शिक्षण मंत्रालय

एआयसीटीईच्या वतीने 46 ऑनलाइन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमांचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन


‘एफडीपी’च्या माध्यमातून 1,000 कार्यक्रमामध्ये एक लाखांपेक्षा जास्त जणांना प्रशिक्षण देण्याच्या जागतिक विक्रमाला ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, लंडन’ ची मान्यता

Posted On: 23 NOV 2020 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते आज एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण संस्थातल्या प्राध्यापकांसाठी अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. यामध्ये 46 ऑनलाइन प्रशिक्षण विकास कार्यक्रमाचे उद्‌घाटन निशंक यांच्या हस्ते आज आभासी माध्यमातून करण्यात आले. देशभरातल्या 22 राज्यांमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी शिक्षण मंत्री पोखरियाल म्हणाले, अटल अकादमीचा ‘बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये समावेश करण्यात आला आहे, ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. लंडनस्थित संघटनेने एफडीपीच्या कार्याला जागतिक विक्रम केल्याबद्दल मान्यता दिली आहे. यामध्ये एफडीपीमार्फत 100 पेक्षा जास्त उदयोन्मुख क्षेत्रामधील 1000 ऑनलाइन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा लाभ एक लाख प्राध्यापकांना होणार आहे. यामध्ये आयआयटी, एनआयटी आणि आयआयआयटी यासारख्या मान्यवर संस्थेतले प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यावर्षी एफडीपी ऑनलाइन कार्यक्रमासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असेही ‘निशंक’ यांनी यावेळी सांगितले.

अटल अकादमीच्यावतीने एफडीपी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नोंदणी करण्यापासून ते सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यापर्यंतची सर्व कार्ये करण्यात येतात नमूद करून मंत्री पोखरियाल म्हणाले, सन 2020-21 मध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, जीवन कौशल्ये, आरेखन आणि माध्यम या क्षेत्रांविषयी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एफडीपी ऑनलाइन प्रशिक्षण देणार आहे.

नियोजित 1000 एफडीपीपैकी आत्तापर्यंत प्रशिक्षणाचे 499 कार्यक्रम पूर्ण झाले आहेत, असे नमूद करून पोखरियाल म्हणाले, यामध्ये 70,000 पेक्षा जास्त प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 2019-20 मध्ये पाच दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारे 185 कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉक चेन, रोबोटिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, डाटा सायन्स, सायबर सुरक्षा, 3डी प्रिटिंग आणि डिझाईन आणि ऑगमेंटेड रिॲलिटी , व्हर्च्यअल रिॲलिटी या 9 महत्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ 10,000 सहभागितांनी घेतला.

एआयसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल डी. सहस्त्रबुद्धे म्हणाले, डिजिटल शिक्षण आणि संगणकासारख्या स्मार्ट साधनांचा शिक्षणामध्ये विद्यार्थ्‍यांकडून वापर वाढला आहे. सीबीएसई शिक्षकांना आता ‘फ्लिप क्लासरूम’ आणि ‘ब्लेंडेड लर्निंग’ या संकल्पनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता शिक्षक त्यांचे व्याख्यान रेकॉर्ड करतात आणि विद्यार्थ्‍यांना ते पाठवतात. विद्यार्थी घरामध्येच या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करतात.

अटल अकादमीच्या वतीने प्राध्यापक, शिक्षकांना तंत्रज्ञान वापराचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  एआयसीटीईचे उपाध्यक्ष प्राध्यापक  एम.पी. पूनिया, सदस्य सचिव प्राध्यापक राजीव कुमार, अटल अकादमीचे संचालक डॉ. रवींद्र कुमार सोनी विशेष प्रयत्न करीत आहेत.

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675135) Visitor Counter : 148