पंतप्रधान कार्यालय

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 22 DEC 2020 10:07PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ. हर्षवर्धन जी, विभागीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर जी, सन्माननीय वैज्ञानिक, भगिनी आणि सज्जन हो!

सण, उत्सव, महोत्सव हे भारताचे एक व्यक्तिमत्वही आहे आणि भारताचा स्वभाव- प्रवृतीही आहे त्याचबरोबर भारताची परंपराही आहे. आजच्या या महोत्सवामध्ये आपण विज्ञान साजरेकरीत आहोत, आणि आपण  त्याचबरोबर जे आपल्याला निरंतर, सातत्याने नवीन संकल्पना आणण्यासाठी प्रोत्साहन देते ते  मानवी चैतन्यही साजरे करीत आहोत.

 

मित्रांनो,

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेषी संकल्पना आणण्याचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. आपल्या संशोधकांनी लावलेल्या नवनवीन शोधांनी विक्रम प्रस्थापित केले आहेत. आज वैश्विक समस्या सोडविण्यासाठी आपले तंत्रज्ञान उद्योग अग्रभागी आहेत. मात्र, भारताला अजून खूप काही करायचे आहे. आम्ही भूतकाळाकडे अभिमानाने पाहतो त्याचबरोबर त्यापेक्षाही चांगला भविष्यकाळ आम्हाला हवा आहे.

 

मित्रांनो,

यासाठी भारत बेसिक्स वर भर देत आहे. वैज्ञानिक स्वभाव, प्रवत्ती विकसित करण्यासाठी बालपणाइतका योग्य कालखंड दुसरा कोणताही असू शकणार नाही, हे आपण सगळेच खूप चांगले जाणू शकता. आज भारताच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये संरचनात्मक सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाच्याही पुढे जाऊन मुलांना माहिती जाणून घेण्याची, त्यांच्यामध्ये चैाकस बुद्धीला विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे शक्य होणार आहे. गेल्या तीन दशकांइतक्या दीर्घ कालावधीनंतर देशाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळाले आहे. या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्राचा केंद्रबिंदूच बदलला आहे.

आधी आउटलेजवर लक्ष्य केंद्रीत होते आता आउटकम्सवर आहे. आधी पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासावर भर दिला जात होता, आता संशोधन आणि ॲप्लीकेशन म्हणजेच व्यावहारिक उपयोजनयावर भर दिला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च दर्जाच्या अध्यापकांचा एक सेतू देशामध्ये तयार व्हावा, यासाठी संपूर्ण देशात वातावरण बनविण्यावरही लक्ष देण्यात येत आहे.  हा दृष्टिकोन आपल्या नवीन आणि उदयोन्मुख वैज्ञानिकांनाही मदत करणार आहे, प्रोत्साहन देणार आहे.

भगिनींनो आणि सज्जन हो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे जे परिवर्तन करण्यात येत आहे, त्याला पुरक असे अटल इनोव्हेशन मिशनही सुरू करण्यात आले आहे. हे  मिशन म्हणजे चौकस बुद्धीला, उद्योगाला, नवसंकल्पनेला एक प्रकारे साजरेकरीत आहे. या अंतर्गत देशभरामध्ये अनेक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स तयार करण्यात येत आहेत. त्या प्रयोगशाळा म्हणजे नवसंकल्पनांसाठी एक भूमी-मैदान सिद्ध होत आहे. या लॅब्समध्ये आमच्या शाळांमध्ये विज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात येत आहेत. उच्च शिक्षणामध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर्स तयार करण्यात येत आहेत. यामुळे देशामध्ये संशोधन आणि विकास यासंबंधित चांगली परिसंस्था तयार होत आहे. याच प्रकारे जास्त आणि चांगली अभियांत्रिकी महाविद्यालये, जास्त आयआयटी संस्था बनविण्यावरही भर दिला जात आहे.

