पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 नोव्हेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

Posted On: 29 NOV 2020 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ च्या प्रारंभी आज, तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देतोय. ही बातमी जाणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणार आहे. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1913 च्या आसपास वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती. मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सर्वतोपरी मदत केली, त्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी अगदी सहृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. माता अन्नपूर्णा आणि काशी यांच्यामध्ये विशेष संबंध आहे. आता मातेची प्राचीन मूर्ती मायदेशी परत येतेय, ही एक सुखद गोष्ट आहे. माता अन्नपूर्णेच्या मूर्तीप्रमाणेच आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या आहेत. या टोळ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा वस्तू खूप मोठ्या किंमतीला विकतात. आता, अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्यात येत आहेत. या टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवले आहेत. अशा प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात गेलेल्या अनेक मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्यामध्ये यश मिळालंय. माता अन्नपूर्णेची मूर्ती परत येण्यासंबंधी एक योगायोगही आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा सप्ताह साजरा केला. जागतिक वारसा सप्ताह, संस्कृतीप्रेमींसाठी, प्राचीन काळामध्ये जाण्याची, इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती घेण्याच्या दृष्टीनं एक खूप चांगली संधी असते. कोरोना काळ असतानाही यावेळी अगदी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या लोकांनी वारसा सप्ताह साजरा करताना आपण सर्वांनी पाहिलं. संकटाच्या काळात संस्कृती खूप कामी येत असते. संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावत असते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संस्कृती आपल्याला भावनिक ‘रिचार्ज’ करण्याचं  काम करते. आज देशामध्ये अनेक वस्तू संग्रहालयं  आणि ग्रंथालयं आपल्या संग्रहालयांना पूर्णपणे डिजिटल करण्याचं काम करताहेत. दिल्लीमध्ये आपल्या राष्ट्रीय संग्रहालयानं याविषयी काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय संग्रहालयाव्दारे जवळपास दहा ‘आभासी दीर्घा’ तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. आहे ना, ही एक आगळी मजेदार, रंजक  गोष्ट!  आता तुम्ही घरामध्ये बसून दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या दीर्घेतून एक फेरफटका मारून येऊ शकता. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे,  आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं  महत्वाचं आहे. अलिकडेच, एका रंजक प्रकल्पाविषयी माहिती माझ्या वाचनात आली. नॉर्वेच्या उत्तरेकडे स्वालबर्ड नावाचे एक व्दीप आहे. या व्दीपामध्ये आर्कटिक वर्ल्‍ड आर्काईव्हचा प्रकल्प बनवण्यात आलाय. या आर्काईव्हमध्ये बहुमूल्य वारसाविषयक माहिती, अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आली आहे की, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटाचा त्या माहितीवर प्रभाव पडू नये. अलिकडेच अशीही माहिती समजली की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करून या प्रकल्पाचे जतन करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती  यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, त्यांचे  उद्‌गार यांचाही समावेश असेल. मित्रांनो, महामारीने एकीकडे आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे, तर  दुसरीकडे निसर्गाला नव्या ढंगानं अनुभवण्याची संधीही दिली आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला आहे. ऋतुचक्रातल्या हिवाळ्याला आता प्रारंभ होत आहे. निसर्गामध्ये वेग-वेगळ्या रंगांची उधळण आपल्याला पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून  चेरी ब्लॉसमच्या व्हायरल फोटोंनी इंटरनेट व्यापून गेलं  होतं. आता तुम्ही विचार करीत असणार की, मी चेरी ब्लॉसमविषयी बोलतोय, म्हणजे  नक्कीच जपानची ओळख म्हणून असलेल्या चेरी ब्लॉसमची गोष्ट करतोय.- मात्र तसं काही नाहीए. हे काही जपानचे छायाचित्र नाही. हे छायाचित्र आपल्या मेघालयातल्या शिलाँगचे आहे. सध्याच्या दिवसात मेघालयाच्या सौंदर्यामध्ये या चेरी ब्लॉसमने अधिकच भर घातली आहे.

