संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने केली ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Posted On:
01 DEC 2020 9:58PM by PIB Mumbai
ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची जहाजभेदी क्षमता आजमावून बघण्यासाठी आज सकाळी 9 वाजता एका निवृत्त जहाजाला लक्ष्य करून घेतलेली चाचणी संपूर्ण यशस्वी झाली. क्षेपणास्त्राने अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया सफलतेने पूर्ण करत लक्ष्याचा अचूक वेध घेतला.भारतीय नौदलाने हि चाचणी घेतली आहे.
डीआरडीओ अर्थात भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि रशियाची एनपीओएम ही अवकाश संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्राह्मोस हे स्वनातीत म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेले क्षेपणास्त्र आधुनिक युगातील अवघड युद्धभूमीवर तिन्ही सैन्यदलांचे सामर्थ्य वाढविणारे म्हणून सिध्द झाले आहे. या क्षेपणास्त्राची समुद्रात जहाजांवर आणि जमिनीवरच्या लक्ष्यांवर मारा करायची अतुलनीय क्षमता, अनेक युद्ध नितींमध्ये त्याची भूमिका तसेच विविध मंचांवरून मारा करता येण्याची सोय भारतीय सशस्त्र दलाच्या तीनही दलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
2001 मध्ये ब्राह्मोसची सर्वात पहिली चाचणी घेतली गेली आणि तेव्हापासून आतापर्यंत विविध जहाजांवरून, मोबाईल लाँचरवरून, सूखोई - 30, एमकेआय या लढाऊ विमानातून अशा विविध प्रकारे त्याचे प्रक्षेपण केले गेले आणि प्रत्येक वेळी यशस्वी होत ब्राह्मोसने अष्टपैलूत्व सिद्ध केले.
केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन तसेच विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी आजची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.
******
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677545)
Visitor Counter : 202