पंतप्रधान कार्यालय

जीएचटीसी-इंडिया अंतर्गतच्या लाईट हाउस प्रकल्पांची पायाभरणी करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 01 JAN 2021 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

 

नमस्कार !

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी,श्री हरदीप सिंग पुरी जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव जी, झारखंड चे मुख्यमंत्री भाई, हेमंत सोरेन जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू ई के पलानीस्वामी जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री श्री वाय एस जगनमोहन रेड्डी जी, कार्यक्रमाला उपस्थित सर्व राज्यपाल महोदय, उपस्थित इतर मान्यवर, बंधू-भगिनींनो, आपल्या सर्वांना, सर्व देशबांधवांना वर्ष 2021 साठी खूप खूप शुभेच्छा !अनेक अनेक मंगलकामना! आज नव्या उर्जेने, नवे संकल्प घेऊन ते  सिद्ध करण्यासाठी जलद गतीने पुढे जाण्याचा आज आपण शुभारंभ करतो आहोत. आज गरिबांसाठी, मध्यमवर्गासाठी घर बनवण्यासाठी नवे तंत्रज्ञान देशाला मिळाले आहे. तंत्रज्ञानाच्या भाषेत आपण त्याला लाईट हाऊस प्रकल्प म्हणतो. मला असा विश्वास आहे, की हे सहा प्रकल्प खरोखरच-लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभांसारखे आहेत. हे सहा लाईट हाउस प्रकल्प देशात गृहनिर्माण बांधकाम व्यावसायिकांना नवी दिशा देणारे ठरतील. देशाच्या पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण प्रत्येक क्षेत्रातल्या राज्यांनी या अभियानात सहभागी होणे, सहकाऱ्यात्मक संघराज्याची आपली भावना अधिक दृढ करणारे आहे.

मित्रांनो,

हे लाईट हाऊस प्रकल्प, आताच्या  देशातल्या कार्यसंस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. यामागे असलेल्या मोठ्या दूरदृष्टीलाही आपल्याला समजून घ्यावे लागेल. एक काळ असा होता, ज्यावेळी गृहनिर्माण योजनांना, केंद्र सरकारचे तेवढे प्राधान्य नव्हते, जेवढे असायला हवे होते. सरकार गृहनिर्माणाचे बारकावे आणि गुणवत्ता याकडे लक्ष दिले जात नसे. मात्र आपल्याला कल्पना आहे, की या कामांचा विस्तार करतांना जे बदल केले गेलेत, ते बदल केले नसते तर किती कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. आज देशाने एक वेगळा दृष्टीकोन निवडला आहे, एक वेगळा मार्ग स्वीकारला आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कार्यपद्धतीत काहीही बदल न करता अशाच चालू असतात. गृहनिर्माणाशी सबंधित गोष्टींच्या बाबतीतही असेच होत होत होते. आम्ही त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. आपल्या देशाला उत्तम तंत्रज्ञान का मिळू नये? आपल्या गरिबांना दीर्घकाळ उत्तम स्थितीत राहणारी घरे का मिळू नयेत? आपण जी घरे बनवतो, ती जलदगतीने पूर्ण का केली जाऊ नयेत? सरकारी मंत्रालयांनी एखाद्या विशाल आणि आळशी, सुस्त यंत्रणेसारखे असू नये, तर स्टार्ट अप कंपन्यांसारखी, जलद आणि स्मार्टली काम करण्याची संस्कृती विकसित करायला हवी. यासाठी आम्ही ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंजचे आयोजन केले आणि जगभरातल्या अग्रगण्य कंपन्यांना भारतात निमंत्रित केले.मला आनंद आहे की जगभरातल्या 50 पेक्षा अधिक नवोन्मेशी बांधकाम तंत्रज्ञानांनी या समारंभात सहभाग नोंदवला, स्पर्धेत भाग घेतला.  या जागतिक स्पर्धेमुळे आम्हाला तंत्रज्ञानापासून नवोन्मेष आणि इंक्युबेट करण्याचा वाव मिळाला आहे. या प्रक्रीयेच्या पहिल्या टप्प्यात आता आजपासून वेगवेगळया टप्पात सहा लाईट हाउस प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले आहे.हे लाईट हाऊस प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेशी प्रक्रियेतून तयार होणार आहेत. यामुळे बांधकामाचा वेळ कमी होणार आहे आणि गरिबांसाठी अधिक टिकावू, स्वस्त आणि आरामदायी घरे तयार होणार आहेत. हे तज्ञ आहेत, त्यांना तर त्याविषयी माहिती आहेच,मात्र देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनाही त्याविषयी कळणे आवश्यक आहे. कारण आज हे तंत्रज्ञान निवडक शहरात वापरले जात आहे, मात्र लवकरच त्याचा विस्तार संपूर्ण देशात केला जाऊ शकतो.

