संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वर्णीम विजय मशाल’ प्रज्वलित करून भारत- पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्णजयंती सोहळ्याचा प्रारंभ करतील
Posted On:
15 DEC 2020 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020
1971 साली डिसेंबर महिन्यात भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानी लष्करावर एक निर्णायक आणि ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे एका नव्या देशाची- बांग्लादेशची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या लष्करी शरणागतीची देखील नोंद झाली. 16 डिसेंबरपासून संपूर्ण देश भारत- पाकिस्तान युद्धाचे सुवर्णजयंती वर्ष ज्याला ‘स्वर्णीम विजय वर्ष’ म्हणूनही संबोधित करण्यात येते ते वर्ष साजरे करणार आहे. देशभरात या निमित्ताने या युद्धाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ उद्या या सुवर्ण जयंती वर्षाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्यांचे स्वागत करतील. पंतप्रधान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही दलांचे प्रमुख स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील आणि या युद्धात हौतात्म्य प्राप्त करणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करतील. यावेळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अखंड तेवत असलेल्या ज्योतीमधून पंतप्रधान स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करतील. राष्ट्रीय स्मारकावरील अखंड तेवत असलेल्या ज्योतीमधून चार विजय मशाली प्रज्वलित करण्यात येतील. या मशाली 1971 च्या युद्धातील परम वीर चक्र आणि महावीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या गावांसह देशाच्या विविध भागात नेण्यात येतील. या विजेत्यांच्या गावातील आणि 1971 मध्ये ज्या ठिकाणी प्रमुख लढाया झाल्या त्या भागातील माती राष्ट्रीय स्मारकाकडे आणण्यात येत आहे. या युद्धाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येणार असून त्यावेळी या युद्धात सहभागी झालेले ज्येष्ठ युद्ध सेनानी आणि वीर नारी यांचा सन्मान करण्यात येईल. तसेच बँड सादरीकरण, परिसंवाद, प्रदर्शने, युद्धसामग्रीचे प्रदर्शन, चित्रपट महोत्सव, चर्चासत्रे आणि साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
* * *
S.Thakur/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680899)
Visitor Counter : 202