रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेलंगणातील 13,000 कोटी रुपये खर्चाच्या 765 किमी लांबीच्या 14 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करून कोनशिला बसविली
तेलंगणातील सर्व जिल्हे लवकरच राष्ट्रीय महामार्गांनी जोडले जातील - नितीन गडकरी
Posted On:
21 DEC 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आभासी पद्धतीने तेलंगणातील 14 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांची कोनशीला बसविली. या प्रकल्पांद्वारे 765.663 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार असून या कामाला 13,169 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि तेलंगणाचे रस्ते आणि बांधकाम मंत्री जनरल डॉ.व्ही.के.सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 6 वर्षांच्या कालावधीत तेलंगण राज्यासाठी 17,617 कोटी रुपये खर्चाची, 1918 किमी लांबीच्या रस्त्यांची एकूण 59 कामे मंजूर झाली अशी माहिती गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. राज्यातील जवळपास सर्व 33 जिल्हे आज राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेले आहेत. शिल्लक राहिलेला पेडापल्ली हा एक जिल्हा देखील लवकरच जोडला जाईल असे ते म्हणाले. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या लांबीत गेल्या 6 वर्षांत 55.71% वाढ झाली आहे. या कालावधीत 1400 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले असे त्यांनी सांगितले. सीआरआयएफ योजनेंतर्गत आतापर्यंत तेलंगणासाठी 2,436 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 1483 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे असे ते म्हणाले.
तेलंगण राज्यात 2014-15 पासून आतापर्यंत 4,793 कोटी रुपये खर्चून 841 किमी रस्त्यांची निर्मिती झाली आहे आणि 13,012 कोटी रुपये खर्चाच्या 809 किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात राज्यासाठी 8,957 कोटी रुपये खर्चाच्या, 328 किमी लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीचे 13 प्रकल्पांचा प्रस्ताव आहे.
या कॉरीडॉरच्या विकासामुळे सध्याच्या रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या सुटेल तसेच प्रवासाचा वेळ कमी होऊन खर्चात बचतही होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात यश येईल. तेलंगणा राज्याने कृषी क्षेत्राला आर्थिक उत्पादकतेकडे वळविले पाहिजे असे ते म्हणाले. देशात सध्या साखर आणि तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून सरकारकडे यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्हींचा अतिरिक्त साठा इथेनॉल निर्मितीसाठी वापरायला हवा जेणेकरून वाहनांसाठी पर्यायी इंधन उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच पण त्याच बरोबर देशात इंधन निर्मितीचा स्वदेशी स्त्रोत निर्माण होईल असे गडकरी म्हणाले.
देशाला अर्पण करण्यात आलेले प्रकल्प आणि ई-कोनशीला झालेले प्रकल्प यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682402)
Visitor Counter : 167