उपराष्ट्रपती कार्यालय

'शेतकरी दिनानिमित्त' उपराष्ट्रपतींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद


शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद हाच मार्ग- उपराष्ट्रपती

अन्नसुरक्षा आणि देशाची प्रगती या दोन्हींचा संबंध शेतीशी- उपराष्ट्रपती

शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनविणे आवश्यक

सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतींनी शेती करून अधिक उत्पादन मिळत असल्याबद्दल, शेतकऱ्यांनी उपराष्ट्रपतींसमोर केले अनुभव-कथन

Posted On: 23 DEC 2020 8:04PM by PIB Mumbai

 

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संवाद हाच मार्ग असल्यावर उपराष्ट्रपती एम.वेंकैया नायडू यांनी भर दिला.

शेतकरी दिनानिमित्त आज नायडू यांनी त्यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी काही प्रागतिक शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. "कोणताही पेच संवादाने सोडवता येतो" असे सांगून "शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी असल्याचे सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे" असेही ते म्हणाले. 

'शेतकरी दिनानिमित्त' शेतकऱ्यांची भेट झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत ते म्हणाले, "अन्नसुरक्षा आणि देशाची प्रगती यांचा शेतीशी जवळचा संबंध आहे. शेतीचा सांभाळ केला गेलाच पाहिजे, तसेच तिला शाश्वत आणि फायदेशीर स्वरूप दिले पाहिजे".

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम राबवल्याचे सांगत, उत्पादकता वाढविण्याची गरज असल्यावर त्यांनी भर दिला. तसेच, हवामानबदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने शेतीला सक्षम केले पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले. पिकांमध्ये वैविध्य आणण्याची, सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची आणि पोषणमूल्यांच्या दृष्टीने संपन्न प्रजाती पिकविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

"शीतगृह सुविधा, वाहतूक आणि शेतकऱ्यांसाठी विपणन व्यवस्था यासह शेतीसाठी पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे", असेही उपराष्ट्रपती म्हणाले. ई-नाम सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने विकणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.   

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला जोड देण्यावर भर देत त्यांनी MANAGE नावाच्या संस्थेने केलेल्या एका अहवालाचा दाखला दिला- 'ज्या शेतकऱ्यांनी जोडधंदा आणि परसातील कुक्कुटपालनासारखे व्यावसाय केले, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नाही' असे त्या अभ्यास-अहवालात म्हटले आहे.

कोविड-19 साथीच्या काळातही अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेत देशाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचे नायडू यांनी कौतुक केले.

यावेळी काही शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत आले होते. शेतकऱ्यांनी उपराष्ट्रपतींना आपले अनुभव सांगितले.

सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतींनी शेती करण्यास सुरुवात केल्यापासून, पीकवैविध्य आणि आंतरपीक घेण्यामुळे अधिक चांगला नफा मिळू लागला आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली..

सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याबद्दल प्रारंभी काही शेतकरी कुटुंबांची द्विधा मनस्थिती होती, मात्र चांगले उत्पन्न पाहून त्यांनाही याची महती पटली आणि त्यांनी पारंपरिक शेतीला पसंती दिली. आदानांवर कमी खर्च करून त्यांना उत्पादन मात्र अधिक चांगले मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतींना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. उत्तम विपणन ही शेतीच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

शेवटी, उपराष्ट्रपतींना भेटून अनुभव सांगण्याची संधी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

चित्तुरच्या एका प्रागतिक शेतकऱयाने उपराष्ट्रपतींना सांगितले की तो एकात्मिक शेती, जैववैविध्य आणि जल-व्यवस्थापन यांचा अवलंब करत आहे. कमीत कमी पाणी वापरून तो अनेकविध पिके घेत असल्याचेही त्याने सांगितले.

भद्राद्री कोठंगुदम जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने सांगितले, तो पूर्वी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होता. आता ते ज्ञान तो सेंद्रीय शेतीच्या प्रसारासाठी वापरत असून, त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत, असे त्याने सांगितले.

नागरकुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी पूर्वी अपयशी आणि पिचलेला होता, आता मात्र तो इतर शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान बनला आहे. तो पाचशे प्रकारचे बियाणे पिकवत असून समाजमाध्यमांद्वारे तो इतरांना मार्गदर्शन करत असल्याचेही त्याने सांगितले.

नागरकुरनूल जिल्ह्यातीलच एका शेतकरी दाम्पत्यानेही सेंद्रिय पद्धतीने भात व डाळी पिकविण्याचे व स्वतःच्या जबाबदारीवर विकण्याचे अनुभव सांगितले.

तर रंगारेड्डी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने फळ/ बागायती शेतीतून एकात्मिक तंत्राने अनेक प्रकारची फळे व औषधी वनस्पती पिकवत असल्याचे सांगितले.

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आज सकाळी उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.

****

S.Thakur/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683132) Visitor Counter : 198