रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

डीआरडीओ ने प्रवासी बसेससाठी विकसित केलेल्या अग्नीशोधक आणि शमन व्यवस्थेची संरक्षण मंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्र्यांसमोर प्रात्याक्षिके

Posted On: 09 NOV 2020 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 नोव्‍हेंबर 2020


डीआरडीओ- म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास  संघटनेने, प्रवासी बसेससाठी विकसित केलेल्या अग्नीशोधक आणि अग्नीशमन व्यवस्थेची (FDSS)प्रात्याक्षिके आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर डीआरडीओ भवन येथे करण्यात आली. बसमधील प्रवासी भागासाठी जलतुषारआधारित FDSS आणि इंजिनातील आग विझवण्यासाठी वायू आधारित FDSS व्यवस्था वापरण्यात आली. यावेळी दोन्ही मंत्र्यांना, संस्थेचे  इतर प्रकल्प आणि व्यवस्थांचीही माहिती देण्यात आली.

डीआरडीओच्या दिल्ली येथील अग्नी स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा- CFEES या संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याच्या मदतीने बसमधल्या प्रवाशांच्या भागात लागलेली आग केवळ 30 सेंकदात कळू शकते आणि त्यानंतर 60 सेंकदात तिच्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते. FDSS मध्ये 80 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि 6.8 किलो नायट्रोजन सिलेंडर्स विविध ठकाणी बसवण्यात आले आहेत.  तर इंजिनसाठीच्या FDSS मध्ये एअरोसोल जनरेटर्स लावण्यात आली असून त्यांच्या मदतीने केवळ पाच सेकंदात अग्नी शमन करणे शक्य आहे.

अग्नी धोका व्यवस्थापन, अग्नीशमन अशा विषयात CFEES  संस्थेचे विशेष नैपुण्य आहे. या केंद्राने युद्धाचे टॅंक, जहाजे आणि पाणबुड्यांसाठी अग्नीशमन व्यवस्था विकसित केली आहे. प्रवासी बसेस मध्ये आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान वापरुन CFEESने ही विशेष व्यवस्था विकसित केली आहे. विशेषतः लांबचा प्रवास करणाऱ्या स्लीपर प्रवासी बसेस आणि शालेय विद्यर्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसमधल्या दुर्घटना टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल. आतापर्यंत केवळ इंजिनातच अग्निशमन व्यवस्था होती.

या नव्या तंत्रज्ञानाविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता करत, हे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांनी डीआरडीओ चे आभार मानले.  

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश यांनी वैज्ञानिकांच्या चमूचे कौतुक केले आहे.

 

* * *

M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671484) Visitor Counter : 168