मित्रांनो,

इंदोरमध्ये जी घरे बनणार आहेत, त्यात विटा आणि सिमेंटच्या भिंती नसतील, तर त्यात प्री- फॅब्रिकेटेड सॅन्डविच पॅनेल सिस्टीम चा त्यात वापर होणार आहे. राजकोट इथे बोगद्याच्या मदतीने ‘मोनिलीथिक काँक्रीट बांधकाम’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. फ्रांसच्या या तंत्रज्ञानामुळे आपल्याला गतीही मिळणार आहे आणि नैसर्गिक आपत्तींचा समाना करण्यासाठी घर अधिक सक्षम देखील होईल. चेन्नईमध्ये अमेरिका आणि फिनलंडच्या प्री-कास्ट काँक्रीट प्रणालीचा वापर केला जाईल. ज्यामुळे घरे वेगाने बांधून होतील आणि स्वस्तही असतील. रांची इथे जर्मनीच्या थ्री-डी बांधकाम प्रणालीने घरे बांधली जाणार आहेत. यात प्रत्येक खोली वेगळी बनवली जाणार आहे आणि नंतर पूर्ण संरचनेला एकत्र जोडले जाईल. जसे लोगो ब्लॉक्स च्या खेळात ब्लॉक्स एकमेकांशी जोडले जातात. आगरताला इथे न्यूझीलंडच्या स्टील फ्रेमशी सबंधित तंत्रज्ञानाने घरे बनवली जात होती. जिथे भूकंपाचा अधिक धोका असतो, तिथे अशी घरे अधिक उत्तम असतात. लखनौ इथे आम्ही कॅनडा च्या तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत, ज्यात, प्लास्टर आणि पेंटची गरज पडणार नाही. त्यात आधीपासून तयार असलेल्या भिंतींचा वापर केला जाईल. यामुळे घरे आणखी वेगाने तयार होतील. प्रत्येक साईटवर एका वर्षात हजार घरे बनवली जातील. एका वर्षात एक हजार घरे. याचा अर्थ हा आहे दररोज अडीच ते तीन घरे सरासरी बनवली जातील. एका महिन्यात सुमारे नव्वद ते शंभर घरे बनवली जातील आणि वर्षभरात एक हजार घरे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. पुढच्या 26 जानेवारीपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी व्हायचा आमचा निर्धार आहे.

