संरक्षण मंत्रालय

पी17 ए जहाज प्रकल्पांतर्गत ‘हिमगिरी’ चे जलावतरण

Posted On: 14 DEC 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020


कोलकाता येथे मेसर्स गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) मध्ये सुरू असलेल्या 17 ए जहाजांच्या तीन प्रकल्पांपैकी ‘हिमगिरी’ या दुसऱ्या जहाजाचे आज जलावतरण करण्यात आले. दुपारी एक वाजून 35 मिनिटांनी या जहाजाने पहिल्यांदा हुगळी नदीच्या पाण्यात प्रवेश केला. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नौदलाच्या परंपरेनुसार सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांनी अथर्व वेदांमधील मंत्रोच्चार करत या जहाजाचे जलावतरण केले. पन्नास वर्षांपूर्वी 1970 मध्ये जलावतरण करण्यात आलेल्या लिएंडर श्रेणीतल्या जहाजांच्या मालिकेतील दुसऱ्या विनाशिकेच्या नावावरून या जहाजाला हिमगिरी हे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.

17ए या प्रकल्पांतर्गत एकूण सात जहाजांची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी चार जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड( एमडीएल) आणि तीन जहाजांची बांधणी जीआरएसईमध्ये करण्यात येत आहे. अत्याधुनिक स्टेल्थ (रडारला चकवा देणारी) वैशिष्ट्ये, देशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर अशा अनेक वैशिष्ट्यांचा या जहाजांमध्ये समावेश आहे. भारतीय नौदलासाठी पी17ए अंतर्गत अत्याधुनिक तीन युद्धनौकांची बांधणी करण्याची जीआरएसईची वचनबद्धता हिमगिरीच्या जलावतरणातून दिसून आली आहे. गेल्या काही वर्षात 100 हून जास्त जहाजांची बांधणी करत जीआरएसईने एक आघाडीची जहाजबांधणी करणारी गोदी म्हणून ओळख निर्माण केली आहे. पी17ए या मालिकेतील जहाजांची बांधणी करताना निर्माण झालेल्या नव्या आव्हानांना तोंड देताना या गोदीने आपल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्यामध्ये सुधारणा केली आहे. पी17ए जहाजे ही जीआरएसई मध्ये तयार करण्यात आलेली पहिली गॅस टर्बाईन प्रॉपल्शन प्रणाली असलेली आणि सर्वात मोठा कॉम्बॅट प्लॅटफॉर्म असलेली जहाजे आहेत.

याच्या समावेशामुळे आत्मनिर्भर भारत या भारताच्या दृष्टीकोनाला पाठबळ मिळाले  आहे. पी17ए जहाजांची रचना संपूर्णपणे देशी बनावटीची असून डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईन (सर्फेस डिझाईन ग्रुप) आणि डीएनडी (एसएसजी) यांनी केली आहे आणि एमडीएल आणि जीआरएसई या भारतीय गोद्यांमध्ये त्यांची बांधणी होत आहे. नौदलाच्या जहाजबांधणीमुळे कोविड-19 पश्चात अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 17 ए प्रकल्पातील जहाजांना लागणाऱ्या सामग्री/ उपकरणांचा 80 टक्के पुरवठा भारतीय पुरवठादारांकडून केला जात आहे आणि 2000 पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आणि एमएसएमईंना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. या जहाजांचा ताबा ऑगस्ट 2023 मध्ये निर्धारित वेळेत करता यावा यासाठी जीआरएसई या जहाजाची मॉड्युलर बांधणी आउटसोर्सिंग आणि एकात्मिक बांधणी पद्धतीद्वारे करत आहे.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1680592) Visitor Counter : 287