 

मित्रांनो,

दर्जात्मक संशोधनासाठी सरकार प्रधानमंत्री संशोधन छात्रवृत्ती योजनाही राबवत आहे. या योजनेचे लक्ष्य देशातल्या सर्वोत्कृष्ट प्रतिभेला वाव मिळावा, त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी अधिक सुविधा मिळाव्यात असे आहे. देशातल्या सर्व आयआयटी, सर्व आयआयएसईआर, बंगलुरूची भारतीय विज्ञान संस्था आणि काही केंद्रीय विद्यापीठांनी आणि एनआयटींमध्ये या योजनेमुळे विद्यार्थी वर्गाला चांगलीच आर्थिक मदत मिळत आहे. देशाच्या इतर मान्यवर संस्था आणि विद्यापीठांमध्ये अभ्यास करणा-या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 6-7 महिन्यांपूर्वीच या योजनेमध्ये आवश्यक ते काही बदल करण्यात आले आहेत.

 

मित्रांनो,

गेल्या काही महिन्यांपासून मी अनेक वैज्ञानिकांबरोबर चर्चा केली आहे. अलिकडेच भारताने वैभवशिखर परिषदेचे यजमानपद भूषविले. महिनाभर चाललेल्या या शिखर परिषदेमध्ये संपूर्ण जगामध्ये असलेले भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि संशोधक एकाच मंचावर एकत्रित आले होते. यामध्ये जवळपास 23 हजार मित्रांनी भाग घेतला होता. 700  तासांपेक्षा जास्त काळ या परिषदेत चर्चा झाली. माझीही अनेक वैज्ञानिकांबरोबर चर्चा झाली. या चर्चेमध्ये सर्वात जास्त भर दोन गोष्टींवर दिला होता- या दोन गोष्टी म्हणजे - विश्वास आणि सहयोग! देश आज याच दिशेने काम करीत आहे.

आमच्या सर्व प्रयत्नांचे लक्ष्य असे आहे की, भारत हे वैज्ञानिकांसाठी अभ्यासाचे सर्वात विश्वासार्ह केंद्र बनविणे. त्याचबरोबर आमच्या संशोधकांच्या समुदायाने सर्वोत्कृष्ट जागतिक प्रतिभेसह सामायिक होवून वृद्धी करावी, अशी आमची इच्छा आहे. भारतात आणि परदेशात आयोजित करण्यात येत असलेल्या हॅकथॉनसारख्या उपक्रमाचे यजमानपद भूषविणे आणि सहभागी होण्यासाठी भारत अतिशय सक्रिय आहे, यामध्ये कोणतेच आश्चर्य नाही. यामुळे आमच्या संशोधकांच्या कार्याचे प्रदर्शन होते आणि त्यांना संधीही मिळत आहे.

 

मित्रांनो,

जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ आणि त्याचा वापर करण्यासाठी सर्वांना संधी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हे दोन्ही अपूर्ण ठरणार आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये युवकांना संधी मिळावी, त्यांना संधीबरोबर जोडले जावे, यासाठी देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग विस्ताराने, व्यापकतेने केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आता भारतामध्ये अभाव आणि प्रभाव यांच्यामधील दरी दूर करण्यासाठी एक मोठा सेतू बनत आहे. याच्या मदतीने पहिल्यांदाच गरीबातल्या गरीबालाही सरकारबरोबर, कार्यप्रणालीबरोबर थेट जोडण्यात आले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने सामान्य भारतीयाला ताकदही दिली आहे आणि सरकारी मदत थेट, वेगाने पोहोचती करता येते, याचा भरवसाही दिला आहे. आज गावांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरांपेक्षाही जास्त झाली आहे. गावातला गरीब शेतकरीही डिजिटल पेमेंट करीत आहे. आज भारतातली खूप मोठी लोकसंख्या स्मार्टफोन आधारित ॲप्सने जोडली गेली आहेत. आज भारत वैश्विक उच्च-तंत्र शक्तीच्या  उत्क्रांती आणि क्रांती, अशा दोन्हींचे केंद्र बनत आहे.

