत्पादनांची ताकद किती जास्त वाढेल.

मित्रानो,

ही  Metrology,सर्वसाधारण सोप्या भाषेत सांगायचे तर मोजमाप करण्याचे शास्त्र, हे कोणत्याही वैज्ञानिक उपलब्धिसाठी देखील  पाया म्हणून कार्य करते.  मोज-मापन  केल्याशिवाय कोणतेही संशोधन पुढे जाऊ शकत नाही. इथपर्यंत कि आपल्याला आपल्या कामगिरीचे देखील कुठल्या ना कुठल्या मोजपट्टीवर मूल्यमापन करावेच लागते. म्हणूनच मापनशास्त्र हा आधुनिकतेचा पाया आहे. तुमची कार्यपद्धती जितकी चांगली असेल आणि ज्या देशाचे मापनशास्त्र  जितके विश्वासार्ह असेल तितकी त्या देशाची विश्वासार्हताही जास्त असते. मेट्रोलॉजी आपल्यासाठी आरशाप्रमाणे असते.

जगात आपल्या उत्पादनांना काय स्थान आहे , आपल्याला कोणत्या सुधारणा करायला हव्यात हे आत्मपरीक्षण मापनशास्त्रामुळे तर शक्य होते.

म्हणूनच आज जेव्हा देश आत्मनिर्भर भारत अभियानाचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत आहे तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला हवे  कि याचे उद्दिष्ट संख्यात्मक देखील आहे आणि त्याचबरोबर दर्जा देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. म्हणजे संख्याही वाढेल आणि त्याचबरोबर गुणवत्ताही वाढेल.  आपल्याला जग केवळ  भारतीय उत्पादनांनी भरायचे नाही, ढीग उभा करायचा नाही. आपल्याला भारतीय उत्पादने खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचे मन देखील जिंकायचे आहे आणि जगातील कानाकोपऱ्यात सर्वांचे मन जिंकायचे आहे. मेड इन इंडियाची केवळ जागतिक मागणी नको तर जागतिक स्वीकारार्हता देखील आपण सुनिश्चित करायची आहे. आपल्याला ब्रँड इंडियाला दर्जा, विश्वासार्हतेच्या मजबूत स्तंभांवर अधिक बळकट करायचे आहे.

मला आनंद आहे की भारत आता या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आज भारत जगातील त्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे दिशादर्शक प्रणाली आहे. नाविक द्वारे भारताने हे यश संपादन करून दाखवले आहे. आज या दिशेने आणखी एक मोठे पाऊल पुढे टाकले गेले आहे. आज ज्या भारतीय निर्देशक द्रव्यचे लोकार्पण करण्यात आले आहे ते आपल्या उद्योग जगताला दर्जेदार उत्पादने बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल. आता अन्नधान्य, खाद्यतेले, खनिजे, अवजड धातू , कीटकनाशके, औषधनिर्मिती आणि वस्त्रोद्योग सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आपली  'प्रमाणित रेफरेंस मटिरियल प्रणाली ' मज़बूत करण्याच्या दिशेने आपण वेगाने पुढे जात आहोत. आता आपण त्या स्थितीकडे जात आहोत जिथे उद्योग नियमन केंद्री दृष्टिकोनाऐवजी ग्राहक केंद्री दृष्टिकोनाकडे वळेल. या नवीन मानकांमुळे  देशभरातील जिल्ह्यांमध्ये तिथल्या स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख देण्याचे अभियान आहेत्याला खूप लाभ होईल. यामुळे आपल्या एमएसएमई क्षेत्राला  विशेष लाभ होईल. कारण बाहेरच्या ज्या मोठ्या उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत , त्यांना इथेच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्थानिक पुरवठा साखळी मिळेल. सर्वात मोठी गोष्ट, नव्या मानकांमुळे निर्यात आणि आयात , दोन्हीचा दर्जा सुनिश्चित होईल. यामुळे भारताच्या सामान्य ग्राहकांना देखील चांगले सामान मिळेल, निर्यातदारांच्या समस्या देखील कमी होतील. म्हणजेच आपले उत्पादन, आपल्या वस्तूंचा दर्जा जितका चांगला असेल तेवढेच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.

