शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातच्या शिक्षण मंत्र्यांसमवेत घेतली आभासी व्दिपक्षीय बैठक
संयुक्त अरब अमिरातच्या शिक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 चे केले कौतुक
शैक्षणिक प्रवेश, समानता, गुणवत्ता, सर्वांना परवडणारे शिक्षण आणि दायित्व हे एनईपीचे मूलभूत स्तंभ- रमेश पोखरियाल ‘निशंक’
Posted On:
09 DEC 2020 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 9 डिसेंबर 2020
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज संयुक्त अरब अमिरातचे शिक्षणमंत्री हुसैन बिन इब्राहिम अल हम्मादी यांच्याबरोबर आभासी बैठकीव्दारे संवाद साधला. यावेळी अमिरातच्या राज्य सार्वजनिक शिक्षण मंत्री जमीला अलमुहैरी, यूएईचे भारतातले राजदूत डॉ.अहमद अब्दुल रहमान अलबाना, भारताच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे आणि उभय देशातल्या शिक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 चे यूएईचे शिक्षणमंत्री हुसैन बिन इब्राहिम अल हम्मादी यांनी कौतुक केले. नवीन शैक्षणिक धोरणातून दूरदर्शिता दिसून येते, या धोरणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विचार करण्यात आला आहे. उभय देशांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या संभावनांचा विचार करून सहकार्य वाढविण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार केली पाहिजे, यामुळे परस्परांमधील चांगले संबंध नवीन उंचीवर पोहोचण्यास मदत होईल.
याप्रसंगी पोखरियाल म्हणाले, भारत आणि यूएई यांच्यामध्ये अतिशय दृढ आणि सखोल व्दिपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देशांकडून शैक्षणिक सहकार्यासाठी निरंतर संवाद साधला जात आहे. तसेच विविध स्तरावर सक्रियता वाढविण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यूएईमधील युवकांना भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणे सुकर व्हावे, यासाठी सर्व अभ्यासक्रमांच्या तपशीलासह इतर माहिती देणारे सामायिक पोर्टल विकसित करण्याचा विचार सुरू आहे, असे सांगून पोखरियाल म्हणाले, भारत आणि यूएई यांच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या प्रस्तावावर सुरू झालेले काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे आपल्या देशातल्या उच्च शिक्षण देणा-या संस्थांमध्ये शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679557)
Visitor Counter : 156