पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये केलेले भाषण

Posted On: 11 DEC 2020 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020

 

मुख्यमंत्री के पलानीसामी जी,

मंत्री के. पंडियाराजन जी,

वानावील सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक के.रवि,

उपस्थित सन्माननीय

मित्रांनो!

वणक्कम!

नमस्ते!!

महान भारतीयार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहून मी प्रारंभ करतो. आज या विशेष दिनी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवात सहभागी होताना मला आनंद होत आहे. भारती यांच्या जीवनकार्याविषयी संशोधनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे विद्वान सीनी विश्वनाथन जी यांना यंदाचा भारती पुरस्कार बहाल करताना मला अतिशय आनंद झाला. वयाच्या 86 व्या वर्षीही सीनी विश्वनाथन् संशोधन कार्यामध्ये सक्रिय आहेत, हे पाहून मला त्यांचे विशेष कौतुक वाटते. सुब्रमण्य भारती नेमके कसे होते, याचे वर्णन करायचे ठरवले तर कुणालाही तो एक अतिशय अवघड प्रश्न वाटेल. याचे कारण म्हणजे भारतीयार यांना कोणत्याही एकाच व्यवसायाशी किंवा एखाद्या मिती-आयाम यांच्याबरोबर जोडणे अशक्य आहे. ते कवी होते, लेखक, संपादक, पत्रकार, समाज सुधारक, स्वांतत्र्य सैनिक, मानवतावादी आणि असे बरेच काही होते.

कोणीही व्यक्ती त्याचे कार्य, त्यांच्या कविता, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे जीवनकार्य पाहून आश्चर्यचकित होईल. ज्या वाराणसी शहराचे संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मला मिळाला आहे, त्या वाराणसी शहराबरोबरही त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सुब्रमण्यम भारती यांनी केलेल्या कार्याची माहिती संकलित केलेले 16 खंड प्रकाशित झाले आहेत, ते  अलिकडेच माझ्या पाहण्यात आले. अवघे 39 वर्ष - इतक्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी विपुल लेखनकार्य केले त्याचबरोबर खूप प्रचंड कार्यही त्यांनी केले. त्यांचे लेखनकार्य आपल्याला वैभवशाली भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे.

मित्रांनो,

आजच्या युवकांना सुब्रमण्य भारती यांच्या जीवनकार्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे धाडस, धैर्य!! भीती म्हणजे काय असते, हे सुब्रमण्यम भारती यांना अजिबात ठाऊकही नव्हते. त्यांनी म्हटले आहे :-

அச்சமில்லை அச்சமில்லை அச்சமென்பதில்லையே

இச்சகத்து ளோரெலாம் எதிர்த்து நின்ற போதினும்

அச்சமில்லை அச்சமில்லை அச்சமென்பதில்லையே

याचा अर्थ असा आहे की, ‘‘ मला कसलीही भीती नाही, संपूर्ण जग जरी माझ्या विरोधात उभे राहिले तरीही मला भीती वाटत नाही. अगदी हाच भाव मी आजच्या  युवा भारतामध्ये पाहतो. नवसंकल्पना आणि उत्कृष्टता यांचे दर्शन मला होते, त्यावेळी असेच चैतन्य आणि निर्भयतेचा भाव, मला अग्रस्थानी असलेला दिसून येतो. भारतामध्ये सुरू झालेले स्टार्ट-अप म्हणजे निर्भय तरूणांनी भरलेली केंद्रे आहेत. हे तरूण मानवतेला नाविन्यपूर्ण असे काहीतरी देणारे आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही हे, सर्वकाही ‘करू शकतो’ असे भाव, चैतन्य आपल्या राष्ट्राला आणि आपल्या या पृथ्वी ग्रहाला आश्चर्यकारक असे खूप काही देणारे आहे.

