माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दूरचित्रवाणी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने केली समिती स्थापन

Posted On: 04 NOV 2020 9:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई : 4 नोव्हेंबर 2020

 

केंद्र सरकारने भारतातील  दूरचित्रवाणी रेटिंग एजन्सीविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. 

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेम्पत्ती यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत चार सदस्य आहेत. यात डॉ शलभ, सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक, गणित आणि सांख्यिकी विभाग,आयआयटी कानपूर, डॉ राजकुमार उपाध्याय, कार्यकारी संचालक, सी-डॉट आणि प्रा. पुलक घोष, सार्वजनिक धोरणविषयक केंद्र, अशी या सदस्यांची नावे आहेत.

एक सशक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी रेटिंग व्यवस्थातयार करण्यासाठी, आवश्यक असल्यास, सध्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल सुचवण्याविषयी, शिफारस करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.

"सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर होत असलेल्या कार्यान्वयनाचे अध्ययन केल्यानंतर, या मार्गदर्शक सूचनांमध्ये नव्याने बदल करण्याची गरज भासते आहे. विशेषतः भारतीय दूरसंचार नियामक संस्था-ट्रायने अलीकडेच केलेल्या शिफारसी, ज्यात, तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरण करुन व्यवस्थेत बदल करणे आणि रेटिंग प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करत ती अधिक सुदृढ करण्याविषयीची गरज ट्रायने व्यक्त केली आहे. या आधारावर समिती स्थापन करण्यात आली असून, गेल्या काही काळात बदललेल्या, भारतातील दूरचित्रवाणी रेटिंग व्यवस्थेविषयीच्या सर्व पैलूंचा ही समिती अभ्यास करेल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

ही समिती, सध्याच्या रेटिंग व्यवस्थेला अद्ययावत करेल, ट्रायने वेळोवेळी केलेल्या शिफारसींचा आणि दूरचित्रवाणी उदयोगातील सद्यपरिस्थितीचा अभ्यास करेल, तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्व हितसंबंधी गटांच्या गरजा समजून घेत, त्यानुसार एक सशक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी रेटिंग व्यवस्था तयार करण्यासाठी आवश्यक त्या बदलांची शिफारस करेल, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

---

R.Tidake/M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670224) Visitor Counter : 231