सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
अरुणाचल प्रदेशचे शालेय विद्यार्थी घालणार खादीचे फेस मास्क
Posted On:
09 NOV 2020 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
कोविड-19 मुळे देशभरात लागू असलेल्या टाळेबंदीच्या दीर्घ विरामानंतर पुन्हा शाळेत जाणारे अरुणाचल प्रदेशचे हजारो विद्यार्थी खादी चे तिरंगी मास्क लावून शाळेत येणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने, या विद्यार्थ्यांसाठी अरुणाचल प्रदेश सरकारला 60 हजार उच्च दर्जाचे खादीचे मास्क पुरवले आहेत. येत्या 16 नोव्हेंबरपासून इथल्या शाळा सुरु होणार आहेत.

पहिल्यांदाच ईशान्य भारतातील एका राज्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्क खरेदीची मागणी नोंदवल्या मुळे या मागणीला विशेष महत्व आहे. 3 नोव्हेंबरला ही ऑर्डर देण्यात आली आणि त्यानंतर केवळ सहा दिवसांत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आवश्यक तेवढ्या मास्कचा पुरवठा केला. यासाठीची घाई लक्षात घेत, माल वेळेवर पोचवण्यासाठी आयोगाने तो विमानाने पाठवला.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दोन स्तर असलेले, तिरंगी सुती मास्क बनवले असून त्यावर केवीआयसीचा अर्थात आयोगाचा लोगोही आहे. तिरंगी मास्कचा उद्देश, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करणे हा आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हे मास्क बनवण्यासाठी दोनदा पिळलेल्या धाग्यापासून बनवण्यात आलेले कापड वापरले आहे, जेणेकरुन हे कापड 70 टक्के आर्द्रता शोषून घेईल आणि त्यातून श्वास घेणेही सोयीचे आहे. त्वचेसाठी अनुकूल आणि दीर्घकाळ वापरता येणारे हे मास्क असून धुतल्यावर त्यांचा वारंवार वापर करता येईल.
“अरुणाचल प्रदेश सरकारने येत्या 16 नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच, 60 हजार मास्कची ऑर्डर देण्यात आली होती,” असे सरकारने म्हटले आहे.
हे मास्क विद्यार्थ्यांसाठी होते आणि ते 16 तारखेच्या आत देणे आवश्यक होते, या विचाराने केवीआयसीने ही ऑर्डर प्राधान्याने पूर्ण केली, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळणे ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट होती आणि . आम्ही अत्यंत उत्तम दर्जाचे मास्क केवळ 6 दिवसांत तयार करुन दिले आहेत, असेही सक्सेना म्हणाले
गेल्या सहा महिन्यात, म्हणजे एप्रिलपासून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 23 लाख फेस मास्क विकले आहेत. उत्तम दर्जाच्या आणि आरामदायी अशा या मास्कना मोठी मागणी आहे. इंडियन रेड क्रॉस संघटनेने 12 लाख 30 हजार फेस मास्कची ऑर्डर दिली होती.त्याशिवाय, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, इतर अनेक राज्य सरकारची कार्यालये आणि केंद्रीय मंत्रालये तसेच सार्वजनिक वितरण कंपन्या यांनीही मास्क साठी आयोगाला ऑर्डर दिल्या आहेत.
* * *
JPS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671431)