मित्रानो,

भूतकाळापासून  वर्तमानापर्यंत कधीही पहा, ज्या देशाने विज्ञानाला जितके पुढे नेले आहे , तो देश तेवढाच पुढे गेला आहे. हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगाचे मूल्यनिर्मिती चक्र आहे . विज्ञानातून एखादा शोध लागतो तेव्हा त्याच्याच प्रकाशात तंत्रज्ञान विकसित होते आणि तंत्रज्ञानातून उद्योग उभा राहतो, नवीन उत्पादने तयार होतात, नव्या वस्तू तयार होतात.उद्योग पुन्हा नव्या संशोधनासाठी विज्ञानात गुंतवणूक करतो. आणि हे चक्र नव्या संधींच्या दिशेने पुढे जात राहते.  CSIR NPL ने भारताच्या या मूल्य चक्राला पुढे नेण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. आज जेव्हा देश आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट घेऊन पुढे जात आहे तेव्हा विज्ञानातून मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या या मूल्य निर्मिती चक्राचे महत्व आणखी वाढते.  म्हणूनच  CSIR ला यात मोठी भूमिका पार पाडावी लागेल.

मित्रांनो,

सीएसआयआरच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने आज जी राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका देशाकडे सोपवली आहे, त्यामुळे भारत नॅनो सेकंद म्हणजेच एका सेकंदाच्या एक अब्जाव्या भागाचे मोजमाप करण्यामध्ये आत्मनिर्भर बनला आहे. 2.8 नॅनो सेकंदाची अचूकता प्राप्त करणे म्हणजेच एक खूप मोठे सामर्थ्य आहे. आता आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेसोबत भारतीय प्रमाणवेळ 3 नॅनोसेकंदांपेक्षाही कमी इतक्या अचूक पातळीने ताळमेळ राखत आहे. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्रोसारख्या जितक्या संस्था आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. यामुळे बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, टेलिकॉम, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानामध्ये खूपच मदत होणार आहे. केवळ इतकेच नाही सध्या आपण ज्या इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या चर्चा करत आहोत, त्या इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोसाठी देखील भारताची भूमिका बळकट होणार आहे.

मित्रांनो,

आज भारत पर्यावरणाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, हवेची गुणवत्ता आणि उत्सर्जनाचे मोजमाप करण्याच्या तंत्रज्ञानापासून साधनांपर्यंत आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आज यामध्ये देखील आत्मनिर्भर बनण्यासाठी आपण एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे भारतात प्रदूषणाला तोंड देण्यासाठी अधिक स्वस्त आणि प्रभावी प्रणाली विकसित होतील. त्याचबरोबर हवेची गुणवत्ता आणि उत्सर्जनाशी संबंधित तंत्रज्ञानाच्या जागतिक बाजारपेठेत भारताच्या भागीदारीतही वाढ होईल. आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे भारत आज ही कामगिरी करत आहे.

मित्रांनो,

कोणत्याही प्रगतीशील समाजात संशोधनाचे एक स्वयंस्फूर्त स्वरुप असते आणि स्वयंस्फूर्त प्रक्रिया देखील असते. संशोधनाचे प्रभाव व्यावसायिक असतात, सामाजिक असतात आणि संशोधन आपले ज्ञान, आपले आकलन वाढवण्यामध्ये देखील उपयोगी ठरते. अनेकदा संशोधन करताना कोणालाही हे माहीत नसते की अंतिम उद्दिष्टा व्यतिरिक्त हे संशोधन कोणत्या दिशेला जाईल, भावी काळात त्याचा आणखी कोणत्या प्रकारे उपयोग होईल. पण एक मात्र नक्की आहे की संशोधन, ज्ञानाचा नवा अध्याय कधीही वाया जात नाही. आपल्याकडे शास्त्रांमध्ये ज्या प्रकारे सांगितले गेले आहे की आत्मा कधीही मरत नाही, मला असे वाटते की संशोधन कधीही मरत नाही. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, अनुवंशशास्त्राचे प्रणेते मेंडल यांच्या कार्याची ओळख कधी निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूनंतर, निकोला टेस्ला यांच्या कार्याची महती देखील अनेक वर्षांनी जगाने पूर्णपणे लक्षात घेतली. अनेकदा आपण ज्या दिशेने, ज्या उद्देशाने संशोधन करत असतो, ते उद्दिष्ट साध्य होत नाही. पण तेच संशोधन इतर कोणत्या तरी क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारे ठरते. अगदी उदाहरणच घ्यायचे झाले तर जगदीशचंद्र बोस यांनी कोलकात्याच्या प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये मायक्रोवेवचा सिद्धांत मांडला. त्याचा व्यावसायिक वापर करण्याच्या दिशेने सर बोस यांनी काम केले नाही. पण आज रेडियो कम्युनिकेशन प्रणाली त्याच सिद्धांतावर आधारित आहे. महायुद्धाच्या वेळी जे संशोधन युद्धासाठी करण्यात आले, सैनिकांचा बचाव करण्यासाठी करण्यात आले, त्या संशोधनाने नंतर वेगळ्याच क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली. युद्धामध्ये वापर करण्यासाठी ड्रोन तयार करण्यात आले होते. पण आज ड्रोन्समुळे छायाचित्रण केले जात आहे, सामानाची डिलिवरी केली जात आहे. म्हणूनच आज आपले शास्त्रज्ञ विशेषतः तरुण शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या अकल्पित वापराची प्रत्येक शक्यता पडताळून पाहिली पाहिजे. आपल्या क्षेत्राच्या बाहेर आपल्या संशोधनाचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो, याचा विचार नेहमी करत राहिले पाहिजे.