मित्रांनो,

हे प्रकल्प एकप्रकारे आपल्यासाठी व्यवसाय व्यवस्थापन केंद्र असतील, ज्यातून आपले नियोजनकर्ता, अभियंता, स्थापत्यकार आणि विद्यार्थीही अनुभवातून शिक्षण घेऊ शकतील आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग करु शकतील. मी देशभरातल्या अशा प्रकारच्या सर्व विद्यापीठांना आग्रह करेन,सर्व अभियांत्रिकी विद्यालयांना आग्रह करेन की त्यांनी या क्षेत्राशी सबंधित आपले प्राध्यापक, व्याख्याते, विद्यार्थी यांचे दहा-दहा, पंधरा-पंधराचे गट बनवावेत, त्यांनी एकेका आठवड्यासाठी या साईट्सवर राहायला जावे. तिथे प्रत्यक्ष सर्व गोष्टींचा अभ्यास करावा,तिथल्या सरकारांनीही त्यांची मदत करावी. ज्याप्रकारे आपल्याकडे प्रायोगिक तत्वावर हे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत, हे एक व्यावसायिक व्यवस्थापनाची इन्क्युबेटर्स आहेत, तिथे जाऊन या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. माझे असे मत आहे की आपण कोणतेही तंत्रज्ञान डोळे बंद करुन आत्मसात करायला नको. आपण त्याचे अध्ययन करावे आणि मग आपल्यासाठी, आपल्या देशांच्या गरजांशी जे अनुरूप असेल, आपल्या देशातल्या संसाधनांच्या हिशेबाने आपण या तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलू शकतो का? त्यची कार्यपद्धती बदलू शकतो का? त्याच्या उत्पादकतेची पातळी बदलू शकतो का? मला पक्का विश्वास आहे की आपल्या देशातले युवक हे बघतील आणि त्यात नक्कीच आणखी काही भर घालतील. आणि खरोखरच देश एका नव्या दिशेने जलद गतीने पुढे जाईल. यासोबत, गृहनिर्माण क्षेत्राशी सबंधित लोकांना तंत्रज्ञानाशी सबंधित कौशल्ये शिकवण्यासाठी एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. हे एक खूप मोठे काम आहे. आम्ही त्यासोबत मनुष्यबळ विकास, कौशल्य विकास हे देखील एकाचवेळी सुरु केले आहे. आपण ऑनलाईन त्याचा अभ्यास करु शकता. हे नवे तंत्रज्ञान समजून घेऊ शकता. आता परीक्षा देऊन आपण प्रमाणपत्र देखील मिळवू शकता.हे यासाठी केले जात आहे कारण देशबांधवांना घरे बांधण्यासाठी जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि साहित्य मिळू शकेल.

मित्रांनो,

देशात आधुनिक गृहनिर्माण तंत्रज्ञानाशी संबधित संशोधन आणि स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी आशा-इंडिया कार्यक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून भारतातच 21 व्या शतकातल्या घरांच्या निर्मितीसाठीचे नवे आणि स्वस्त तंत्रज्ञान विकसित केले जाईल. या अभियानाअंतर्गत पाच सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निवडही करण्यात आली आहे. अलीकडेच मला एका सर्वोत्तम बांधकाम तंत्रज्ञानावर आधारित आणि ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम – नवरिती संबंधित पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी मिळाली. याच्याशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना देखील एक प्रकारे सर्वसमावेशक दृष्टीकोन घेतल्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदना करतो.

 

मित्रांनो,

शहरात राहणारे गरीब असोत अथवा मग मध्यम वर्गाचे लोक, याचं सर्वात मोठं स्वप्न काय असतं? प्रत्येकाचं स्वप्न असतं – स्वतःचं घर. कुणालाही विचारा, त्यांच्या मनात असतं कि घर घ्यायचं आहे. मुलाचं आयुष्य सुखकर व्हावं. त्या घराशी त्यांचा आनंद निगडीत असतो, सुख दुःख निगडीत असतात, मुलाचं संगोपन निगडीत असतं, कठीण काळात एक शाश्वती असते, कि चला, काही नाही तर आपलं तर आहेच. मात्र गेल्या काही वर्षात घर घेणाऱ्यांचा विश्वासघात होत होता. आयुष्यभराची कष्टाची कमाई खर्च करून घर विकत तर घेतात, पण ते केवळ कागदावरच राहत असे, घराचा ताबा मिळेल याची काहीच शाश्वती नसायची. मिळकत असूनही आपल्या गरजेपुरतं घर खरेदी करता येईल हा विश्वासच डळमळीत झाला होता. कारण – किमती इतक्या वाढल्या होत्या! आणखी एका विश्वासाला तडा गेला होता. तो हा कि कायदा आपल्या मदतीला येईल कि नाही? बिल्डरशी काही वाद झाला, अडचणी आल्या तर काय, हा देखील चिंतेचा विषय होता.  गृहनिर्माण क्षेत्राची अशी अवस्था झाली होती, कि काही गडबड झाली तर सामान्य माणसाला, कायदा आपल्या बाजूने उभा राहील हा विश्वासच उरला नव्हता.

मित्रांनो,

या सर्वांशी सामना करून तो कसाबसा पुढे जायला पण तयार होता, तर कर्जावर वाढते व्याज दर, कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी, यामुळे त्यांची स्वप्नं धुळीला मिळत. आज मला समाधान आहे कि गेल्या सहा वर्षात देशात जी पावलं उचलली गेली, त्यामुळे सामान्य माणसाचा, विशेषतःकष्टकरी मध्यमवर्गीय कुटुंबाला आपलं घर घेण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. आपण आपलं स्वतःचं घर घेऊ शकतो. आता देशाचं लक्ष आहे गरीब आणि मध्यमवर्गाच्या गरजांवर. आता देशाची प्राथमिकता आहे, शहरात राहणाऱ्या लोकांच्या संवेदना आणि त्यांच्या भावनांना. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरांत अतिशय कमी काळात लाखो घरे बांधली गेली आहेत. लाखो घरांचे बांधकाम सुरु आहे.

मित्रांनो,

आपण जर प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत बनविण्यात आलेल्या लाखों घरांच्या कामाकडे नजर टाकली तर त्यामध्ये नवसंकल्पना आणि अंमलबजावणी, या दोन्हींवर लक्ष्य केंद्रीत केलेले दिसून येईल. इमारतींसाठी वापरण्यात येणारी सामुग्री स्थानिक गरजा आणि घरमालकांच्या अपेक्षांच्या अनुसार त्यामध्ये नवसंकल्पना दिसून येतील. घराबरोबरच इतर योजनांची त्याला एक पॅकेजच्या स्वरूपामध्ये जोड देण्यात आली आहे. यामुळे गरीबाला घर तर मिळत आहेच त्याच्या जोडीला पाणी, विेजेची जोडणी, स्वयंपाकाचा गॅस अशा त्याला आवश्यक असलेल्या अनेक सुविधा मिळतील, हे सुनिश्चित करण्यात येत आहे. इतकेच नाही, सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक घराचे ‘जिओ-टॅगिंग’ करण्यात आले आहे. अशा जिओ टॅगिंगमुळे प्रत्येक गोष्टीची सर्व माहिती मिळू शकते. यामध्येही तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर करण्यात येत आहे. घर निर्माणाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करावे लागते. घर निर्मितीसाठी सरकारकडून जी काही मदत दिली जात आहे, ती थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येत आहे. राज्यांचेही मी आभार व्यक्त करतो. कारण यामध्ये त्यांनी अतिशय सक्रियतेने काम केले आहे. आज अनेक राज्यांना सन्मान देण्याची संधी मला मिळाली आहे. जी राज्ये विजयी झाली आहेत, पुढे जाण्यासाठी मैदानात उतरली आहेत, त्या सर्व राज्यांचे मी विशेष अभिनंदन करतो.

मित्रांनो,

सरकारने केलेल्या प्रयत्नांचा खूप मोठा लाभ शहरांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या मध्यम वर्गाला होत आहे. मध्यम वर्गाला आपल्या पहिल्या घरासाठी एका  निश्चित रकमेच्या गृहकर्जावरच्या व्याजामध्ये सवलत देण्याची विशेष योजना सुरू केली आहे. मध्यम वर्गातल्या मित्रांचे स्वतःचे घरकुल बनविण्याचे जे स्वप्न अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिले होते, त्यांच्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा विशेष निधीही बनविण्यात आला आहे.

मित्रांनो,

या सर्व निर्णयांबरोबरच लोकांकडे आता ‘रेरा’ यासारख्या कायद्यांची शक्तीही आहे. ज्या गृहप्रकल्पामध्ये लोक आपला पैसा गुंतवतात, तो प्रकल्प पूर्ण होईल, आणि त्यांना घर मिळेल, पैसे अडकून राहणार नाहीत, असा विश्वास आता रेरामुळे लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. आज देशामध्ये जवळपास 60 हजार स्थावर मालमत्तेच्या प्रकल्पांची रेराअंतर्गत नोंदणी झाली आहे. या कायद्यानुसार हजारों तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. याचा अर्थ हजारो परिवारांना त्यांचे घर मिळण्यासाठी मदत मिळाली आहे.

