शिक्षण मंत्रालय

आयआयटी, एनआयटी आणि नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्था राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग दत्तक घेणार


18 आयआयटी, 26 एनआयटी, 190 अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून योजनेला स्वीकृती

Posted On: 03 DEC 2020 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 डिसेंबर 2020

 

चांगला हेतू निश्चित करून कोणतेही काम केले तर प्रत्यक्षातही त्याचे चांगलेच परिणाम मिळतात. असाच प्रकार देशातल्या आयआयटी, एनआयटी आणि नामांकित तंत्रज्ञान शिक्षणसंस्था आणि एनएचएआय अर्थात  भारतीय राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरण  यांच्या बाबतीत झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातल्या नामांकित तंत्रज्ञान शिक्षणसंस्थांनी आपल्या परिसरातले  महामार्ग दत्तक घेऊन  त्याभागाचा अभ्यास करणे, संशोधन करणे आणि विद्यार्थ्‍यांचा उद्योगातील नवीन कल जाणून त्यानुसार ऐच्छिक तत्वावर कार्य करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अनेक संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे नवीन संकल्पना साकार करण्यासाठी उद्योग व्यवसाय आणि विविध तंत्रज्ञान शिक्षण शिक्षण संस्था यांच्यामध्ये सेतू बनण्याचे काम या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे ज्या भागांमध्ये काम सुरू आहे, त्या कामांमध्ये स्थानिक तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमधील तज्ज्ञांचा सल्लाही घेता येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत भागीदार संस्था दत्तक घेतलेल्या क्षेत्रातील रस्त्यांची, बांधकामांची सुरक्षितता, देखभाल, इतर सुविधा, स्थानिक समस्या, गर्दी, वाहतुकीची कोंडी कमी करणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर याचा अभ्यास करतील आणि या संदर्भामध्ये एनएचएआयला योग्य त्या शिफारसी करतील.  नवीन प्रकल्पांची संकल्पना, आरेखन आणि प्रकल्प तयार करताना  या संस्था एनएचएआयशी संलग्न असतील. तसेच प्रकल्पाचा चांगला सामाजिक आणि आर्थिक परिणाम व्हावा, यासाठी प्रकल्पाचे स्थान, स्थानिक हवामान, भौगोलिक स्थिती आणि स्त्रोत यांच्या  आधारे नवकल्पना सुचविण्याचे कामही या संस्था करणार आहेत.

विद्यार्थ्‍यांच्या पुढकाराने आणि योगदानाने स्थानिक पायाभूत सुविधांची निर्मिती होत असल्यामुळे त्या महामार्ग प्रकल्पाविषयी आपलेपणाची भावना निर्माण होईल. यासाठी एनएचएआयच्या वतीने दरवर्षी संस्थेतल्या पदवी वर्गातल्या 20 आणि पदव्युत्तर वर्गातल्या 20 विद्यार्थ्‍यांना इंटर्नशिप अर्थात अंतरवासिता करण्याची संधी देणार आहे. यासाठी विद्यार्थ्‍याला दोन महिने काम करता येणार आहे. पदवी वर्गातल्या इंटर्नशिप करणा-या विद्यार्थ्‍यांना दरमहा 8000/- तर पद्व्युत्तर विद्यार्थ्‍यांना 15000/- रुपये छात्रवृत्ती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेमध्ये प्रयोगशाळेची निर्मिती करून देण्यासाठी एनएचएआय मदत करणार आहे. महामार्ग प्रकल्पांसाठी पर्यायी स्थानिक साधनसामुग्री वापर करणे शक्य आहे का? तसेच रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सहाय्यभूत ठरणारा संशोधन प्रकल्पही एनएचएआय प्रायोजित करणार आहे.

एनएचएआयने तंत्रज्ञान शिक्षण संस्थांना महामार्ग प्रकल्पामध्ये सहभागी करून घेण्याची योजना तयार करून काही दिवसच झाले आहेत. इतक्या कमी कालावधीमध्ये अनेक नामांकित सस्थांकडून एनएचएआयला खूप प्रोत्साहित करणारा प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत 18 आयआयटी, 26 एनआयटी, 190 अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून या योजनेला स्वीकृती दिली आहे. महामार्गाचा कोणता भाग दत्तक घ्यायचा, याविषयी तंत्रज्ञान शिक्षण संस्था आणि एनएचएआय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येत आहेत.  आत्तापर्यंत 200 संस्थांबरोबर एनएचएआयने सामंजस्य करार केले आहेत. संपूर्ण देशभरातल्या सुमारे 300 पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिक्षण संस्था आणि एनएचएआयमध्ये अशा प्रकारचे करार होतील अशी अपेक्षा आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678050) Visitor Counter : 135