पंतप्रधान कार्यालय

भारत ऊर्जा मंचाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन

Posted On: 26 OCT 2020 10:26PM by PIB Mumbai

 

अमेरिकेचे ऊर्जा मंत्री महामहीम, डॅन ब्रॉउलेट -

सौदी अरेबियाचे ऊर्जा  मंत्री, राजपुत्र अब्दुल अझीझ,

आयएचएस मार्कीटचे उपाध्यक्ष, डॉ डॅनियल यर्जिन,

माझे सहकारी, धर्मेद्र प्रधान,

जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू उद्योग क्षेत्रातले धुरीण,

 

नमस्ते,

चौथ्या भारत ऊर्जा  मंच सेरा सप्ताहाच्या कार्यक्रमात आपणा सर्वाना पाहून आनंद होत आहे. ऊर्जा  क्षेत्रातल्या योगदानासाठी मी  डॉ डॅनियल यर्जिन यांचे अभिनंदन करतो. द न्यू  मॅप या त्यांच्या नुकत्याच आलेल्या पुस्तकासाठीही मी त्यांचे अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

बदलत्या जागतिक काळात भारताचे ऊर्जा  भवितव्य ही या वर्षीची संकल्पना आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की,भारत ऊर्जेने समृध्द आहे! भारताचे ऊर्जाविषयक भवितव्य उज्वल आणि सुरक्षित आहे. या संदर्भात मी  विस्ताराने सांगतो.

 

मित्रहो,

हे वर्ष ऊर्जा  क्षेत्रासाठी आव्हानात्मक वर्ष राहिले आहे. ऊर्जेच्या  मागणीत सुमारे एक तृतीयांश घट झाली. किमतीबाबत अस्थिरता राहिली. गुंतवणुकीच्या निर्णयावर परिणाम झाला. येत्या आणखी काही वर्षामधेही ऊर्जेच्या जागतिक मागणीत घटच राहील असा अंदाज आघाडीच्या जागतिक संस्थांनी वर्तवला आहे. मात्र या एजन्सीनी उर्जेचा आघाडीचा ग्राहक म्हणून भारत पुढे येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. दीर्घावधीत भारत आपला  ऊर्जेचा वापर  सुमारे दुप्पट करण्याच्या तयारीत आहे.

 

मित्रहो,

अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये आपल्याला  चैतन्य दिसून येईल. उदाहरणादाखल हवाई वाहतूक क्षेत्र घेऊया. देशांतर्गत हवाई वाहतूकीच्या संदर्भात भारत म्हणजे तिसरी मोठी आणि वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. भारतीय वाहतूकदार त्यांचा ताफा 600 वरून 2024 पर्यंत 1200 पर्यंत वाढवतील असा अंदाज आहे. ही मोठी झेप आहे!

 

मित्रहो,

ऊर्जा  ही माफक दरात आणि खात्रीशीर असली पाहिजे असे भारत मानतो. सामाजिक- आर्थिक परिवर्तन घडल्यानंतरच हे शक्य होईल. ऊर्जा  क्षेत्र म्हणजे जनतेला सबल करणारे   आणि जीवनमान अधिक सुकर करणारे क्षेत्र म्हणून आम्ही या क्षेत्राकडे पाहतो. भारताने  शंभर टक्के विद्युतीकरण साध्य केले आहे. एलपीजी जाळे  अधिक व्यापक झाले आहे. या बदलामुळे विशेषकरून आमच्या ग्रामीण भागांना, मध्यम वर्गाला आणि महिलांना त्याचा लाभ झाला आहे.

 

मित्रहो,

भारताच्या  ऊर्जा  योजनेचे उद्दिष्ट ऊर्जा  विषयक न्याय सुनिश्चित करणे हे आहे. शाश्वत विकासाप्रती आमच्या जागतिक कटीबद्धतेचे  पालन करतानाच हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. म्हणजेच भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिक ऊर्जा  मात्र कार्बन उत्सर्जन कमी राखत.

