पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली
जल जीवन अभियानांतर्गत 2.6 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी देण्यात आली आहे
पाईपमधून पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे गरीब कुटुंबांचे आरोग्य सुधारेलः पंतप्रधान
या पाणी प्रकल्पांमुळे विंध्याचलमधील पाणीटंचाई आणि सिंचन समस्या सुटतीलः पंतप्रधान
Posted On:
22 NOV 2020 3:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील विंध्यांचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण जल आणि स्वच्छता समिती / पाणी समिती सदस्यांशी संवाद साधला. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी आज पायाभरणी केलेल्या प्रकल्पांमुळे 2,995 गावांमधील ग्रामीण कुटुंबांना घरात नळ जोडणी उपलब्ध होणार असून या जिल्ह्यांतील सुमारे 42 लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. या सर्व गावांमध्ये गाव पाणी आणि स्वच्छता समिती / पाणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्या परिचालन आणि देखभालीची जबाबदारी सांभाळतील. प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 5,555 कोटी रुपये आहे.हे प्रकल्प 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की जल जीवन अभियान सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षात उत्तर प्रदेशातील लाखो कुटुंबांसह 2 कोटी 60 लाख पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांच्या घरात पिण्याच्या पाण्याच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले कि जल जीवन अभियानांतर्गत घरात पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे आपल्या माता-भगिनींचे जीवन सुकर होत आहे. ते म्हणाले की याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरीब कुटुंबांना अशुद्ध पाण्यामुळे होणारे कॉलरा , टायफाइड, एन्सेफलायटीस यासारख्या आजारांमध्ये घट झाली आहे. विपुल प्रमाणात संसाधने असूनही विंध्याचल किंवा बुंदेलखंड प्रदेशात कमतरता असल्याबद्दल पंतप्रधांनानी खेद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अनेक नद्या असूनही, हे प्रदेश सर्वात तहानलेले आणि दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखले जात होते आणि अनेक लोकांना येथून स्थलांतर करण्यास भाग पाडले होते. ते म्हणाले की आता पाणीटंचाई आणि सिंचनाचे प्रश्न या प्रकल्पांद्वारे सुटतील आणि ते जलद विकासाचे लक्षण आहे.
विंध्यांचलमधील हजारो खेड्यांपर्यंत पाईपद्वारे पाणी पोहोचेल तेव्हा या भागातील मुलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासात सुधारणा होईल असे ते म्हणाले. जेव्हा एखाद्याला आपल्या गावाच्या विकासासाठी निर्णय घेण्याचे आणि त्या निर्णयावर काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते तेव्हा गावातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढतो. स्वावलंबी भारताला आत्मनिर्भर खेड्यांमधून सामर्थ्य मिळते असे ते म्हणाले.
महामारीच्या काळात प्रतिसादात्मक प्रशासन पुरवल्याबद्दल आणि सुधारणांचा वेग कायम ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले. मोदी यांनी या प्रदेशातील विकासकामांची रूपरेषा सांगितली. एलपीजी सिलिंडर, वीजपुरवठा, मिर्झापूर येथे सौर प्रकल्प, सिंचन प्रकल्प पूर्ती आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे यासाठी ओसाड जमिनीवर सौर प्रकल्पांची तरतूद केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वामित्व योजनेचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी माहिती दिली की निवासी व जमीन मालमत्तांसाठी सत्यापित मालकी करार मालकांना दिले जात आहेत ज्यामुळे स्थैर्य आणि मालकी हक्क निश्चित होतील. यामुळे समाजातील गरीब वर्गाच्या मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात हमी मिळेल आणि मालमत्ता पतपुरवठ्यासाठी तारण म्हणून वापरणे शक्य होईल.
आदिवासी लोकसंख्येच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की विशेष प्रकल्पांतर्गत योजना आदिवासींपर्यंत पोहोचत आहेत. उत्तर प्रदेशसह अशा प्रदेशात शेकडो एकलव्य मॉडेल शाळा कार्यरत आहेत. प्रत्येक आदिवासी बहुसंख्य तालुक्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. वन्य उत्पादनांवर आधारित प्रकल्प देखील राबवले जात आहेत. आदिवासी भागात निधीची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा खनिज निधीची स्थापना केली गेली आहे आणि अशा योजनांमागे विचार हा होता की अशा क्षेत्रांमधून निर्माण झालेल्या संसाधनांचा काही भाग स्थानिक स्तरावर गुंतवला जाईल. उत्तर प्रदेशात 800 कोटी रुपये या निधी अंतर्गत जमा झाले असून 6000 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
अजूनही धोका कायम आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी लोकांना कोरोनाविरूद्ध सतर्क राहण्याचे आवाहन केले. आणि लोकांना अतिशय प्रामाणिकपणे मूलभूत खबरदारी घ्यायला सांगितले.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674872)
Visitor Counter : 236
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam