वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उभय देशांमधील सुलभ व्यापार सुनिश्चित करण्यासाठी भारत बांगलादेशाला संपूर्ण सहकार्य करणार - केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे आश्वासन

Posted On: 22 DEC 2020 6:56PM by PIB Mumbai

 

उभय देशांमधील सुलभ व्यापार सुनिश्चित करण्यासाठी भारत बांगलादेशाला संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी दिले. कृषी क्षेत्रावरील भारत-बांगलादेश डिजिटल परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की आम्ही बांगलादेशाला कृषी-निर्यातीसह अनेक उत्पादनांमध्ये शुल्कमुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. उभय देशांच्या नागरिकांसाठी आणि विशेषत: दोन्ही देशातील शेतक-यांच्या आर्थिक भरभराटीसाठी अधिक चांगल्या आणि उज्वल भविष्याची आम्ही अपेक्षा करू शकतो.

गोयल म्हणाले की भारत आणि बांगलादेशमधील संबंध हे आर्थिक नफा आणि तोट्याच्या आकडेवारीच्या पलीकडे जाऊन परस्पर विश्वास, मैत्रीच्या आधारे अतिशय नितळ आणि सौहार्दपूर्ण आहेत. ते म्हणाले की चांगल्या शेजारी भागीदारीच्या संदर्भात ही भागीदारी क्षेत्रातील एक आदर्श भागीदारी आहे. गेल्या 6 वर्षात आमच्या संबंधांमध्ये लक्षणीय वृद्धी झाली आहे. आम्ही अनेक दळणवळण आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्याबरोबरच व्यापार आणि आर्थिक गुंतवणूक देखील वृद्धिंगत केली आहे.असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा दृष्टिकोन व सुधारित व्यवसाय  धोरणे राबविण्याचे विचार समान आहेत ज्यामुळे उभय देशांमध्ये सुप्रशासन वृद्धिंगत झाले आहे. त्या दोघांची, लोकांच्या समृद्धीत सुधारणा करण्याची महत्वाकांक्षा आहे.

दोन्ही देशांतील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडित आहे, याचे मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक महत्व आहे. आम्हाला आनंद आहे की बांगलादेश आता अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून शेतीचे आधुनिकीकरण करण्याचे लक्ष्य समोर आहे. हे असे क्षेत्र आहे जिथे उभय देशांनी अधिक ताळमेळ आणि सहकार्याने कार्य केले पाहिजे. उभय देशांमध्ये परिस्थिती बदलण्याची क्षमता असू शकते. या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याने सध्याच्या आर्थिक आव्हानांवर मात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक महत्व आहे. हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यामुळे आपल्या देशांना सध्याच्या आर्थिक आव्हानांवर मात करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.असेही ते पुढे म्हणाले.

शेतकऱ्यांची भरभराट करण्याच्या उद्देशाने बांगलादेश सरकार जे मार्ग शोधत आहे त्याचे मंत्र्यांनी कौतुक केले. यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  गोयल यांनी यावेळी भारत सरकारने शेतकर्‍यांना वाहतूक, सिंचन, संस्थात्मक पत, विपणन सुविधा, बियाणे, निम लेपित खते तसेच यंत्रसामग्री व संबंधित कुटीर उद्योगांच्या विकासासह शेतकर्‍यांच्या मदतीसाठी घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. आम्ही शेतकर्‍यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कृषी क्षेत्राची ओढ पुन्हा निर्माण करण्यासाठी एक अत्यंत समग्र दृष्टीकोन अवलंबला आहे. यापुढे, महामारी नंतरच्या जगात देखील, भारताला अधिक स्वावलंबी बनविण्याच्या आमच्या प्रयत्नांसोबातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकीचा विस्तार केला आहे यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्याशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये आणि त्यांची भरभराट करण्यात मदत करू. "

मंत्री म्हणाले की अलीकडील घडामोडींचा विचार करता बांगलादेश भारताकडून देण्यात येणाऱ्या अमाप संधींचा कसा उपयोग करतो हे ठरविण्यात शुल्क-विरहीत अडथळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

द्विपक्षीय सहकार्याच्या इतर बाबींचा संदर्भ देताना गोयल म्हणाले की बांगलादेशात वापरण्यात येणारे सर्वाधिक ट्रॅक्टर हे भारतात उत्पादित झालेले आहेत. अन्नप्रक्रिया क्षेत्रात आम्ही एकत्रित कार्य करू शकतो, एकमेकांकडून शिकू शकतो आणि जागतिक बाजारपेठेत एकमेकांच्या भागीदारीत आमचा ठसा निर्माण करू शकतो. पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये उभय देशात अधिकाधिक गुंतवणूक होत असून यामुळेच रेल्वेक्षेत्रामध्ये दोन्ही देशात  मजबूत संबंध आहेत. उभय देशांच्या सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ जास्तीत जास्त कशाप्रकारे काबीज करता येईल यासाठी बांगलादेश व भारताने एकत्रित उच्च मापदंड निश्चित केले आहेत. या माध्यमातून आपण लोकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ, व्यापारातून उत्पन्न वाढू आणि आर्थिक विकासाला मदत करू.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682742) Visitor Counter : 153