मित्रांनो, या महिन्यात म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अली जी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे. संपूर्ण जगभरातल्या पक्षी निरीक्षकांना भारताकडे  आकर्षितही केलं आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणा-यांचं मी नेहमी कौतुक करतो. ही मंडळी खूप धैर्याने, अगदी चिकाटीनं अनेक तास, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी निरीक्षण करू शकतात. निसर्गातल्या अगदी अनोख्या दृष्यांचा आनंद घेऊ शकतात.  इतकंच नाही तर त्यांच्याकडचं ज्ञान, आपल्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवत राहतात. भारतामध्येही अनेक पक्षी निरीक्षण संघटना सक्रिय आहेत. तुम्हीही जरूर या विषयाशी जोडलं जावं. माझ्या इतक्या धावपळीच्या दैनंदिन व्यवहारातही मला अलिकडेच केवडियामध्ये पक्ष्यांबरोबर काही वेळ घालवता आला, ती एक संस्मरणीय संधी होती. पक्ष्यांबरोबर घालवलेला काळ, वेळ तुमचे निसर्गाशी नाते जोडले जाऊन, पर्यावरणासाठी एक प्रेरणा देईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताची संस्कृती आणि शास्त्र नेहमीच संपूर्ण दुनियेच्या दृष्टीने आकर्षणाचं एक केंद्र आहे. अनेक लोक तर, याचा शोध घेण्यासाठी भारतामध्ये आले आणि मग ते इथंच कायम राहिले आहेत, असं तर नेहमीच होत असतं. अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात. मला जॉनस मसेट्टींच्या कामाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांना ‘‘विश्वनाथ’’ या नावानंही ओळखलं जातं. जॉनस ब्राजीलमध्ये लोकांना वेदांत आणि गीता शिकवतात. ते विश्वविद्या नावाची एक संस्थाही चालवतात. रिया-दि-जेनेरोपासून साधारणपणे एक तासभराच्या अंतरावर असलेल्या पेट्रोपोलिस या डोंगरावर त्यांचं विश्वविद्येचं काम चालतं. जॉनस यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं  शिक्षण घेतल्यानंतर स्टॉक मार्केटमधल्या आपल्या कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांना भारतीय संस्कृतीचं  आकर्षण निर्माण झालं. विशेष करून वेदांतामध्ये त्यांना अधिक रूची वाटायला लागली. स्टॉकपासून ते स्पिरिच्युॲलिटीपर्यंत, त्यांनी केलेला हा प्रवास वास्तवामध्ये खूप मोठा आहे. जॉनस यांनी भारतामध्ये वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि चार वर्षे त्यांनी कोइंबतूरच्या आर्ष विद्या गुरूकुलममध्ये वास्तव्य केलं. जॉनस यांच्यामध्ये आणखी एक विशेष गुण आहे, तो म्हणजे आपला संदेश पुढे पोहोचवण्यासाठी ते तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करतात. ते नियमित ऑनलाइन कार्यक्रम करतात. दररोज पॉडकास्ट करतात. गेल्या सात वर्षांमध्ये जॉनस यांनी वेदांत हा विषय दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्‍यांना शिकवला आहे. ते या विषयाचा मोफत अभ्यासक्रम शिकवतात. वेदांत शिकवण्याचं जॉनस एक खूप मोठं काम करतातच शिवाय, ते ज्या भाषेत शिकवतात, ती भाषा समजणा-यांची संख्या खूप मोठी आहे. कोरोना आणि क्वारंटाइनच्या काळामध्ये वेदांत कशी मदत करू शकतो, या विषयी लोकांमध्ये रूची सातत्याने वाढतेय. ‘‘मन की बात’च्या माध्यमातून जॉनस यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या कार्याला शुभेच्छा देतो.

मित्रांनो, अशा प्रकारे आणखी एका बातमीकडे तुमचे लक्ष नक्कीच गेलं असेल. न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. एक भारतीय म्हणून भारतीय संस्कृतीचा असा होत असलेला प्रचार आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो. त्यांनी न्यूझीलँडच्या लोकांची सेवा करताना नवीन यशोशिखर गाठावे, अशी कामना व्यक्त करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 30 नोव्हेंबरला आपण श्रीगुरू नानक देव जी यांचा 551 वा प्रकाश पर्व साजरे करणार आहोत. संपूर्ण दुनियेमध्ये गुरू नानक देवजींचा प्रभाव स्पष्ट रूपानं दिसून येतो.