मित्रांनो,

तुमचे लहानसे संशोधन कशा प्रकारे जगाचे भवितव्य बदलू शकते, याची जगात अनेक उदाहरणे आहेत. अगदी विजेचेच उदाहरण घेतले तर आज आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट नाही, कोणताही पैलू नाही, ज्यामध्ये विजेशिवाय काही चालू शकेल. वाहतूक असेल, दळणवळण असेल, उद्योग असतील किंवा दैनंदिन जीवन असेल. प्रत्येक गोष्टीचा संबंध विजेशी आहे. एका सेमी कंडक्टरच्या शोधामुळे जग इतके बदलले आहे. एका डिजिटल क्रांतीने आपले जीवन किती समृद्ध केले आहे. अशा अनेक शक्यता आहेत ज्या या नव्या भविष्यकाळात आपल्या युवा संशोधकांसमोर निर्माण झाल्या आहेत. येणारा भविष्यकाळ आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. गेल्या सहा वर्षात देशाने यासाठी नव्याने भविष्यासाठी सज्ज असलेली प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने काम केले आहे.

आज भारत जागतिक नवोन्मेषाच्या क्रमवारीत जगातील आघाडीच्या 50 देशांच्या पंक्तीत दाखल झाला आहे. देशात आज मूलभूत संशोधनावर भर दिला जात आहे आणि विविध देशांच्या संशोधकांकडून होणाऱ्या विज्ञान मूल्यमापन आणि अभियांत्रिकी प्रकाशनांच्या संख्येमध्ये आज भारत जगातील आघाडीच्या तीन देशांमध्ये आहे. आज भारतात उद्योग आणि संस्थांदरम्यानचे सहकार्य देखील अतिशय बळकट केले जात आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्या देखील भारतात आपली संशोधन केंद्रे आणि सुविधा यांची उभारणी  करत आहेत. गेल्या काही वर्षात या सुविधा केंद्रांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

म्हणूनच मित्रांनो,

आज भारतीय युवकांकडे संशोधन आणि नवोन्मेषाच्या अपार शक्यता आहेत. आज आपल्यासाठी नवनिर्मितीकारक वृत्ती जितकी अत्यावश्यक आहे तितकेच महत्त्वाचे आहे ते म्हणजे या नवोन्मेषाचे संस्थात्मक रुपांतरण. हे कसे होऊ शकते. आपल्या बौद्धिक संपदेचे रक्षण कसे करायचे हे देखील आजच्या युवकांनी शिकले पाहिजे. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपली जितकी पेटण्ट्स असतील, तितका आपल्या या पेटण्ट्सचा वापर होईल. जितक्या जास्त क्षेत्रात आपले संशोधन नेतृत्व करेल तितकी जास्त आपली ओळख निर्माण होईल. तितक्याच प्रमाणात आपला ब्रँड इंडिया बळकट होईल. आपण सर्वांनी ‘कर्मण्ये-वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या मंत्रापासून उर्जा घेऊन या कामात गुंतले पाहिजे आणि या मंत्राचा सर्वात जास्त अंगिकार जर कोणी केला असेल तर तो आपल्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांची नेहमीच अशी वृत्ती असते आणि ते एखाद्या ऋषीप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेमध्ये तपश्चर्या करत राहातात. ‘कर्मण्ये-वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ कर्म करत राहा, फळ मिळो वा ना मिळो, ते आपल्या कामात गुंतून राहातात. तुम्ही केवळ भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचेच कर्मयोगी नाही आहात, तर तुम्ही 130 कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या आशा आणि आकांक्षाच्या पूर्ततेचे साधक देखील आहात. तुम्हाला सतत यश मिळत राहो, याच कामनेसह तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो

खूप-खूप धन्यवाद.

 

M.Chopade/S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686137) Visitor Counter : 328