आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन यांनी लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला डिजिटल माध्यमातून संबोधित केले
Posted On:
12 DEC 2020 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील (एलएचएमसी) विद्यार्थ्यांना त्यांच्या दीक्षांत समारंभात डिजिटल माध्यमातून संबोधित केले. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे देखील उपस्थित होते.
एलएचएमसी हे देशातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे या गोष्टीचे कौतुक करत मंत्री म्हणाले, “आपल्या 104 वर्षांच्या कार्यकाळात ही संस्था आपल्या देशात महिला सबलीकरणाचे प्रतीक आहे. लेडी हार्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे आणि आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान देऊन संस्था व देशाला गौरव मिळवून दिला आहे.”
कोविडविरूद्धच्या लढाईत महाविद्यालयाने दिलेल्या योगदानाचे मंत्र्यांनी कौतुक केले.
मंत्री म्हणाले की संस्थेच्या सुरू असलेल्या विकासाचा विस्तार आणि गती वाढविण्यासाठी तसेच संस्थेच्या पायाभूत सुविधा सर्वोत्तम जागतिक संस्थांच्या पातळीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय वचनबद्ध आहे. सर्वसमावेशक पुनर्विकास योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार असून या महिन्यातच शैक्षणिक व कर्करोग विज्ञान (ऑन्कोलॉजी) ब्लॉक वापरासाठी देण्यात येईल. उर्वरित अपघात व आत्यंतिक रुग्ण सेवा आणि आंतररूग्ण व बाह्यरुग्ण ब्लॉक जलद गतीने पूर्ण होत असून 31 मार्च 2021 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “वैद्यकीय शिक्षण हे आरोग्य सेवा पिरॅमिडचे शिखर आहे. पुढच्या पिढ्यांसाठी देशातील आरोग्य सेवांची गुणवत्ता निश्चित करणे ही पदवीधर डॉक्टर आणि तज्ञांची गुणवत्ता कसोटी आहे. या सरकारने वैद्यकीय शिक्षणाचा उच्च दर्जा सुनिश्चित करण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे."
“वैद्यकशास्त्र हा एक व्यवसाय नसून ते एक जीवितकार्य आहे यांचे सर्व विद्यार्थ्यांना स्मरण करून देत हर्षवर्धन यांनी सांगितले की “आपण शिकणे कधीही थांबवू नका आणि सतत आपले ज्ञान आणि कौशल्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करताना त्यांच्याप्रती करुणा दाखवणे देखील महत्त्वाचे आहे.”
आज 197 पदवीधर विद्यार्थी, 129 पदव्युत्तर विद्यार्थी आणि 7 पोस्ट डॉक्टरेटसना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680225)
Visitor Counter : 166