संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदल अंदमान समुद्रात '"सिमबेक्स -20 " सराव आयोजित करणार

Posted On: 22 NOV 2020 8:29PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदल (आयएन) अंदमान समुद्रात 23 ते 25 नोव्हेंबर 2020 दरम्यान 27 व्या भारत - सिंगापूर द्विपक्षीय सागरी सराव सिमबेक्स -20 चे आयोजन करत  आहे.

भारतीय नौदल आणि सिंगापुर नौदल (आरएसएन) यांच्यात 1994  पासून दरवर्षी सिमबेक्स  सरावाचे आयोजन केले जाते. परस्पर आंतर-परिचालन क्षमता  वाढवणे आणि एकमेकांच्या  सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे हा यामागचा उद्देश आहे. गेल्या दोन दशकांमध्ये प्रगत नौदल कौशल्य समाविष्ट करण्यासाठी या सरावाची  व्याप्ती आणि जटिलता  निरंतर वाढली आहे,

2020  च्या सिमबेक्समध्ये   राणा विनाशिका आणि चेतक हेलिकॉप्टरसह भारतीय नौदलाची जहाजे आणि स्वदेशी बनावटीच्या कामोर्ता आणि कर्मुक या छोट्या शस्त्रसज्ज जहाजांचा   सहभाग असेल. या व्यतिरिक्त, पाणबुडी सिंधुराज आणि पी 8 आय सागरी विमान देखील या सरावात सहभागी होतील.

सिंगापूर नौदलाचे  प्रतिनिधित्व फॉर्म्युडेबलक्लास फ्रिगेट्स इंटरेपिडआणि स्टडफास्ट आणि एस 70 बी हेलिकॉप्टर आणि एन्ड्युरन्स  क्लास लँडिंग शिप टँक एन्डीएवर करणार आहेत.

कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन हा सराव आयोजित करण्यात आला आहे.  दोन मैत्रीपूर्ण नौदल  आणि सागरी शेजार्‍यांमधील समुद्री क्षेत्रातील  परस्पर विश्वास आणि आत्मविश्वास, ताळमेळ  आणि सहकार्याची उच्च पातळी हा सराव अधोरेखित करतो. सिमबेक्स -20 मध्ये दोन मित्रदेशांचे नौदल  तीन दिवसांच्या सरावादरम्यान विविध प्रात्यक्षिके सादर करतील.

भारत आणि सिंगापूर यांच्यात विशेषत: सागरी क्षेत्रात सागरी सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीकोनातून उच्च स्तरीय  समन्वय आणि विचारांचे अभिसरण दर्शवणारा  सिमबेक्स सराव  नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रति त्यांची वचनबद्धता अधोरेखित करतो.

 

Jaydevi PS/S.Kane /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1674942) Visitor Counter : 115