मित्रांनो,

भारतीयार यांचा प्राचीन आणि आधुनिक यांच्यामध्ये योग्य प्रकारे मिश्रण करून सुसंवाद साधण्यावर विश्वास होता. आपण आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवतानाच भविष्याचा वेध घेत उंच भरा-या मारण्यात शहाणपण असते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या मते तमिळ भाषा आणि मातृभूमी भारत हे आपले दोन नेत्र आहेत. त्यांनी भारताच्या महान संस्कृतीची, भारताच्या प्राचीन परंपरा, वेद आणि उपनिषद यांची महानता व्यक्त करणारी कवने गायली. मात्र त्याचवेळी त्यांनी आपण सदोदित भूतकाळाच्या वैभवाचे गुणगान करीत जगणे पुरेसे ठरणार नाही, याचीही जाणीव करून दिली. आपण बदलत्या काळाचा विचार करून, वेध घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. तसेच नवीन काळानुरूप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मित्रांनो,

महाकवी भारतीयारच्य़ा विकासाच्या व्याख्येत स्त्रियांची भुमिका प्रमुख आहे. स्वतंत्र आणि सक्षम स्त्री संदर्भातील एक दृष्टीकोन. महाकवी भारतीयारने लिहीले आहे, स्त्रियांनी चालताना मस्तक उन्नत ठेवावे, बघताना लोकांच्या नजरेला नजर द्यावी. आम्हाला या दृष्टीकोनापासून प्रेरणा मिळाली, आणि म्हणूनच महिलाकेंद्री विकासाचा हमी देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. आमच्या सरकारच्या कामकाजात स्त्रियांच्या प्रतिष्ठेला महत्व आहे, हे ऐकून आपल्याला संतोष वाटेल.

आज सुमारे 15 कोटी महिला नवउद्योजकांना मुद्रा योजनासारख्या योजनांमधून निधी पुरवठा होतो. त्या उन्नत माथा ठेवून चालतात, त्या स्वावलंबी कशा झाल्या हे आपल्या नजरेला नजर देऊन आपल्याला सांगतात.

आज, स्त्रिया स्थायी कमिशनवर लष्कराचा भाग होत आहे. स्त्रिया उन्नत माथा ठेवून चालतात आणि आपल्या नजरेला नजर देऊन, देश सुरक्षित हातांमध्ये आहे  हा आत्मविश्वास आपल्यात जागवतात. आज गरीबातील गरीब स्त्री, जी शौचालयाच्या अभावासारख्या समस्यांना तोंड देत होती, तिलाही 10 कोटी सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांमुळे लाभ झाला आहे.

त्यांना आता यापुढे जास्त समस्यांना तोंड देण्याची वेळ येणार नाही. महाकवी भारतीयारच्या कल्पनेप्रमाणे त्या त्यांचा माथा उन्नत ठेवून चालू शकतील, लोकांच्या नजरेला नजर भिडवू शकतील. हे नवीन भारताच्या नारीशक्तीचे युग आहे. त्या अडथळ्यांवर मात करू शकतात आणि परिणाम घडवून आणू शकतात. ही नवीन भारताची सुब्रमनियम भारतींना आदरांजली आहे.

मित्रहो,

कोणताही दुभंगलेला समाज यश साध्य करू शकणार नाही हे  महाकवी भारतीयार यांना समजले होते. त्याचबरोबर त्यांनी  सामाजिक विषमतांना पार न करू शकणाऱ्या व सामाजिक व्याधींना दूर न करू शकणाऱ्या पोकळ राजकिय स्वातंत्र्याबदद्ल लिहीले आहे.

त्यांनी म्हटले आहे काय ते मी सांगतो,

இனியொரு விதி செய்வோம் - அதை

எந்த நாளும் காப்போம்

தனியொரு வனுக்குணவிலை யெனில்

ஜகத்தினை யழித்திடுவோம்

म्हणजेच, आता आम्ही असा नियम बनवून अमलात आणू की एखादा मनुष्य जरी उपासमारीला सामोरे जात असेल तर त्याच्या वेदनेचे प्रायश्चित्त विश्वाने घ्यावे. आपणा सर्वाना एकत्रितपणे राहून प्रत्येक व्यक्तीच्या, विशेषतः गरीब आणि उपेक्षितांच्या सक्षमतेसाठी वचनबद्ध रहावे, याची आठवण त्यांचे लिखाण आपल्याला वारंवार करून देते.

मित्रहो,

भारतीपासून आपल्या युवावर्गाने खूप काही शिकणे आवश्यक आहे. मला वाटते की आपल्या देशातील प्रत्येकाने त्यांची पुस्तके वाचावीत आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी. भारतीयारच्या संदेशाचा  प्रसार करण्यासाठी मोलाचे काम करणाऱ्या वानावील कल्चरल सेंटरचे मी अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की हा उत्सव उपयुक्त अशी चर्चा घ़डवून आणेल, जी भारताला नव्या भविष्यासाठी मार्गदर्शन करेल

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

 

 M.Chopade/S.Bedekar/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680090) Visitor Counter : 257