विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठी प्रचार, उद्घाटन आणि विज्ञान यात्रांचे 35 ठिकाणी आयोजन

Posted On: 07 DEC 2020 6:04PM by PIB Mumbai

 

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 यातील विविध उपक्रमांना देशभरात  पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विज्ञान मंत्रालय आणि विभागांच्या प्रयोगशाळा आणि संस्था भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मधील उपक्रम लोकांपर्यंत पोहचावेत आणि त्यांचा प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परीषद (CSIR) आणि राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्था, हैदराबाद (NGRI) यांनी एकत्रितपणे यासाठी नुकताच एक उद्घाटनपर आणि प्रचाराचा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून सादर केला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, सीएसआयआरचे महासंचालक आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेचे सचिव डॉ. शेखर मांडे म्हणाले, की 2015 सालापासून आयआयएसएफ विज्ञानाप्रतीच्या उत्साहाचा उत्सव साजरा करत आहे आणि विविध उत्साही आणि विज्ञानातील वेगवेगळ्या प्रवाहातील तज्ज्ञांना जनतेशी एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे. अशा प्रकारच्या संवादामुळे विज्ञानाचा प्रसार खोलवर आणि विस्तृतपणे लोकांच्यात रूजेल आणि विज्ञानाच्या सर्व रुपांना एकाच व्यासपीठावर आणत आपले जीवन समृध्द करेल. सर्वांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आईएनसीओआईएसचे माजी संचालक यांनी डॉ. सतीश शेनॉय यांनी भारताच्या संदर्भातील खोल समुद्रासंबंधीची संशोधनातील आव्हाने आणि संधीया विषयावर भाषण केले.

 

विज्ञान भारतीचे सचिव जयंत सहस्रबुद्धे यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 आयआयएसएफचा दृष्टीकोन मांडत, लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यात विज्ञान भारतीच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, की यावर्षीच्या आयआयएसएफची संकल्पना आत्मनिर्भर भारत आणि जागतिक समृध्दीही आहे आणि सीएसआयआरवर त्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विज्ञानयात्रा हा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विज्ञानाची ही यात्रा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये तसेच जनतेत वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आवड निर्माण करण्यासाठी आहे. या विज्ञानयात्रेसाठी देशातील सर्वोत्तम 35 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM) या संस्थेने देखील विज्ञान भारती, पुणे विभाग यांच्या सहयोगाने त्यांच्या वैज्ञानिक उपक्रमांचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रदर्शन करत विज्ञान यात्रेचे आयोजन केले आहे.

 

येत्या 22 ते 25 डिसेंबर 2020 या कालावधीत भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 चे (आयआयएसएफ 2020) आयोजन आभासी माध्यमातून करण्यात येणार आहे.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678861) Visitor Counter : 306