विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-सीआयएमएफआरच्या प्लॅटिनम वर्ष स्थापना दिन कार्यक्रमाचे डॉ.हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
सीएसआयआर-सीआयएमएफआरने विकसित केलेल्या तीन स्वदेशी तंत्रज्ञान आणि सुविधा देशाला केल्या अर्पण
खनिज कामामध्ये डिजिटल पर्यायांचा वापर करून सीआयएमएफआरने बहुशाखीय संशोधनातून तंत्रज्ञान आणि स्वयंचलित कार्यपद्धती विकसित करण्याचे हर्षवर्धन यांचे आवाहन
मृदा आणि जैवविविधता यांचे संवर्धन, कार्बन उत्सर्जन, सामाजिक-आर्थिक आणि कृषी परिसंस्था, वन्यजीव व्यवस्थापन नियोजन, निकृष्ट जैव-पुनप्र्राप्ती परिसंस्था यांच्यावर लक्ष देण्याची गरज - डॉ.हर्षवर्धन
हवामान बदल आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पॅरिस करारानुसार वचनबद्धतेची पूर्तता केली जाण्याची आशा - डॉ. हर्षवर्धन
Posted On:
17 NOV 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर 2020
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते धनबाद येथील सीआयएमएफआर - म्हणजे खनिज आणि इंधन संशोधन केंद्राच्या प्लॅटिनम ज्युबिली स्थापना दिन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नवी दिल्ली येथील सीएसआयआर म्हणजेच विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्यावतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी ‘कोल टू सिनगॅस प्लँट आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्ट्रॅटेजिक अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कोल गॅसिफिकेशन यांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर कोळसा आयातीला पर्यायी आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान देशाला यावेळी समर्पित करण्यात आले.
गेल्या सात दशकांपेक्षाही जास्त काळापासून सीएसआयआर-सीआयएमएफआर यांनी अनेक महत्वपूर्ण टप्पे पार करीत कार्य केल्याबद्दल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘ सीआयएमएफआरने खनिज कामामध्ये ओआयटी म्हणजे इंटरनेटच्या मदतीने डिजिटल पर्यायांचा वापर करून बहुशाखीय संशोधनातून तंत्रज्ञान आणि स्वयंचलित कार्यपद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे. मृदा आणि जैवविविधता यांचे संवर्धन, कार्बन उत्सर्जन, सामाजिक-आर्थिक आणि कृषी परिसंस्था, वन्यजीव व्यवस्थापन नियोजन, निकृष्ट जैव-पुनःप्राप्ती परिसंस्था यांच्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचेही हर्षवर्धन यांनी अधोरेखित केले.
हवामान बदलाचा विचार करून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पॅरिस करारानुसार वचनबद्धतेची पूर्तता करण्यात येईल अशी, आशा डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली.
ऊर्जा क्षेत्रातले नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, नवसंकल्पना आणि संशोधन तसेच विकास यांच्या मदतीने आपण ऊर्जा सुरक्षेचे लक्ष्य साध्य करू शकतो. सर्व भारतीयांची ऊर्जेची गरज सुनिश्चित करण्यात येत आहे. ऊर्जा क्षेत्रांच्या आवश्यकता लक्षात घेऊन सीआयएमएफआरसारख्या संशोधन संस्था विविध स्तरावर कार्यविस्तार करू शकतील, असेही डॉ. हर्षवर्धन यावेळी म्हणाले.
सीआयएमएफआरने रस्ते, बोगदे, जलविद्युत प्रकल्प, खाणींमध्ये भूमिगत बांधकाम करणे यासारख्या अभियांत्रिकी संशोधन कार्य केले, त्यामुळे भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान या सीमांवर रस्ते बांधणीचे काम वेगाने होण्यासाठी मदत झाली, त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी आनंद व्यक्त केला. सीमा रस्ते संघटनेसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुकही केले.
आपल्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी केवळ भारतातच नाही तर, म्यानमार, अफगाणिस्तान, भूतान या देशांमध्ये उभारण्यात येत असलेल्या मोठ्या प्रकल्पांनाही तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, याचे त्यांनी कौतुक केले.
या संस्थेच्या स्थापनेच्या प्लॅटिनम ज्युबिली कार्यक्रमाच्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच इतर संस्थांना सहकार्य करण्याच्या पाच करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.
या कार्यक्रमामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य डॉ. व्ही.के सारस्वत, नीती आयोगाचे डॉ. शेखर सी. मांडे, सीएसआयआरचे महा संचालक आणि डीएसआयआरचे सचिव डॉ. प्रदीप सिंह, सीएसआयआर -सीआयएमएफआरचे संचालक आणि इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673570)
Visitor Counter : 230