अल्पसंख्यांक मंत्रालय

हज 2021 साठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला 10 जानेवारी 2021 पर्यंतची मुदतवाढ

प्रत्येक हज यात्रेकरुसाठी, प्रत्यक्ष यात्रा सुरु करण्याच्या स्थळापर्यंत जाण्याचा अंदाजे खर्च कमी येणार : अल्पसंख्यक मंत्री

Posted On: 10 DEC 2020 8:14PM by PIB Mumbai

 

हज यात्रा 2021 साठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेला 10 जानेवारी 2021 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे अशी, माहिती, केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज दिली. तसेच हज यात्रेची सुरुवात करण्यासाठीच्या प्रत्येक स्थळी पोचण्यासाठीच्या यात्रेकरुंच्या खर्चातही कपात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आज मुंबईत, हज हाउस येथे हज समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे अर्ज सादर करण्याचीमुदत आज संपणार होती,मात्र आता ही मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत हज यात्रेसाठी 40 हजार हून अधिक अर्ज आले असून त्यापैकी 500 पेक्षा जास्त अर्ज मेहरम (पुरुष सह-यात्रेकरू) शिवाय जाण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांचे आहेत, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

गेल्यावर्षी 2,100 पेक्षा जास्त महिलांनी मेहरम शिवाय जाण्यासाठी अर्ज केले होते, मात्र कोविडमुळे ही यात्रा रद्द झाली असली तरीही त्यांचे अर्ज 2021 च्या यात्रेसाठीही वैध समजले जातील,असेही त्यांनी सांगितले. मेहरम शिवाय जाण्यासाठी उत्सुक महिलांचे नवे अर्ज स्वीकारले जातील तसेच त्यांना लॉटरी पद्धतीच्या  निवडीतून जावे लागणार नाही, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

यात्रा सुरु करण्याच्या स्थळांविषयी सौदी अरेबियाशी चर्चा करून, या स्थळी पोहोचण्याचा खर्च कमी करण्यात आला आहे, असेही नक्वी यांनी सांगितले. म्हणजे मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणांहून यात्रा सुरु केल्यास एकूण यात्रेचा खर्च आता साधारण 3,30,000 रुपये इतका असू शकेल. 

कोविडच्या पार्श्वभूमीवर, हज यात्रा 2021 मध्ये निश्चित करण्यात आलेले सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आणि नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे नक्वी म्हणाले. ही यात्रा जून-जुलै 2021 मध्ये होणार आहे. सौदी अरेबिया सरकारने निश्चित केलेल्या सर्व नियमांच्या आधारावरच यात्रेची आखणी करण्यात आली आहे.

यासाठी नियमावली, पात्रता निकष, वयोमर्यादा या सगळ्यातच बदल करण्यात आला आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन सर्व नियम आणि यात्रेची नव्याने आखणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व नियमावलीचे काटेकोर पालन केले जाईल, असे नक्वी म्हणाले. प्रत्येक यात्रेकरूला, यात्रा सुरु करण्याच्या 72 तास आधी कोरोनाची चाचणी करावी लागेल. ही चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यावरच प्रवासाची परवानगी मिळेल.

कोविड महामारी आणि एअर इंडिया तसेच इतर हवाई कंपन्यांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार यात्रा सुरु करण्याची स्थळे कमी करुन 10 करण्यात आली आहेत. आधी ती 21 होती. हज 2021 साठी मुंबई, अहमदाबाद, बंगळूरु, कोच्ची, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता लखनौ आणि श्रीनगर ही केंद्रे असतील.महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव, दादरा आणि नगरहवेली इथले यात्रेकरू मुंबई केंद्रापासून यात्रा सुरु करू शकतील.

****

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1679794) Visitor Counter : 8