व्हँन्कोवर ते वेलिंग्टनपर्यंत, सिंगापूर ते साउथ अफ्रिकेपर्यंत त्यांचे संदेश सर्व बाजूंनी ऐकायला येतात. गुरूग्रन्थ साहिबमध्ये म्हटले आहे की, ‘‘ सेवक को सेवा बन आइ’’ याचा अर्थ आहे, सेवकाचे काम, सेवा करणं आहे.’’ गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्वाचे टप्पे आले आणि एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाली. गुरू साहिबने आमच्याकडून ही सेवा करून घेतली. गुरूनानक देव जी यांचं  हे 550 वे प्रकाश पर्व, श्री गुरू गोविंद सिंहजी यांचं 350 वे प्रकाश पर्व, पुढच्या वर्षी श्री गुरू तेग बहादूर जी यांचं 400 वे प्रकाश पर्व ही आहे. मला जाणवतं की, गुरू साहिबांची माझ्यावर विशेष कृपा असली पाहिजे, त्यांनी मला नेहमीच आपल्या कार्यांमध्ये अधिक जवळिकीने सामावून घेतलंय.

मित्रांनो, कच्छमध्ये एक गुरूव्दारा आहे, या लखपत गुरूव्दारा साहिब याविषयी तुम्ही काही जाणता का? श्री गुरू नानक जी आपल्या ‘उदासी’ च्या काळामध्ये लखपत गुरूव्दरा साहिबमध्ये वास्तव्य करीत होते. 2001च्या भूकंपामध्ये या गुरूव्दाराचंही नुकसान झालं होतं. गुरू साहिबांच्या कृपेमुळेच मी त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुनिश्चित करू शकलो. यावेळी केवळ गुरूव्दाराचा जीर्णोद्धार केला असं नाही तर  तितक्याच गौरवानं आणि भव्यतेनं गुरूद्धाराची पुन्हा स्थापना करण्यात आली. आम्हा सर्वांना गुरू साहिबांचा खूप आशीर्वादही मिळाला. लखपत गुरूव्दाराच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना 2004 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार म्हणून ‘ॲवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन’ दिलं गेलं. पुरस्कार देणा-या परीक्षकांनी जीर्णोद्धार करताना शिल्पाशी संबंधित सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने विशेष लक्ष दिलं  आहे, हे जाणलं, आणि आपल्या परीक्षणाच्या टिपणीमध्ये नोंदवलं की, या गुरूव्दाराच्या पुनर्निर्माण कार्यामध्ये शीख समुदायानं केवळ सक्रिय भागीदारी नोंदवली असं नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं आहे. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीही नव्हतो, त्यावेळीच लखपत गुरूव्दाराला जाण्याचे भाग्य मला लाभलं. तिथं जाऊन मला असीम ऊर्जा मिळत होती. या गुरूद्वारामध्ये जाऊन प्रत्येकाला धन्य झाल्याचं जाणवतं. गुरू साहिबांनी  माझ्याकडून निरंतर सेवा करवून घेतली, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहिब कॉरिडॉर मुक्त करणं ही ऐतिहासिक घटना झाली. या गोष्टीची आठवण मी अगदी जीवनभर मनाच्या कोप-यात साठवून ठेवणार आहे. आम्हा सर्वांचेच भाग्य थोर आहे, म्हणूनच आम्हाला श्रीदरबार साहिबांची सेवा करण्याची एक संधी मिळाली. परदेशात वास्तव्य करणा-या  आमच्या शीख बंधू-भगिनींनीसाठी आता दरबार साहिबांच्या सेवेसाठी निधी पाठवणे आता अधिक सुलभ झालंय. या उपायांमुळे संपूर्ण विश्वभरातील संगत, दरबार साहिबाच्या अधिक जवळ आली आहे.

