पंतप्रधान कार्यालय

130 कोटींपेक्षा जास्त लोकांची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीचे आर्थिकदृष्टीने  सामर्थ्य  आणि भव्यता प्रकट झाली पाहिजे - पंतप्रधान


दिल्लीमध्ये 21 व्या शतकाची आकर्षणे विकसित करण्याचे काम सुरू - पंतप्रधान

Posted On: 28 DEC 2020 6:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, देशातले प्रत्येक लहान आणि मोठे शहर भारताच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र बनत आहे. तथापि, देशाची राजधानी म्हणून दिल्लीला संपूर्ण विश्वामध्ये आपले अस्तित्व, आपली भव्यता सिद्ध करण्याचे काम 21 व्या शतकामध्ये करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने जुन्या शहराला आधुनिक बनविण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी अत्याधुनिक विनाचालक (ड्रायव्हरलेस) मेट्रो संचालनाचे उद्घाटन केले तसेच त्यांनी यावेळी दिल्ली मेट्रोच्या विमानतळ द्रतगती विस्तारित मार्गासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डजारी केले. या कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे सर्वांना मार्गदर्शन केले.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या करसवलती देत आहे. राजधानीमधल्या जुन्या पायाभूत सुविधा, सोई यांना आधुनिक बनविण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सुविधांमध्ये अनेक नवीन बदल करण्यात येत आहे. याचाच विचार करून शकडो निवासी वसाहतींना नियमित करून झोपडपट्टीवासियांचे जीवन चांगले बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जुन्या सरकारी भवनांमध्ये पर्यावरण अनुकूल आधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, दिल्ली हे एक जुने पर्यटन स्थान आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये 21 व्या शतकातील आकर्षणे विकसित करण्याचे काम सुरू आहे.  आंतरराष्ट्रीय संमेलने, परिषदा तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवसाय पर्यटन अशा गोष्टींसाठी सर्वांकडून दिल्ली या स्थानाला जास्त पसंती दिली जाते. हे लक्षात घेऊन राजधानीतल्या व्दारका भागामध्ये देशातले सर्वात मोठे केंद्र बनविण्यात येत आहे. अशाच पद्धतीने विशाल भारत वंदना उद्यानाबरोबरच नवीन संसद भवनाचे कामही सुरू आहे. यामुळे दिल्लीत केवळ हजारों लोकांना केवळ रोजगारच मिळेल, असे नाही; तर दिल्लीचा चेहरा-मोहराही बदलणार आहे.

विनाचालक पहिल्या मेट्रोचे संचालन आाणि दिल्ली मेट्रोच्या विमानतळापर्यंतच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  राजधानीच्या लोकांचे अभिनंदन करताना  म्हणाले, दिल्ली 130 कोटींपेक्षा जास्त लोकांची आर्थिक आणि सामर्थ्याची शक्ती आहे, म्हणूनच  या राजधानीची भव्यता सर्वत्र दिसली पाहिजे, जाणवली पाहिजे.

M.Iyangar/S.Bedekar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1684151) Visitor Counter : 211