सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग व्यक्तींना आभासी मंचावरून मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यासाठी डीईपीडब्लूडी विभागाचे उद्या उत्तर मुंबईत एडीआयपी शिबीर
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2020 8:40PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, यांच्या हस्ते उद्या, व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उत्तर मुंबईत, कांदिवली इथे दिव्यांग व्यक्तींना मदत आणि मोफत सहाय्यक उपकरणे देण्यासाठीच्या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. खासदार गोपाळ शेट्टी पोईसर येथून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. कोरोना संसर्गाच्या काळात दिव्यांगाची विशेष काळजी घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे, त्यानुसार दिव्यांगांना या काळातही निर्वेधपणे मदत पोचवली जात आहे. याच मलिकेत, कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत, हे शिबीर आयोजित केले जाणार आहे.
उत्तर मुंबईतल्या सहा ठिकाणच्या 1035 दिव्यांगाना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टप्याटप्याने 87.96 लाख रुपये मूल्याची 1740 उपकरणे देण्यात आली होती. यात दहिसर, कांदिवली (पूर्व आणि पश्चिम), बोरीवली (पूर्व आणि पश्चिम) आणि पोईसर जिमखाना या भागांचा समावेश आहे.
भारतीय कृत्रिम पाय उत्पादक महामंडळ (ALIMCO), कानपूर यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या (DEPwD), सहकार्याने हे शिबीर आयोजित केले आहे. नव्या प्रमाणित कार्यान्वयन पद्धतींनुसार हे शिबीर घेतले जाईल.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी, 150 दिव्यांग व्यक्तींना सहायक उपकरणे दिली जातील, ज्यात 21 तीन चाकी मोटारसायकलींचाही समावेश आहे. उत्तर मुंबईत या शिबिरात एकूण 33 तीनचाकी मोटारसायकलींचे वितरण होणार असून त्यासाठी, उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी आपल्या खासदार निधीतून 3,96,000 रुपये दिले आहेत. या एका मोटारसायकलची किंमत 37000 रुपये इतकी आहे. पात्र लाभार्थ्यांना ती घेण्यासाठी ADIP योजनेअंतर्गत 25000 रुपये अनुदान मिळते, उर्वरित 12000 (प्रती मोटार सायकल) मदत खासदार निधीतून केली जाते.
या शिबिरातून गर्दीमुळे कोविड संक्रमण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन केले जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीची थर्मल तपासणी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करणे, तसेच व्यावसायिकांना पीपीई किट्सचा वापर अनिवार्य केला जाणार आहे. शिबिराच्या जागेला वारंवार सॅनिटाईज करण्याची पूर्ण सुविधा करण्यात आली आहे. बसण्याची व्यवस्था करतांनाही शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. एका वेळी केवळ 40 लाभार्थ्यांना शिबिरस्थळी प्रवेश दिला जाईल.
या शिबिरात, टप्प्याटप्याने उपकरणांचे वितरण केले जाणार आहे. यात 33 तीन चाकी मोटार सायकली, 75 तीन चाकी मानवचलित सायकली,169 व्हील चेअर्स, 12 सीपी चेअर्स, 178 कुबड्या, अंध व्यक्तींसाठी 116 आधारकाठ्या, 136 स्मार्ट केन्स, 23 फोल्डिंग केन्स, 5 डेझी प्लेअर, 2 ब्रेल किट्स, 11 रोलाटोर, 6 कुष्ठरोग प्रथमोपचार किट्स आणि 102 कृत्रिम पाय आणि हात अशी मदत दिली जाणार आहे.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1670213)
आगंतुक पटल : 195