मित्रांनो, लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते. आणि आज आपण पाहिलं की, दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे. मानवतेची सेवा केली. ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते. आपण सर्वांनी सेवकाप्रमाणे काम करत रहावं, अशी माझी कामना आहे. गुरू साहिबांनी माझ्याकडून आणि देशवासियांकडून अशाच प्रकारे सेवा घ्यावी. पुन्हा एकदा गुरू नानक जयंतीनिमित्त, माझ्या खूप-खूप शुभेच्छा!!

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या विद्यार्थ्‍यांबरोबर संवाद साधण्याची, त्यांच्या शैक्षणिक प्रवासातल्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी आयआयटी गुवाहाटी, दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, गांधी नगरचे पेट्रोलियम विद्यापीठ,म्हैसूर विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठांच्या विद्यार्थ्‍यांबरोबर संवाद साधू शकलो. देशातल्या युवापिढीबरोबर संवाद साधून मी अगदी ताजातवाना झालो, हा अनुभव मला ऊर्जावान बनवणारा होता. विद्यापीठाचा परिसर म्हणजे तर एक प्रकारे मिनी इंडियाचे असतो. एकीकडे विद्यापीठ परिसरामध्ये भारताच्या विविधतेचे दर्शन होते तर तिथंच दुसरीकडे नवभारतासाठी मोठ मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे ‘पॅशन’ही दिसते. कोरोनाच्याआधीच्या दिवसांमध्ये मी ज्यावेळी असा संवाद साधण्यासाठी कोणत्या संस्थेमध्ये जात होतो, त्यावेळी माझा आग्रह असायचा की, आजूबाजूच्या शाळांमधल्या गरीब मुलांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं जावं. ती मुलंच त्या कार्यक्रमामध्ये माझे विशेष पाहुणे बनून यायची. एक छोटासा मुलगा, त्या भव्य कार्यक्रमामध्ये कोणाही युवकाला डॉक्टर, इंजिनीअर, संशोधक बनताना पाहतो, कोणाला पदक स्वीकारताना पाहतो, त्यावेळी त्याच्याही मनामध्ये तो एक नवीन स्वप्न पहायला लागतो. आपणही असंच करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्या मनात जागृत होतो. संकल्प करण्यासाठी त्याला एक प्रेरणा मिळते.

मित्रांनो, याशिवाय आणखी एक गोष्ट जाणून घेण्यात मला नेहमीच रूची असते, ती म्हणजे संस्थेच्या ‘अलूमिनी’विषयी; म्हणजेच त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कोण आहेत, त्या संस्थेने आपल्या माजी विद्यार्थी वर्गाशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का? त्यांचे माजी विद्यार्थी संघटन, नेटवर्क किती जीवंत आहे....

माझ्या युवा मित्रांनो,आपण जोपर्यंत एखाद्या संस्थेत शिक्षण घेत असतो, तोपर्यंतच, आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो, मात्र आपण आजन्म तिथले ‘माजी विद्यार्थी’ असतो. शाळा-कॉलेज संपल्यानंतरही दोन गोष्टी कधीही संपत नाहीत- एक आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव आणि  दुसरी आपल्या शाळा-कॉलेजविषयी आपल्याला असलेली आत्मीयता! जेव्हा माजी विद्यार्थी आपापसांत गप्पा मारतात, तेव्हा शाळा-कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणी, पुस्तकं आणि अभ्यासापेक्षा कॉलेज परिसरात घालवलेला वेळ, आणि मित्र-मैत्रिणींना सोबतचे क्षण यांच्या आठवणीं वरच जास्त गप्पा होतात. आणि याच आठवणींमधून आपल्या संस्थेसाठी काहीतरी करण्याची भावना जन्माला येते.

जिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे, त्या संस्थेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते? मी अशा काही उपक्रमांविषयी ऐकलं आहे, जिथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शिक्षणसंस्थांसाठी खूप काही केलं आहे. आजकाल माजी विद्यार्थी याबाबतीत खूप उत्साहानं काम करतांना दिसतात. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थांना चर्चासत्र सभागृह, व्यवस्थापन केंद्र, इनक्युबेशन केंद्र अशा अनेक व्यवस्था स्वतः उभारून दिल्या. या सगळ्या उपक्रमांमुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होत जातो. आयआयटी दिल्लीने एका ‘देणगी निधी’ची सुरुवात केली आहे, जी अत्यंत उत्तम कल्पना आहे.जगातल्या अनेक नावाजलेल्या  विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे ‘देणगी निधी’ स्थापन करण्यात आले आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांना मदत मिळते. मला वाटतं, की भारतातील विद्यापीठे देखील अशा प्रकारची संस्कृती स्थापन करण्यासाठी सक्षम आहेत.

