ऊर्जा मंत्रालय

एनटीपीसीकडून कार्यविविधता आणून भविष्याचे उत्तम नियोजन - केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह


एनटीपीसीचा 46वा स्थापनादिन साजरा; उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्वाची 45 वर्ष पूर्ण

Posted On: 07 NOV 2020 8:38PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसीने जबाबदार काॅर्पोरेट म्हणून आपल्या कामामध्ये विविधता आणून भविष्याचे उत्तमप्रकारे नियोजन केले आहे. तसेच एनटीपीसी पर्यावरणविषयक जबाबदारी पाळण्यासाठी कटिबद्ध आहे, याची साक्ष नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये क्षमता वृद्धीसाठी महामंडळाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे पटते, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार) आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर के सिंह यांनी केले.

भारतामधील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादक महामंडळ म्हणजे एनटीपीसी आहे. या संस्थेच्या 46 व्या स्थापनादिन कार्यक्रमामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून सिंह यांनी एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन केले.

ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत एनटीपीसीचे कार्य चालते. स्थापना दिनानिमित्त सिंह यांनी महामंडळाच्या सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. यावेळी सिंह म्हणाले, ‘‘देशामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही आपल्या कार्याचे महत्व ओळखून एनटीपीसीने देशाला अखंड वीजपुरवठा सुनिश्चित केला. भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी असल्यामुळे आता एनटीपीसीला जागतिक स्तरावर सर्वाधिक वीज उत्पादक बनण्याचा ध्यास लागला पाहिजे आणि तसे प्रयत्नही केले पाहिजेत. कंपनीचा पाया भक्कम आहे, इतक्या वर्षात अशा मजबूत पायामुळेच एनटीपीसीचा प्रचंड व्याप सातत्याने वाढत आहे.’’

यावेळी बोलताना ऊर्जा सचिव संजीव नंदन सहाय यांनी एनटीपीसीच्या 45 वर्षांच्या वैभवशाली, उत्कृष्ट वाटचालीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी सहाय म्हणाले, ‘‘एनटीपीसी काळाच्याबरोबर स्वतःचाच नव्याने शोध घेवून, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून पुढची वाटचाल यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे, याचा मला आनंद आहे.‘‘

याप्रसंगी एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग म्हणाले, ‘‘एनटीपीसीची स्थापना 1975 मध्ये झाली. त्यावेळेपासून या कंपनीच्या वाढीसाठी हातभार लावणा-या सर्वांचे कौतुक करतो आणि त्यांना या कामाचे श्रेय देऊन या यशासाठी एनटीपीसी परिवाराचे यावेळी अभिनंदन करतो.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही या आर्थिक वर्षामध्ये आम्ही 1784 मेगावॅट वीज निर्मितीची भर घातली आणि महामारीच्या काळात संपूर्ण देशाला अखंडित वीज पुरवठा केला. 2025 पर्यंत आम्ही एक लाख मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नियोजन करीत आहोत. त्याचबरोबर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचे काम करताना विविधतापूर्ण वितरण आणि कार्यविस्ताराची योजनाही आम्ही आखली आहे.’’

यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील 880 मेगावॅट क्षमतेच्या एनटीपीसी लारा प्रकल्पातल्या दुस-या विभागाच्या व्यावसायिक कार्याला प्रारंभ करण्यात येत असल्याची घोषणा केली.

-----

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671092) Visitor Counter : 136