 

मित्रांनो,

भारत आता विश्वस्तरीय शिक्षण, आरोग्य, संपर्क यंत्रणा, गरीबातल्या गरीबापर्यंत, गावांगावांपर्यंत पोहोचण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचे पर्याय बनवण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहे. भारताजवळ हाय-टेक हायवेसाठी डेटा, डेमॉग्राफिक, डिमांड आणि हे सर्व सांभाळण्यासाठी संतुलन आणि संरक्षणासाठी डेमॉक्रसी -लोकशाही सुद्धा आहे. म्हणूनच संपूर्ण दुनिया आज भारतावर इतका विश्वास करीत आहे.

 

मित्रांनो,

अलिकडेच डिजिटल भारत अभियानाचा अधिक विस्तार करण्यासाठी पीएम-वाणी  योजनासुरू करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक स्थानांवर, सर्वांसाठी उच्च दर्जाची वाय-फाय संपर्क यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. याचा थेट लाभ विज्ञानालाही मिळणार आहे. कारण देशातल्या गावांमधला युवकही दुनियेतले उत्कृष्ट वैज्ञानिक ज्ञान सहजपणाने मिळवू शकणार आहे.

 

मित्रांनो,

आपल्या देशामध्ये पाणी टंचाई, प्रदूषण, मातीचा दर्जा, अन्न सुरक्षा यासारख्या अनेक समस्या, आव्हाने आहेत. त्यांच्यावर आधुनिक पद्धतीने विज्ञानाच्या आधारे उत्तरे आहेत. आपल्या सागरामध्ये जे पाणी, ऊर्जा आणि अन्न यांचे भांडार आहे, त्याविषयी वेगाने शोध, प्रदर्शन करण्यासाठीही विज्ञानाची खूप मोठी भूमिका असणार आहे. ज्याप्रमाणे आपण अंतराळ क्षेत्रामध्ये यश संपादन केले आहे, त्याचप्रमाणे सागराच्या तळाशी, अगदी खोलवर असलेल्या क्षेत्रामध्येही यश मिळवायचे आहे. भारत यासाठी डीप ओशन मिशनही चालवत आहे.

 

मित्रांनो,

विज्ञानामध्ये जे काही आम्ही नव्याने मिळवत आहोत, त्याचा लाभ आपल्याला वाणिज्यामध्ये, व्यापारी व्यवसायामध्येही होणार आहे. आता ज्याप्रमाणे अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आपल्या युवकांना देशाच्या खाजगी क्षेत्रालाही आकाशच नाही तर असीम अंतराळाला स्पर्श करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. जी नवीन प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हयोजना आहे, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. अशी पावले उचलल्यामुळे वैज्ञानिक समुदायाला बळकटी मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित चांगली परिसंस्था निर्माण होईल. यामुळे नवसंकल्पनांसाठी जास्त स्त्रोत निर्माण होतील.

त्यामुळे विज्ञान आणि उद्योग यांच्यामध्ये सहभागित्वाची नवीन संस्कृती तयार होईल. मग त्यामध्ये हायड्रोजन इकोनॉमी असो, नील अर्थशास्त्र असो अथवा मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग असो, नवीन सहयोगातून नवीन मार्ग निघतील. या महोत्सवामुळे विज्ञान आणि उद्योग यांच्यामध्ये सहकार्याचे नवीन चैतन्य आणि सहयोगाला नवीन दिशा मिळतील, असा मला विश्वास आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये विज्ञानासमोर सर्वात मोठे आव्हान निर्माण केले आहे ते म्हणजे कोविड-19 महामारी विरोधात काढण्यात येणा-या लसीचे! विज्ञानासमोरच्या या सर्वात मोठ्या दीर्घकालीन आव्हानामुळे प्रतिभावंत, उत्कृष्ट कार्य करणा-या युवावर्गाला आकर्षित केले आहे, असे म्हणता येईल. त्यांना या आव्हानापुढे टिकून रहायचे आहे. प्युअर सायन्सम्हणजेच फक्त शुद्ध विज्ञान विषयांपेक्षा तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्र कदाचित तरूणांना जास्त आकर्षित करीत आहे. तथापि, कोणत्याही देशाच्या विकासासाठी, आणि त्या देशाला सामर्थ्‍य  देण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असते. याचे कारण म्हणजे, ज्याला आज आपण विज्ञान असे म्हणतो, तेच उद्याचे तंत्रज्ञान असते आणि नंतर त्यावर अभियांत्रिकीच्या माध्यमातून समाधान, उत्तर मिळते.