जेव्हा काही परतफेड करण्याची वेळ येते, तेव्हा काहीही कमी किंवा जास्त नसते. अशावेळी छोट्यात छोटी मदतही खूप महत्वाची असते. अनेकदा माजी विद्यार्थी आपल्या संस्थांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी किंवा कौशल्य विकासाचे उपक्रम सुरु करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतात. काही शाळांच्या माजी विद्यार्थी संघटनांनी ‘मार्गदर्शक कार्यक्रम’ देखील सुरु केले आहेत. यात ते वेगवेगळ्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसंच, ते शिक्षणातल्या संधींवरही विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. अनेक शाळांमध्ये, विशेषतः निवासी शाळांच्या माजी विद्यार्थी संघटना खूप भक्कम आणि सक्रीय आहेत, त्या क्रीडा स्पर्धा आणि समुदाय सेवा असे उपक्रमही आयोजित करतात. मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आग्रह करेन, की त्यांनी ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलं आहे, त्यांच्याशी आपले बंध अधिक मजबूत करत राहा . मग ती शाळा असो, कॉलेज असो किंवा विद्यापीठ असो. माझी सर्व संस्थांनाही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. काही सृजनशील मंच विकसित करावेत, जेणेकरुन माजी विद्यार्थ्यांचा त्यात सक्रीय सहभाग असेल. मोठी महाविद्यालये आणि विद्यापीठेच नाहीत, तर आमच्या गावातील शाळांच्या माजी विद्यार्थ्यांची देखील एक मजबूत आणि सक्रीय अशी संघटना असायला हवी.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पाच डिसेंबरला श्री अरविंदो यांची पुण्यतिथी आहे. श्री अरबिंदो यांच्याविषयी आपण वाचतो, तेवढी त्यांच्या विचारांची खोली आपल्याला जाणवत जाते. माझ्या युवा मित्रांनो,  श्री अरबिंदो यांच्याविषयी तुम्ही जेवढं अधिक जाणाल, तेवढेच तुम्ही स्वतःला समजू शकाल, स्वतःला समृद्ध करु शकाल. आयुष्याच्या ज्या भावावस्थेत आपण आज आहात, जे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात, त्यामध्ये, आपल्याला कायम श्री अरबिंदो यांच्याकडून एक नवी प्रेरणा मिळत राहील, एक नवा मार्ग सापडत राहील. जसे आज आपण सर्व जण, ‘लोकल साठी व्होकल’ ही मोहीम चालवतो आहोत, तर अशा वेळी श्री अरबिंदो यांचे स्वदेशीविषयीचे विचार आपल्याला मार्ग दाखवत आहेत. बांग्ला भाषेतली एक कविता अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणतात--‘छुई शुतो पॉय-मॉन्तो आशे तुंग होते |

दिय-शलाई काठि, ताउ आसे पोते ||

प्रो-दीप्ती जालिते खेते, शुते, जेते |

किछुते लोक नॉय शाधीन ||

याचा अर्थ, आपल्याकडे सुई, आणि आगपेटीची डबी  अशा वस्तू सुद्धा परदेशी जहाजांमधून येतात. खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या, कोणत्याही बाबतीत लोक स्वतंत्र नाहीत.

ते म्हणतही असत, आपण आपल्या भारतीय कारागिरांनी, कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असा स्वदेशीचा अर्थ आहे.

