माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतविरोधी शक्तींचा सामना करण्यात माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका : श्रीपाद नाईक
Posted On:
10 DEC 2020 7:16PM by PIB Mumbai
"भारतविरोधी शक्तींशी सामना करण्यात माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या देशाच्या विरोधात भारतविरोधी शक्तींकडून आपल्या माध्यमांचा गैरवापर होऊ नये याकडे लक्ष देणे ही माध्यमातील व्यक्तींसह आपणा सर्वांची जबाबदारी आहे." इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) ने गुरुवारी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मीडिया कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या समारोप कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. याप्रसंगी आयआयएमसीचे महासंचालक प्रा. संजय द्विवेदी, अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) के. सतीश नंबुद्रीपाद आणि अतिरिक्त महासंचालक (प्रशिक्षण) ममता वर्मा हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नाईक म्हणाले की, आज जेंव्हा फेक न्यूज आणि हेट न्यूज यांचा कल वाढत असताना प्रत्येकासाठी माध्यम साक्षरता आवश्यक आहे. नवीन माध्यमांच्या या युगात माध्यम साक्षरता केवळ संप्रेषकांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले की, आज बहुतेक प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे माध्यमांचा गैरवापर होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे आणि केवळ माध्यम साक्षरतेमुळेच यावर नियंत्रण मिळवता येईल.
संरक्षण राज्यमंत्र्यांच्या मते, मीडिया साक्षरतेमुळे आपल्याला आज जागतिक स्तरावरील मानसिक युद्धांचा सामना करण्यास देखील मदत होते. भारतविरोधी शक्तींनी साधन म्हणून स्वीकारल्या गेलेल्या या मानसिक युद्धापासून आपण सावध राहिले पाहिजे. उलट माध्यमांची ताकद देश आणि देशवासीयांच्या उन्नतीसाठी कशी वापरायची हे आपण शिकायला हवे.
नाईक म्हणाले की, भारतीय संरक्षण दलांचे धैर्य, पराक्रम, वचनबद्धता आणि समर्पण अतुलनीय आहे. तरीही त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी देशातील काही घटक चोवीस तास कार्यरत असतात. आपण योग्य माध्यम दृष्टीकोन स्वीकारून आणि संघटित पद्धतीने भिन्न माध्यम मंच वापरुन आपल्या संरक्षण दलांविरूद्ध सर्व धोकादायक मोहिमांचा सामना करू शकतो.
यावेळी आयआयएमसीचे महासंचालक प्रा.संजय द्विवेदी म्हणाले की, आज संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोनाच्या या युगात एक शब्द खूप लोकप्रिय झाला आहे आणि त्याचे बरेच परिणाम दिसून आले आहेत. हा शब्द आहे 'इन्फोडेमिक' जो अतिरिक्त माहिती किंवा रोजच्या संभाषणातील माहितीचा स्फोट सूचित करतो. ते म्हणाले की जेव्हा या अतिरीक्त माहितीतून कोणती माहिती निवडावी, कोणत्या माहितीवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या नाही अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा अशी परिस्थिती चर्चेला जन्म देते. आणि या चर्चेचे नाव माध्यम आणि माहिती साक्षरता आहे.
प्रा. द्विवेदी म्हणाले की, आज बनावट बातम्या हाच एक मोठा व्यवसाय झाला आहे आणि डिजिटल माध्यमांनीही त्याचा प्रभाव पाडला आहे. अशा परिस्थितीत माध्यम साक्षरतेची गरज वाढते. आय.आय.एम.सी. मध्ये माध्यम संप्रेषण अभ्यासक्रम समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या विष्णुप्रिया पांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आयआयएमसी दरवर्षी संरक्षण अधिकार्यांसाठी माध्यमे आणि संप्रेषणाशी संबंधित अल्प मुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करते. या अभ्यासक्रमांमध्ये कॅप्टन स्तरापासून ब्रिगेडियर स्तरावरील अधिकारी भाग घेतात. कोरोनामुळे, हा प्रशिक्षण कार्यक्रम यावर्षी प्रथमच ऑनलाइन घेण्यात आला. यावर्षी लष्करी अधिका-यांना लोक माध्यमांपासून नवीन माध्यमांपर्यंतची माहिती आणि आधुनिक संप्रेषण तंत्राबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय नव्या माध्यमांच्या युगात सैन्य आणि माध्यमांमधील संबंध कसे सुधारू शकतात, त्याचे प्रशिक्षणही अधिकाऱ्यांना देण्यात आले.
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679757)
Visitor Counter : 149