उपराष्ट्रपती कार्यालय

कृषी क्षेत्र, हवामानाला तोंड देणारे, फायदेशीर आणि शाश्वत बनवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 17 DEC 2020 8:58PM by PIB Mumbai

 

कृषी क्षेत्रामध्ये हवामानाला तोंड देण्याची क्षमता निर्माण करून शेतीला फायदेशीर आणि शाश्वत बनवण्याचे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची आणि जनतेला अन्न आणि पोषण सुरक्षा पुरवण्याची काळजी घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया  नायडू यांनी केले आहे. ते आज तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळ, पूर, उष्णता, क्षारता, कीटक- अळ्या आणि आजार यांना तोंड देण्याची क्षमता असलेली पिकांची वाणे/ प्रजाती विकसित करण्यावर भर दिला. भारतीय कृषी क्षेत्राची प्रतिरोधक्षमता वाढवण्यासाठी आणि ते शाश्वत बनवण्यासाठी हवामानाला तोंड देणाऱ्या आणि विविध प्रकारच्या संकटांना तोंड देणारी वाणे आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कृषी क्षेत्र नेहमीच आपली संस्कृती आणि सभ्यता यांचा अविभाज्य घटक राहिलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या लोकसंख्येपैकी 50 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या अद्यापही उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या निर्धाराचे आणि समर्पित वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. कृषी क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे ज्या क्षेत्राने सध्या सुरू असलेले कोविड-19 महामारीचे आव्हान असूनही अतिशय चांगली कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशात कोणत्याही ठिकाणी विकण्याची परवानगी मिळालीच पाहिजे आणि संपूर्ण देशासाठी सामाईक बाजारपेठ हे तत्व ई-नामच्या संकल्पनेमागे आहे आणि तिचा विस्तार झाला पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

शीतगृहे, साठवणुकीसाठी गोदामे यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच शेतकऱ्यांना परवडण्याजोग्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात एक मोठे परिवर्तन घडून येत आहे असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी( पीएम- किसान) योजना म्हणजे एक महत्त्वाची योजना असून भारतातील सुमारे 72 टक्के शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तामिळनाडू कृषी विद्यापीठामधून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत शेतीचा विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि देशातील लक्षावधी लोकांना अन्न आणि पोषण सुरक्षेची हमी देण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये अग्रभागी राहण्याचे आवाहन केले. तुमचे संशोधन समाजासाठी उपयुक्त असले पाहिजे आणि मानवतेला भेडसावणाऱ्या हवामानापासून आरोग्यापर्यंतच्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यावर भर असला पाहिजे, असे वेंकैया  नायडू म्हणाले.

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681574) Visitor Counter : 78