मित्रांनो,

सर्वांसाठी घरकुल, म्हणजे, सर्वांना स्वतःचे घर मिळावे, या लक्ष्य पूर्तीसाठी चोहोबाजूंनी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारांच्या जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन येत आहे. या घरांमुळे गरीबांचा आत्मविश्वास वाढतोय. या घरांमुळे देशाच्या युवकांचे सामर्थ्य वाढत आहे. या घरांच्या किल्लीमुळे विकासाची, प्रगतीची अनेक व्दारे एकाचवेळी मुक्त होत आहेत. ज्यावेळी ज्या कोणाला घराची किल्ली मिळते, त्यावेळी त्या घराचा दरवाजा आणि चार भिंती, इतक्या मर्यादित क्षेत्राची ती किल्ली नसते. तर ज्यावेळी घराची किल्ली हाती येते, त्यावेळी एका सन्मानपूर्ण जीवनाचे व्दार उघडले जाते. आपल्या जीवनामधले नवीन व्दार मुक्त होते. एका सुरक्षित भविष्याचे व्दार उघडले जाते. ज्यावेळी घराची मालकी आपल्याकडे येते आणि किल्ली मिळते, त्यावेळी बचतीचे दारही उघडले जाते. आपल्या जीवनाच्या विस्ताराचे व्दार उघडले जाते. पाच-पन्नास लोकांमध्ये, समाजामध्ये ज्ञाती-बांधवांमध्ये एका नवीन ओळखीचे व्दार उघडले जाते. मनामध्ये एक सन्मानाचा भाव निर्माण होतो. आत्मविश्वास जागृत होतो. या किल्लीमुळे लोकांच्या विकासाचे, त्यांच्या प्रगतीचे व्दार उघडणार आहे. इतकेच नाही, ही किल्ली भलेही एखाद्या दरवाजाच्या कुलुपाची असेल, मात्र या किल्लीनेच आपल्या मेंदूची कुलूपेही उघडणार आहेत. हा मेंदू एकदा उघडला की, नवनवीन स्वप्ने पहायला लागतो. नवीन संकल्पाच्या दिशेने तो पुढे जायला लागतो आणि जीवनामध्ये काही वेगळे करण्यासाठी स्वप्ने नवीन पद्धतीनेही विणायला लागतो. या किल्लीमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षात कोरोना संकटकाळामध्येच आणखी एक मोठे पाऊलही उचलण्यात आले आहे. हे पाऊल आहे, परवडणारे भाडे गृह संकूल योजना. या योजनेचे लक्ष्य आमचे श्रमिक मित्र हे आहे. जे एका राज्यातून दुस-या राज्यांमध्ये अथवा गावांतून शहरांमध्ये येतात, त्यांच्यासाठी ही योजना आहे. कोरोनाच्या आधी तर आम्ही पाहिले होते की, काही स्थानांवरून, इतर राज्यांतून आलेल्या लोकांना कधी कधी काही-बाही बोलले जात होते. त्यांना अपमानित केले जात होते. परंतु कोरोनाच्या काळात सर्व श्रमिक आपआपल्या गावी परतले, त्यावेळी ब-याच जणांना समजले की, त्यांच्याशिवाय आपले आयुष्य अतिशय कठीण बनते. कारभार चालविणेही अवघड बनते. उद्योगधंदा चालविणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे अशा श्रमिकांच्या हाता-पाया पडून त्यांनी परत कामावर यावे, परत यावे, अशी विनवणी केली गेली. अनेकजण आपल्या श्रमिकांच्या  सामर्थ्याचा सन्मानाने स्वीकार करीत नव्हते, त्यांना कोरोनाने असा स्वीकार करण्यास भाग पाडले. आम्ही पाहिले आहे की, शहरामध्ये आपल्या श्रमिक बांधवांना योग्य भाड्याने घर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे लहान-लहान खोल्यांमध्ये मोठ्या संख्येने कामगारांना रहावे लागते. अशा स्थानी पाणी, वीज, शौचालय यांच्या सुविधा नसतात, त्यामुळे अस्वच्छता असते, अनेक समस्या असतात. राष्ट्राच्या सेवेसाठी परिश्रम करणा-या या कष्टकरींना चांगले, सन्मानाने जीवन जगता यावे, ही आपल्या सर्व देशवासियांची जबाबदारी आहे. याचाच विचार करून सरकार, उद्योग आणि इतर गुंतवणूकदार यांनी मिळून योग्य भाड्यात मिळू शकतील, अशा घरांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. ज्या भागात हे श्रमिक काम करतात, त्याच भागात त्यांना योग्य भाड्यात घर मिळावे, असाही प्रयत्न करण्यात येत आहे.

