श्रम आणि रोजगार मंत्रालय

उत्पादन, खनिज आणि सेवा क्षेत्रासाठी सरकारने आदर्श स्थायी आदेश जारी करण्यासाठी प्रारूप मसुदा केला प्रकाशित


संबंधित हितधारकांकडून सूचना, हरकती नोंदविण्याचे आवाहन

Posted On: 02 JAN 2021 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


औद्योगिक संबंध कायदा, 2020 कलम 29 अंतर्गत केंद्र सरकारने उत्पादन, खनिज आणि सेवा क्षेत्रासाठी आदर्श स्थायी आदेश जारी करण्यासाठी प्रारूप -मसुदा तयार करून तो अधिकृत राजपत्रात प्रकशित केला आहे. यासंबंधित हितधारकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी आपल्या सूचना 30 दिवसांच्या आत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथमच सेवा क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र आदर्श  स्थायी आदेश  तयार करण्यात आले आहेत. 

या प्रारूप आदर्श स्थायी आदेशाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:- 

  1. ज्यावेळी एखादा मालक आपल्या औद्योगिक संस्थेमध्ये अथवा उद्योग उपक्रमामध्ये केंद्र सरकारच्या आदर्श स्थायी आदेशाचा अवलंब करेल, त्यावेळी त्याचे कार्य प्रमाणित असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. 
  2. स्वीकारलेला आदर्श स्थायी आदेश औद्योगिक संस्थेच्या सर्व ठिकाणच्या  विभागांना लागू असणार आहे. 
  3. काही क्षेत्रांना वैशिष्ट्यपूर्ण लवचिकता प्रदान करण्यासाठी सर्व तीन आदर्श स्थायी आदेशांमध्ये समानता आणण्यात आली आहे. 
  4. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी उद्योजकाला आणि कामगारांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. 
  5. आय.टी. उद्योगाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी कोणत्याही प्रकारे आय.टी. कार्यप्रणालीव्दारे नियोक्ता नेटवर्क, ग्राहक यांच्या व्यवहारामध्ये अनधिकृत प्रवेश करणे गैरवर्तन मानण्यात येणार आहे. 
  6. सेवा क्षेत्रामध्ये आता ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना औपचारिक करण्यात आली आहे. 
  7. आय.टी. क्षेत्राच्याबाबतीत नियोक्ता आणि कामगार यांच्यामध्ये नियुक्तीच्या अटींनुसार आणि करारानुसार सेवा क्षेत्रामध्ये आदर्श स्थायी आदेश निश्चित करण्यात येतील.  
  8. मागील बारा महिन्यांमध्ये कामगाराने तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्याचे आढळल्यास त्याची शिस्तीच्याबाबतीत ती ‘सवय’ आहे असे मानण्यात येईल. 
  9. खनिज-खाण क्षेत्रातल्या कामगारांना रेल्वे प्रवासाची सुविधा वाढविण्यात आली आहे. सध्या या सुविधेचा लाभ फक्त कोळसा खाणींमधल्या कामगारांना मिळतो.

या आदर्श स्थायी आदेशांमुळे सेवांच्याबाबतीत देशातल्या उद्योग क्षेत्रामध्ये सुसंवाद आणि एकोपा निर्माण होण्याचे लक्ष्य साधले जाणार आहे, असे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार यांनी म्हटले आहे. 

Please click here to see attached file

Please click here to see attached file


* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1685601) Visitor Counter : 338