श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईपीएफओ वेतनपट: ऑक्टोबर 2020 मध्ये 11.55 लाख वर्गणीदार जोडले

Posted On: 20 DEC 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020 

 

कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या तात्पुरत्या पगाराच्या आकडेवारीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेत (ईपीएफओ) ऑक्टोबर 2020 मध्ये 11.55 लाख वर्गणीदारांची भर पडली आहे. कोविड महामारी असून सुद्धा चालू आर्थिक वर्षात ईपीएफओमधे एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत सुमारे 39.33 लाख वर्गणीदारांची भर पडली आहे. प्रकाशित झालेल्या माहितीत, या महिन्यात जे सदस्य नव्याने सामील झाले आहेत आणि त्यांच्या वेतनातील योगदान ईपीएफओला मिळाले आहे, त्यांची आकडेवारी दिली आहे.

गेल्या काही वर्षांची तुलना पाहिल्यास असे दिसून आले आहे की, ऑक्टोबर 2020 या महिन्यात वेतनवाढीच्या तुलनेत जोमदार अशी 56% वाढ नोंदवली गेली असून एकूण वर्गणीदारांच्या संख्येत 2019 च्या तुलनेत 7.39 लाख लोकांची नोंदणी झाली आहे, ज्यामुळे कोविड आधीच्या काळापेक्षाही भरीव वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2020 या महिन्यात 2.08 लाख महिला वर्गणीदारांची भर पडली. ऑक्टोबर 2020 महिन्यातील नवीन महिला वर्गणीदारांच्या संख्येचा वाटा 21% आहे.

ऑक्टोबर 2020 या महिन्यात 7.15 लाख नवीन सदस्य ईपीएफओत सामील झाले, तर अंदाजे 2.40 लाख सदस्य यातून बाहेर पडले. अंदाजे 6.80 लाख सदस्य सोडून गेले आणि तेच नव्याने सामील झाले म्हणजे त्यांनी ईपीएफओ आस्थापनेअंतर्गत नोकऱ्या बदलल्या पण त्यांनी आपला हिशोब पूर्ण करून निधी परत घेण्याऐवजी खात्यावरील निधी हस्तांतरीत करून सदस्यत्व कायम ठेवले. सदस्यत्व सोडलेल्यांच्या संख्येवरून असे दिसून आले आहे की भारतात सक्रीय कोविड रुग्णसंख्या कमी झाली असल्याने कर्मचारी कामावर परत येत आहेत. ऐतिहासिक दृष्टीकोनातून पाहिल्यास ऑक्टोबर 2020 मध्ये वर्गणीदारांमधे 50% वाढ झाली असून ते 18 ते 25 या वयोगटातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये रोजगारात वाढ होत असून एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत सर्व वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात 53% ने वाढ झाली आहे.

तज्ज्ञसेवा (expert services) या गटात सुधारणा झाली असून यात चालू आर्थिक वर्षात 60% ने वाढ झाली आहे. इतर उद्योगातील वर्गीकरणानुसार इतर सर्व क्षेत्रांत देखील सुधारणा झाल्याचे सूचित होत आहे.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682329) Visitor Counter : 142