मात्र, श्री अरबिंदो यांचा परदेशांकडून काही शिकण्याला विरोध होता, असे अजिबात नाही.  जिथे जे काही नवं आहे, ते आपण शिकावं, जे आपल्या देशासाठी चांगलं असेल, त्यात आपण सहकार्य करावं, प्रोत्साहन द्यावं, हाच तर आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राचा मतितार्थ आहे. विशेषतः स्वदेशीचा वापर करण्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत, ते आज प्रत्येक भारतीयाने वाचायला हवेत. मित्रांनो, याचप्रमाणे शिक्षणाविषयी देखील,श्री अरबिंदो यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. ते शिक्षणाकडे केवळ पुस्तकी ज्ञान, पदवी आणि नोकरी मिळवण्याचं साधन, एवढ्याच मर्यादित अर्थाने बघत नसत. श्री अरबिंदो म्हणत- की आपले राष्ट्रीय शिक्षण, आपल्या युवा पिढीच्या मन आणि बुद्धीला प्रशिक्षित करणारे असायला हवे. बुद्धीचा वैज्ञानिक विकास होत रहावा, आणि मनात भारतीय भावना असाव्यात, तरच, एक युवक देश आणि समाजात एक उत्तम नागरिक म्हणून विकसित होऊ शकेल. श्री अरबिंदो यांनी शिक्षणाविषयी जी मते तेव्हा मांडली होती, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या आज देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या रुपानं पूर्ण होत आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात, शेती आणि त्याच्याशी सबंधित गोष्टींशी नवे आयाम जोडले जात आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या न कोणत्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांना वचन दिलं होतं, त्या मागण्या आज पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावर असलेली बंधने केवळ रद्दच होणार नाहीत, तर त्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत. या अधिकारांमुळे अगदी अल्पावधीतच, शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले आहेत.

महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांनी या नव्या कृषी कायदयाचा वापार कसा केला ते जाणून घेतले पाहिजे.  त्यानी शेतात मका लावला आणि उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले. पिकाची एकूण किंमत 3 लाख 32 हजार इतकी निश्चित झाली.  जितेंद्र भोई यांना पंचवीस हजार रुपये आगावू रक्कम म्हणून मिळाले. ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना पंधरा दिवसांत दिले जातील. मात्र नंतर अशी काही परीस्थिती निर्माण झाली, की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा  मात्र महिनोन्महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीत,-मकाखरेदीत कदाचित वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे व्यवहार होत असतील, त्याच परंपरेने ते ही वागत होते. अशाप्रकारे चार महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत. अशा स्थितीत, केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले, ते त्यांच्या कामी आले. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे, की शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो.

या कायद्यात आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे. या कायद्यात, अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या भागातल्या, उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करावं लागेल. आता, जेव्हा अशा कायद्यांची ताकद आपल्या शेतकरी बंधूंजवळ होती, तेव्हा त्यांच्या तक्रारीचं निवारण तर निश्चित होणार होतं. जितेंद्रजी यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले. म्हणजेच, कायद्याची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ जितेंद्रजी यांची ताकद झाली. क्षेत्र कुठलेही असो, त्या प्रत्येक क्षेत्रात, भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि  खरी माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे ही खूप मोठी शक्ती असते. शेतकऱ्यांमध्ये अशीच जागृती करण्याचे काम, राजस्थान मधल्या बारां जिल्ह्यात राहणारे मोहम्मद असलम जी करत आहेत. ते शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. होय, आपण बरोबर ऐकलंत- शेतकरी उत्पादक संघटनेचे सी ई ओ ! मला आशा आहे, की मोठमोठ्या कंपन्यांच्या सी ईओ ना हे ऐकून चांगलं वाटलं असेल की देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांचे देखील सी ई ओ असतात. तर मित्रांनो, मोहम्मद असलम जी यांनी आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये ते दररोज, आसपासच्या बाजारमध्ये काय भाव सुरु आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. त्यांची स्वतःची संघटना देखील शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत असते. त्यामुळेच, त्यांच्या या उपक्रमामुळे, शेतकऱ्यांना मालविक्रीचा निर्णय घ्यायला मदत होते.

मित्रांनो, जागृती आहे, तर जिवंतपणा आहे. आपल्या जागरूकतेच्या प्रयत्नांतून हजारो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे एक कृषी उद्योजक आहेत, श्री वीरेंद्र यादव जी. वीरेंद्र यादव जी पूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असत. दोन वर्षांपूर्वी ते भारतात आले आणि आता हरियाणातल्या कैथल इथं राहतात. इतर शेतकऱ्यांसारखी त्यांना सुद्धा शेतातल्या तण-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक मोठी समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरु आहे. मात्र आज, मन की बात’ या कार्यक्रमात मी वीरेंद्र जी यांचा विशेष उल्लेख यासाठी करतो आहे कारण त्यांचे प्रयत्न वेगळे आहेत, एक नवी दिशा दाखवणारे आहेत. या पिकाच्या तण-अवशेषांवर तोडगा काढण्यासाठी वीरेंद्रजी यांनी या तणाचे गठ्ठे बांधणारी स्ट्रॉ बेलर मशीन विकत घेतली. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून आर्थिक मदतही  मिळाली. या मशीनने त्यांनी या तणाचे गठ्ठे तयार केलेत, गठ्ठे तयार केल्यावर त्यांनी हे तण ॲग्रो एनर्जी प्लांट आणि पेपर मिलला विकले. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की वीरेंद्र जी यांनी केवळ दोन वर्षात हे तण विकून दीड कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यापार केला आहे आणि त्यातही सुमारे 50 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. याचा लाभ त्या शेतकऱ्यांनाही मिळाला आहे, ज्यांच्याकडचे तण वीरेंद्रजी यांनी घेतले आहे. आपण कचऱ्यातून सोनं हा वाक्प्रचार तर ऐकला होता. पण हे कृषी तण विकून पैसा आणी पुण्य दोन्ही मिळवण्याचं हे विशेष उदाहरण आहे. माझी युवकांना, विशेषतः कृषीविद्यापीठांमध्ये अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना ही आग्रही विनंती आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक कृषीविषयी, अलीकडेच झालेल्या कृषी सुधारणांविषयी माहिती द्यावी, जागृती करावी. यामुळे, देशात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनात आपलाही सहभाग होऊ शकेल.

माझ्या प्रिय देश बांधवानो,

मन की बात’ कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या, विविध प्रकारच्या अनेक  विषयांवर चर्चा करतो. मात्र, अशा एका गोष्टीला देखील आता जवळपास एक वर्ष होत आहे, जीची आपण कधीच आनंदाने आठवण करु इच्छित नाही. आता जवळपास एक वर्ष होत आले, जेव्हा जगात पहिल्यांदाच कोरोनाचा आजाराविषयी माहिती कळली होती. तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण जगानंच अनेक चढउतार पाहिलेत. लॉकडाऊनच्या काळातून बाहेर पडत, आता लसीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत  घातक आहे. आपल्याला, कोरोनाविरुद्धचा आपला लढा पुढेही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा आहे.

मित्रांनो, काही दिवसांनीच, सहा डिसेंबर रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी देखील आहे. हा दिवस बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासोबतच, देशाविषयीचे आपले संकल्प, संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे, तिचे स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाच्या बहुतांश भागात, थंडीचा कडाका देखील वाढतो आहे.

अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील सुरु झाली आहे. या हवामानात, आपल्याला कुटुंबांतल्या मुलांची आणि ज्येष्ठांची  विशेष काळजी घ्यायची आहे, स्वतः देखील सतर्क रहायचं आहे. जेव्हा लोक आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंची, गरिबांची काळजी करतात, तेव्हा ते  बघून मला खूप आनंद होतो. उबदार कपडे देऊन लोक त्यांना मदत करतात. अनाथ प्राण्यांना देखील हिवाळ्यात थंडीमुळे खूप त्रास होतो.अनेक लोक त्यांची मदत करायला देखील पुढे येतात. आपली युवा पिढी अशा कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात’ मध्ये भेटू, तेव्हा 2020 चे हे वर्ष संपत असेल. नवी उमेद, नवा विश्वास घेऊन आपण पुढे वाटचाल करुआपल्या ज्या काही सूचना असतील, कल्पना असतील, त्या माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

आपण सर्व निरोगी रहा, देशासाठी काम करत रहा. खूप खूप धन्यवाद !!!

M.Chopade/AIR/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676939) Visitor Counter : 270