आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

साथरोग देखरेख आणि ब्रिटन मध्ये SARS-CoV-2 चा नव्या स्वरूपातला विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडून मानक संचालन पद्धती जारी

Posted On: 23 DEC 2020 5:21PM by PIB Mumbai

 

ब्रिटनच्या सरकारने, SARS-CoV-2 चा नव्या स्वरूपातला विषाणू आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले आहे. हा विषाणू अधिक संसर्गजन्य असण्याची आणि युवा वर्गावर परिणाम करणारा असेल अशी शक्यता युरोपियन रोग नियंत्रण केंद्राने वर्तवली आहे. नव्या स्वरूपातल्या विषाणूत 17 बदल घडले आहेत. मात्र स्पाईक प्रोटीनशी संबंधित भागात बदल घडल्याने विषाणू अधिक संक्रमणकारी आणि लोकांमध्ये सहज पसरणारा ठरू शकतो.

या संदर्भात आणि साथरोग देखरेखीसाठी आरोग्य मंत्रालयाने मानक संचालन पद्धती जारी केली आहे.

गेल्या चार आठवड्यात (25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2020) या काळात ज्या प्रवाश्यांनी ब्रिटनला किंवा  ब्रिटनमार्गे प्रवास केला असेल अशा सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या आगमनाच्या ठिकाणी आणि समाजात वावरताना घ्यायच्या काळजीबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे. यामध्ये उल्लेख करण्यात आलेली चाचणी म्हणजे केवळ आरटी-पीसीआर चाचणीच आहे.

ब्रिटनहून येणारी विमाने 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 किंवा पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. ब्रिटनहून येणारे किंवा ब्रिटनमधल्या विमानतळाद्वारे भारतात 21 ते 23  डिसेंबर 2020 या काळात दाखल होणाऱ्या प्रवाश्यांना आगमन झाल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. चाचणी पॉझिटीव्ह आल्यास स्पाईक जेन आधारित आरटी-पीसीआर चाचणी करण्याचेही सुचवण्यात आले आहे. पॉझिटीव्ह चाचणी असलेल्या प्रवाश्याला संबंधित राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय राखून संस्थात्मक विलगीकरण सुविधेत स्वतंत्र (विलगीकरण) विभागात ठेवण्यात येईल. विषाणूची रचना तपासण्यासाठी नमुने पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत किंवा अन्य प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. ही रचना नव्या स्वरूपातल्या SARS-CoV-2 चे अस्तित्व दर्शवत असेल तर रुग्णाला स्वतंत्र विलगीकरणात  ठेवलं जाईल आणि वैद्यकीय प्रोटोकोल नुसार काळजी घेण्यात येईल.

विमानतळावर आरटी-पीसीआर निगेटिव्ह आलेल्या प्रवाश्यांना घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.आगमनापूर्वी आणि विमानात प्रवाश्याला या मानक संचालन पद्धतीबाबत माहिती देणे आवश्यक आहे.

गेल्या एक महिन्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाश्यांशी जिल्हा देखरेख अधिकाऱ्याकडून संपर्क केला जाईल.

गेल्या चार आठवड्यात ब्रिटनहून  किंवा ब्रिटन मार्गे आलेल्या सर्व प्रवाश्यांचा शोध घेऊन त्यांची देखरेखराज्य सरकारे/एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुनिश्चित केली जाईल. नियमावलीनुसार त्यांची चाचणी केली जाईल आणि पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातल्या व्यक्तींना स्वतंत्र विलगीकरण केंद्रात ठेवले जाईल.

मानक संचालन पद्धतीसाठी लिंक :

https://www.mohfw.gov.in/pdf/SOPforSurveillanceandresponseforthenewSARSCov2variant.pdf

****

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1682998) Visitor Counter : 79