आपल्या विज्ञान कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रतिभा आकर्षित करून कार्यचक्राचा प्रारंभ झाला पाहिजे. यासाठी सरकारने, विविध स्तरांवर शिष्यवृत्ती जाहीर केल्या आहेत. परंतु यासाठी विज्ञान समुदायामध्ये याची माहिती व्यापक प्रमाणात पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी चंद्रयान मोहिमेच्या वेळी संपूर्ण देशामध्ये जे उत्साहजनक वातावरण निर्माण झाले होते, तो एक उत्तम आरंभबिंदू होता, असे म्हणता येईल. आपल्या देशातल्या युवा वर्गाला या मोहिमेविषयी खूपच रस घेतला होता, हे सर्वांनीच पाहिले आहे. आपले भावी वैज्ञानिक त्या उत्साही युवा गटातूनच तयार होणार आहेत, आपल्याला फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

 

मित्रांनो,

या विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय प्रतिभेसाठी गुंतवणूक करण्यासाठी जागतिक समुदायाने पुढे यावे, असे आमंत्रण मला द्यायचे आहे. भारताकडे प्रतिभावंत, प्रज्ज्वलित मने आहेत, भारतामध्ये मुक्त वातावरणाची संस्कृती आहे, कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आहे. भारत सरकार कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि इथे संशोधनाला पुरक वातावरणात सुधारणा करण्यासाठी सज्ज आहे.

 

मित्रांनो,

विज्ञान, व्यक्तीमधल्या सामर्थ्‍याला, व्यक्तीच्या आतमध्ये जे काही सर्वोत्कृष्ट आहे, ते बाहेर आणते. हेच चैतन्य, हाच उत्साह आपण कोविड लस तयार करण्यासाठी काम करणा-या आपल्या वैज्ञानिकांमध्ये पाहिला आहे. आमच्या वैज्ञानिकांनी कोरोनाच्या लढाईमध्ये आपल्याला चांगल्या स्थितीत ठेवले.

मित्रांनो, दोन हजार वर्षांपूर्वी महान तमिळ संत आणि समाज सुधारक थिरूवल्लूवर जी यांनी जे सूत्रवाक्य, जे मंत्र दिला  होता , तो आजही तितकाच सटीक आहे. आजच्या काळाशी संबंधित, सुसंगत आहे. त्यांनी म्हटले होते की - 'In sandy soil, when deep you delve, you reach the springs below; The more you learn, the freer streams of wisdom flow.' याचा अर्थ असा आहे की, वालूकामय जमिनीमध्ये आपण जितके खोलवर खोदत जातो, एक दिवस पाण्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. अगदी त्याचप्रमाणे आपण जितके जास्त शिकत जाऊ, एके दिवशी ज्ञानाच्याबुद्धिमत्तेच्या  प्रवाहापर्यंत जरूर पोहोचू.

शिकण्याची ही प्रक्रिया कधीच थांबवू नये, असा माझा सर्वांना आग्रह आहे. जितके आपण जास्त शिकणार आहे, तितके आपल्यातील कौशल्ये अधिक विकसित करणार आहोत. तितकाच आपलाही विकास होईल आणि देशाचाही विकास होईल. हीच भावना पुढे आपल्याला समृद्ध करीत राहणार आहे. विज्ञान भारताला, संपूर्ण दुनियेला विकासाची ऊर्जा, शक्ती देत आहे. याच भावनेने आणि विश्वासाने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा !

धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद. आभार!!

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682803) Visitor Counter : 276