पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने यमुना नदीमधील प्रदूषण आणि फेसाळलेल्या पाण्याबाबत व्यक्त केली चिंता


दिल्ली आणि इतर राज्यांना सांडपाण्यावर परिणामकारक उपाय करण्यास सांगितले

Posted On: 06 DEC 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 डिसेंबर 2020

 

सीपीसीबी (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडऴ) यमुना नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आणि नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर देखरेख ठेवते.

यमुना नदीमध्ये प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा विसर्ग, वापरात नसलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, तसेच यमुना नदीच्या तीरावर असलेल्या कारखान्यांकडून उभारलेले औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) आणि अयोग्य रीतीने कार्यरत औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) यामुळे यमुना नदीच्या पात्रात फेसाळलेले पाणी दिसत असून  अमोनियाची पातळी वाढत असल्याचे निरीक्षण पूर्वीच सीपीसीबीने नोंदविले होते.

नुकत्याच झालेल्या 22 नाल्यांच्या निरीक्षणामध्ये 14 नाले (सोनिया विहार, नजफगढ, शास्त्री पार्क, शाहदरा इत्यादी) हे उघडे आणि सांडपाणी वाहणारे आढळले. तर, 5 नाले हे 100 टक्के बंद आणि वाहत्या प्रवाहामध्ये कोणताही अडथळा आढळून आला नाही, 2 नाले हे बंद मात्र यमुना नदीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडणारे आढळले. एक नाला (नाला क्रमांक 14) यामध्ये कोणताही प्रवाह आढळला नाही. सांडपाणी आणि फॉस्फरस असणारे औद्योगिक सांडपाणी अर्धवट / प्रक्रिया न केलेले असल्यामुळे, बऱ्याचदा ते फेसाळलेले आढळते.

सीपीसीबीने याची दखल घेत एसटीपीद्वारे मानदंडांचे पालन केले पाहिजे आणि त्या नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडले जाणार नाही यासाठी वेळोवेळी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिल्ली जल मंडळाला दिले.

सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) आणि औद्योगिक केंद्रांनी पालन न केल्यास दिल्ली प्रदूष्ण नियंत्रण मंडळाने (डीपीसीसी) त्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारच्या समांतर सूचना हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील जारी केल्या आहेत.

या मुद्द्यांचे महत्त्व लक्षात घेता 15 डिसेंबर 2020 पर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी संबंधित संस्थांना आज स्मरणपत्रे देण्यात आली.

 

* * *

M.Chopade/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678738) Visitor Counter : 193