पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये पंतप्रधानांचे भाषण


सरकारची महिला –प्रणित सक्षमीकरण धोरणे सुब्रह्मण्यम भारती यांच्या दूरदृष्टीला समर्पित: पंतप्रधान

भारतीयार यांची आपल्याला एक राहण्याची आणि प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः गरीब आणि वंचितांना सक्षम करण्याची शिकवण: पंतप्रधान

Posted On: 11 DEC 2020 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 मध्ये  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण केले आणि भारतीयार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त वानावील सांस्कृतिक केंद्रातर्फे हा  महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचा भारती पुरस्कार मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी  अभ्यासक सिनी विश्वनाथ यांचे अभिनंदन केले. 

सुब्रह्मण्यम भारती यांचे वर्णन करणे अत्यंत कठीण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीयार यांना एका कोणत्या व्यवसायाशी किंवा कामांशी जोडले जाऊ शकत नाही. ते कवी, लेखक, संपादक, पत्रकार, समाज सुधारक, स्वातंत्र्यसैनिक, मानवतावादी कार्यकर्ते आणि अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या, असे मोदी यांनी सांगितले.

आपण केवळ विविध भूमिकांमध्ये त्यांनी केलेल्या कामांचा आवाका बघून अचंबित होतो, एक मोठे कवी, त्यांच्या उत्तम कविता, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे जीवन हे सगळेच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, असे मोदी म्हणाले. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या वाराणसीशी असलेल्या जवळच्या नात्याला मोदी यांनी उजाळा दिला. भारती यांचे कौतुक करतांना ते म्हणाले की वयाच्या केवळ 39 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी बरेच काही लिहिले, कितीतरी काम केले आणि अनेक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचे लेखन आजही आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठीचा दीपस्तंभ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

सुब्रमण्यम भारती यांच्याकडून युवकांना खूप काही शिकता येईल.सर्वात महत्वाचे म्हणजे निर्भय होणे. सुब्रमण्यम भारती यांना भीती कधी माहितीच नव्हती. भारती यांचेच शब्द उद्धृत करत ते म्हणाले,

 भीती मला नाही, भीती मला नाही,

जरी सगळे जग असले माझ्याविरुद्ध!

आज जेव्हा भारतातातील युवाशक्ती नावोन्मेष आणि उत्कृष्टतेच्या क्षेत्रात आघाडीवर आहे, तेव्हा त्यांच्यात देखील मला हीच चेतनाशक्ती जाणवते, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या स्टार्ट अप क्षेत्रात आज असे अनेक निर्भय युवक काम करत मानवतेसाठी काहीतरी योगदान देत आहेत. ही, ‘मी करु शकतो’ चेतनाच, आपल्या देशात आणि पृथ्वीवरही अनेक चमत्कार घडवू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्राचीन आणि आधुनिकतेच्या उत्तम संयोगावर भारतीयार यांचा विश्वास होता.आपल्या मूळांशी जोडलेले राहणे आणि भविष्याकडे वाटचाल करणे यातच शहाणपण आहे, यावर त्यांही श्रद्धा होती. तामिळ भाषा आणि भारतमाता हे त्यांचे दोन नेत्र होते. भारती यांनी प्राचीन भारताचे, वेदांचे आणि उपनिषदांचे, आपल्या परंपरा, संस्कृती आणि भव्य वारशाचे गुणगौरव करणारी कवने रचली, गायली. मात्र त्याचवेळी, केवळ आपल्या संस्कृती आणि भूतकाळातील वैभवाचा गौरव करत बसणे योग्य नाही, असा इशाराही दिला, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टी, कुतूहल आणि जिज्ञासा आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याची आकांक्षा असलीच पाहिजे असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

महाकवी भारतीयार यांच्या प्रगतीच्या संकल्पनेत महिला केंद्रस्थानी होत्या, असे मोदी म्हणाले.त्यांच्या दूरदृष्टीपैकी सर्वात महत्वाचा विचार म्हणजे स्वतंत्र आणि सक्षम महिला! महाकवी भारतीयार यांनी लिहिले आहे, की महिलांनी सदैव आपले मस्तक उंचावून चालले पाहिजे, समोरच्याशी बोलतांना त्याच्या डोळ्यात बघून बोलले पाहिजे.

सरकारने त्यांच्या या विचारांतून प्रेरणा घेतली असून, महिला-प्रणित सक्षमीकरण असेल हे सुनिश्चित केले आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यक्षेत्रातमहिलांच्या प्रतिष्ठेला महत्व देण्यात आले आहे. आज 15 कोटींपेक्षा अधिक महिला उद्योजिकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

आज आपल्या महिला  सशस्त्र सैन्यदलात कायमस्वरूपी पदांवर कार्यरत आहेत. आज देशातल्या अत्यंत गरीब महिलेलाही सुरक्षित प्रसाधनगृहे उपलब्ध झाली आहेत, देशात सुमारे 10 कोटी सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांचा त्यांना लाभ मिळतो आहे. त्यांना आता उघडयावर शौचाच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. हे युग नव भारताच्या नारी शक्तीचे युग आहे. त्या आज जोखडातून, बंधनातून मुक्त होत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. नव्या भारताची ही सुब्रमण्यम भारती यांना आदरांजली आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की,कुठलाही समाज जर दुभंगलेला असेल, तर तो यशस्वी होऊ शकणार नाही, हे महावीर भारती यांनी नेमके जाणले होते. त्याचवेळी, ज्या राजकीय स्वातंत्र्यामुळे सामाजिक विषमता आणि सामाजिक कुप्रथा नष्ट करता येणार नाहीत, असे स्वातंत्र्य निरर्थक आहे, असेही भारतीयार यांचे स्पष्ट मत होते. भारती यांचे वचन उद्धृत करत त्यांनी संगीतले. आता आपण असा नियम करुया, की जर एका व्यक्तीलाही उपासमारीचा सामना करावा लागला तर संपूर्ण जग या स्थितीसाठी प्रायश्चित्त घेईल त्यांची शिकवण आपल्याला एकजुटीने राहण्याचा आणि प्रत्येक व्यक्तीच्या, विशेषतः गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा ठोस संदेश देणारी आहे.

भारती यांच्याकडून युवकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे असे सांगत, देशातल्या प्रत्येकाने त्यांचे साहित्य वाचावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारतीयार यांचे विचार आणि संदेश, जगभर पोहोचवण्याचे काम करण्याबद्दल वानावील सांस्कृतिक केंद्राचे त्यांनी कौतुक केले. या महोत्सवात, भारताला नव्या भविष्याकडे नेण्यासाठी सकस चर्चा होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी  व्यक्त केला.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1680085) Visitor Counter : 272