पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मूल्य निर्मितीचे चक्र अधिक मजबूत करण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला केले आवाहन
आत्मनिर्भरतेसाठी मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी विज्ञानाचे मूल्य-चक्र महत्वाचे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2021 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी विज्ञानाच्या मूल्य-निर्मिती चक्राला प्रोत्साहन देण्यासाठी वैज्ञानिक समुदायाला प्रेरित केले. ते आज राष्ट्रीय मेट्रोलॉजी (मापनशास्त्र) परिषद 2021 मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय अणु टाइमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला समर्पित केली आणि राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची पायाभरणी केली.
इतिहासामध्ये नजर टाकली तर लक्षात येईल की ज्या देशाने विज्ञानाला जितकी चालना दिली आहे त्याच वेगाने त्या देशाची प्रगती झाली आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग यांचे हे ‘मूल्य निर्माण चक्र’ आहे असे त्यांनी म्हटले. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले, की वैज्ञानिक शोधामुळे तंत्रज्ञान निर्मिती होते आणि तंत्रज्ञानामुळे उद्योगाचा विकास होतो. नवीन संशोधनासाठी उद्योग विज्ञानात आणखी गुंतवणूक करतात. हे चक्र आपल्याला नवीन शक्यतांच्या दिशेने घेऊन जात आहे. हे मूल्य चक्र पुढे नेण्यात सीएसआयआर-एनपीएलची मोठी भूमिका आहे, असे देखील पंतप्रधानांनी नमूद केले.
आज जेव्हा भारत आत्मनिर्भर भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे तेव्हा आजच्या या जगात मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी विज्ञानाचे हे मूल्य-चक्र अधिक महत्वाचे आहे असे मोदी म्हणाले.
सीएसआयआर-एनपीएल राष्ट्रीय अणु टाइमस्केल राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, नॅनो सेकंदाच्या श्रेणीतील वेळ मोजण्यात भारत आता स्वावलंबी झाला आहे. 2.8 नॅनो सेकंदाची अचूकता पातळी गाठणे ही स्वतःमध्ये एक प्रचंड क्षमता आहे. आता भारतीय प्रमाणवेळ आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेसोबत 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अचूकता श्रेणीसह जुळेल. अचूक तंत्रज्ञानासह काम करणाऱ्या इस्रोसारख्या संस्थांना यामुळे मोठी मदत मिळेल. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना या कामगिरीचा मोठा फायदा होईल.
टाइमस्कॅल उद्योग 4.0 मध्ये देखील भारताची भूमिका मजबूत करेल असे देखील पंतप्रधान म्हणाले. पर्यावरण क्षेत्रात भारत अग्रणी स्थानाकडे वाटचाल करत आहे. हवेची गुणवत्ता आणि उत्सर्जनाचे मोजमाप करण्यासाठी तंत्रज्ञान आणि साधनांसाठी भारताला अजूनही इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. या कामगिरीमुळे भारत या क्षेत्रात स्वावलंबी होईल आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आणि स्वस्त साधने निर्माण होतील. यामुळे वायु गुणवत्ता आणि उत्सर्जन तंत्रज्ञानाशी संबंधित तंत्रज्ञानासाठी जागतिक बाजारपेठेतील भारताचा वाटा देखील वृद्धिंगत होईल. आम्ही आमच्या शास्त्रज्ञांच्या अविरत प्रयत्नांनी हे साध्य केले आहे.
M.Iyengar/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1685973)
आगंतुक पटल : 524
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam