वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांचे भारतीय उद्योगाला गुणवत्ता आणि उत्पादकता यांच्यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्याचे आवाहन
Posted On:
24 NOV 2020 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2020
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय उद्योगाला गुणवत्ता आणि उत्पादकता यांच्यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. आज विविध उद्योग संघटनांच्या कार्यालयीन अधिकारी वर्गाशी गोयल यांनी संवाद साधला. आगामी काही महिने या विषयावरच्या विविध पैलूवर विचार विनिमय करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच भारताला मालाचा उच्च दर्जा, कार्यक्षम उत्पादक, व्यापारी आणि सेवा प्रदाता म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, असेही गोयल म्हणाले. अशा पद्धतीचे कार्य उत्पादनाच्या क्षेत्रानुसार आणि विभागीय स्तरावर भागधारकांमध्ये ज्ञान समायिकीकरणाने होऊ शकते. या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. दुस-या तिमाहीमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये वृद्धी झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय उद्योगांनी कोविड काळाचाही चांगला विनियोग करून घेतला आणि मिश्र उत्पादने घेऊन गुणवत्ता आणि उत्पादकतेवर लक्ष केंद्रीत केले. आता सर्व उद्योग व्यवसायांनी ‘मिशन-मोड’ मध्ये कार्य करण्याचे आवाहन मंत्री गोयल यांनी केले. उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता यामुळेच संकटाचे संधीमध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होऊ शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अवघड परिस्थितीमध्ये भारतीय उद्योगामध्ये असलेली लवचिकता आणि आत्मविश्वास यांचे दर्शन झाले आहे. त्यामुळेच देशाला महामारीमध्ये सामना करण्यासाठी मदत मिळाली, असे सांगून उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले, आता अर्थव्यवस्था पुन्हा चांगली होत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्येही भारताची प्रतिष्ठा चांगलीच वाढली आहे. त्यामुळे भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहिले जात आहे. आगामी काळात भारत मजबूत आणि विजयी ठरणार असल्याचा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. एकूणच उद्योग, व्यवसायाची परिसंस्थेमध्ये परिवर्ततन करण्यात आल्यामुळे जागतिक पातळीवर भारत अधिक शक्तिशाली बनू शकणार आहे. लॉकडाउन संपुष्टात आल्यामुळे या टप्प्यावर नवीन समस्या निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊन सर्वांनी कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आरोग्यविषयक सर्वतोपरी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही गोयल यांनी सांगितले. उद्योग संघटनांनी केलेल्या शिफारशींची सरकार नोंद घेत असून वेगवेगळ्या विभागांकडून त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्याला योग्य प्रतिसाद देण्यात येईल, असे गोयल यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीचा उद्रेक संपूर्ण देशभरात झाल्यापासून उद्योग मंत्री सातत्याने उद्योग संघटनांबरोबर बैठका घेऊन सल्ला मसलत करीत आहेत, याच मालिकेचा भाग म्हणून आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याआधी साधलेल्या संवादामध्ये अनेक प्रकारच्या शिफारसी, अभिप्राय आले. उद्योजकांच्या या प्रतिसादामुळे सरकारला धोरणात्मक कृती करण्यासाठी मदत झाली. महामारीमुळे निर्माण झालेले नवनवीन प्रश्न सोडविणे शक्य झाले. या बैठकीमध्ये विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
* * *
M.Iyengar/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675467)
Visitor Counter : 275