मित्रांनो,

स्थावर मालमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार निरंतर निर्णय घेत आहे. घर खरेदीदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, यासाठी घरांवर लावण्यात येणारा  करही आता कमी करण्यात येत आहे. स्वस्त घरांवर आधी 8 टक्के कर लागत होता, तो आता फक्त एक टक्का केला आहे. त्याचबरोबर सामान्य घरांवर लागणारा 12 टक्के कर कमी करून तो आता फक्त पाच टक्के करण्यात येत आहे. सरकारने या क्षेत्राला पायाभूत सुविधा म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे सर्वांना आता स्वस्त दरामध्ये कर्ज मिळू शकणार आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षांमध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये बांधकाम परवान्याबाबत तीन वर्षांत आमच्या रँकिंगमध्ये 185 वरून थेट 27 पर्यंत सुधारणा झाली आहे. बांधकामाविषयी असलेल्या परवानग्यांसाठी ऑनलाइन व्यवस्थेचाही विस्तार दोन हजारांपेक्षा जास्त शहरांमध्ये करण्यात आला आहे. आता या नवीन  वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी देशभरातल्या सर्व शहरांमध्ये करण्यासाठी आपल्याला मिळून काम करायचे आहे.

मित्रांनो,

पायाभूत सुविधा आणि बांधकाम यांच्यावर होणारी गुंतवणूक आणि विशेष करून गृहनिर्माण क्षेत्रावर करण्यात येणारा खर्च, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक पटींनी वृद्धी करण्याचे काम करतो. कारण या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर स्टील लागते, सीमेंट लागते, इतर बांधकाम सामुग्री लागते, संपूर्ण क्षेत्रालाच चांगली गती मिळते. यामुळे मागणीत वाढ होते. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. देशात स्थावर मालमत्ता क्षेत्राला निरंतर बळकटी मिळावी, यासाठी सरकारचा प्रयत्न सातत्याने असतो. मला विश्वास आहे की, सर्वांसाठी घरकुल हे स्वप्न जरूर पूर्ण होईल. गांवांमध्ये अलिकडच्या वर्षांमध्ये दोन कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्षांत आम्ही गावांमध्ये घरे बनविण्याच्या कामाला अधिक वेग देणार आहोत. शहरांमध्ये या नवीन तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळेही घरांच्या निर्मिती आणि हस्तांतरण या दोन्ही कामांत वेग येईल. आपल्या देशाला अतिशय वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांनाच वेगाने वाटचाल करावी लागणार आहे. सर्वांनी मिळून, एकत्रितपणे वेगाने पुढे जायचे आहे. तसेच निर्धारित दिशेने वाटचाल करावी लागेल. लक्ष्य धूसर होऊन चालणार नाही आणि मार्गक्रमणा तर करीत राहिलेच पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारे निर्णयही अतिशय गतीने घेणे गरजेचे आहे. याच संकल्पाबरोबर मी आज आपल्या सर्वांना हे सहा लाईट हाउस प्रकल्प, एक प्रकारे आपल्या नवीन पिढीला, आपल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त उपयोगी ठरावेत, अशी माझी इच्छा आहे. सर्व विद्यापीठांनी, सर्व महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास केला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी जाऊन हे प्रकल्प पाहिले पाहिजेत. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जातो, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. कोणताही गृह प्रकल्प तयार करताना कशा पद्धतीने हिशेब केला जातो, हे जाणून घ्यावे, असे मला वाटते. अशी माहिती घेणे म्हणजे आपोआपच शिक्षणाची खूप मोठी व्याप्ती वाढविणे आहे. देशातल्या सर्व युवा अभियंत्यांना, तंत्रज्ञांना मी विशेषत्वाने आमंत्रण देतो, त्यांनी हे प्रकल्प जरूर पहावेत, त्यांचा अभ्यास करावा. या लाइट हाउस प्रकल्पातून त्यांनी स्वतःसाठी आवश्यक असणा-या पैलूवर प्रकाश टाकून शक्य तितके जाणून घ्यावे. आपल्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर घालावी. आपल्या सर्वांना या नववर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. या सहा लाइट हाउस प्रकल्पांसाठी खूप-खूप सदिच्छा.

खूप-खूप धन्यवाद!

 

* * *

M.Chopade/R.Aghor/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685559) Visitor Counter : 225