युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशी खेळांना महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने गतका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब या खेळांचा खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 मध्ये समावेश केला
Posted On:
20 DEC 2020 9:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020
क्रीडा मंत्रालयाने हरियाणामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स-2021 यामधे स्वदेशी खेळांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. गतका, कलारीपयट्टू थांग-ता आणि मल्लखांब हे खेळ यामधे समाविष्ट आहेत.

या संदर्भात बोलताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू म्हणाले, भारताकडे स्वदेशी खेळांचा समृध्द वारसा आहे आणि या खेळांचे जतन, संवर्धन करणे तसेच लोकप्रियता वाढविणे याला क्रीडा मंत्रालयाने प्राधान्य दिले आहे. या खेळांमध्ये स्पर्धा घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया गेम्स यासारखे दुसरे चांगले व्यासपीठ नाही. या खेळांना प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, स्टार स्पोर्टसच्या वतीने ते देशभरात प्रसारीत केले जातात, म्हणून मला विश्वास वाटतो, की खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 यामधे योगासनांसह या चारही खेळांकडे देशातील क्रीडाप्रेमी आणि युवावर्गाचे लक्ष वेधले जाईल. येत्या काही वर्षांत आम्ही आणखी काही स्वदेशी खेळ यात समाविष्ट करण्यासाठी सक्षम होऊ.

निवडलेले चारही खेळ देशातील विविध भागांचे प्रतिनिधित्व करतात. कलारीपयट्टू या खेळाचा उगम केरळमधला असून त्याचा जगभरात सराव केला जातो, बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हे या खेळाचा सराव करणाऱ्यांपैकी एक आहेत. दरम्यान मल्लखांब हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही त्याची आकर्षण केंद्रे आहेत. गतका या खेळाची जन्मभूमी पंजाब हे राज्य असून ती निहांग शीख लढवय्यांची पारंपरिक युध्दकला असून ती स्वसंरक्षणार्थ आणि क्रीडा प्रकार म्हणून वापरली जाते. थांग-ता हा मणिपूर मधील लढाऊ खेळ हल्लीच्या दशकांत विस्मृतीत गेलेला असून खेलो इंडिया यूथ गेम्स 2021याच्या मदतीने त्याला पुन्हा राष्ट्रीय मान्यता मिळेल.

"आम्हाला खात्री आहे की, खेलो इंडियाच्या या प्रयत्नांमधून या खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि विस्मृतीत गेलेल्या भारतीय ऐतिहासिक लढाऊ कलेचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल", असे राष्ट्रीय गतका असोसिएशनचे अध्यक्ष हरजीतसिंग गरेवाल म्हणाले.

या स्पर्धांत विविध राज्यातील 400 हून अधिक क्रीडापटू सहभागी होतील. आम्हाला या स्पर्धेत अधिक यश मिळवायचे आहे आणि त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त होईल, असे थांग-ता फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विनोद शर्मा यांनी सांगितले.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682282)