 

मित्रहो,

आमचे ऊर्जा  क्षेत्र विकासाभिमुख,उद्योग स्नेही आणि पर्यावरणाचे भान ठेवणारे आहे. म्हणूनच नविकरणीय ऊर्जेच्या स्त्रोताना चालना देणाऱ्या राष्ट्रामध्ये भारत सर्वात सक्रीय आहे.

 

मित्रहो,

गेल्या सहा वर्षात 36 कोटी पेक्षा जास्त एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. या बल्बच्या किमतीही दहापटीने कमी झाल्या. गेल्या सहा वर्षात 1.1 कोटी स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्यात आले. यामुळे वर्षाला सुमारे 60 अब्ज युनिट विजेची बचत सुनिश्चित  झाली आहे.  हरित वायू उत्सर्जन कमी करण्याच्या कार्यक्रमा अंतर्गत वर्षाला 4.5 कोटी टन कार्बनडायऑक्सईड उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासह  वर्षाला 24,000 कोटी किंवा 240 अब्ज रुपयांची बचत  आम्ही केली आहे.  यासारख्या उपक्रमांमुळे भारत हे स्वच्छ ऊर्जा  गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक उगवती बाजारपेठ ठरल्याचे अहवालात म्हटले आहे.

 

मित्रहो,

भारत सदैव जागतिक कल्याण ध्यानात घेऊनच काम करत राहील.जागतिक समुदायाला दिलेली प्रतिबद्धता  पूर्ण करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. नविकरणीय ऊर्जा  स्थापित क्षमता 2022 पर्यंत 175 गिगावॅटने वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत हे उद्दिष्ट वाढवून 450 गिगावॅटपर्यंत करण्यात आले आहे. औद्योगिकीकरण झालेल्या उर्वरित जगापेक्षा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. हवामान बदलाच्या दुष्परिणामाविरोधात आमचा लढा जारी राहील.

 

मित्रहो,

गेल्या सहा वर्षात भारतात सुधारणांचा प्रवास अतिशय वेगाने सुरु आहे. ऊर्जा  क्षेत्रात अनेक ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या. फेब्रुवारी 2019 मध्ये, शोध आणि परवाना धोरणात सुधारणा करण्यात आली. लक्ष महसूलावरून उत्पादन वृद्धीवर वळवण्यात आले. अधिक पारदर्शकता आणि प्रक्रिया सुटसुटीत करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

2025 पर्यंत  तेल शुद्धीकरण क्षमतेत  250 पासून 400 दशलक्ष मेट्रिक टन वृद्धी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

देशांतर्गत गॅस उत्पादनात वाढ करण्याला सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे.एक देशएक ग्रीड साध्य करून गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे.

 

मित्रहो,

जगभरात कच्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात  वरखाली होत राहिल्या आहेत. विश्वासार्ह किमत प्रणालीकडे वळण्याची आपल्याला गरज आहे. तेल आणि गॅस या  दोन्हीसाठी पारदर्शी आणि लवचिक बाजारपेठेसाठी आपल्याला काम करायचे आहे.

 

मित्रहो,

नैसर्गिक वायूचे  देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि बाजारभाव  शोधात एकसमानता आणण्यासाठी  या महिन्याच्या सुरवातीला आम्ही नैसर्गिक वायू विपणन सुधारणा जाहीर केल्या.

त्यामुळे नैसर्गिक वायूच्या विक्रीत ई बोली द्वारे अधिक विपणन स्वातंत्र्य मिळणार आहे. या वर्षीच्या जून मध्ये भारताचा पहिला स्वयंचलित राष्ट्रीय  स्तरावरचा गॅस व्यापार मंच सुरु करण्यात आला. वायूचा  बाजार भाव शोधण्यासाठी  मानक पद्धती यामध्ये निश्चित करण्यात आली आहे.

 

मित्रहो,

'आत्मनिर्भर भारत’  हे उद्दिष्ट घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. स्वयंपूर्ण भारत, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अधिक बळ देणारा ठरेल. आमच्या प्रयत्नांच्या केंद्र स्थानी ऊर्जा  सुरक्षितता आहे. आमच्या कार्याची सकारात्मक फलनिष्पत्ती पाहून आपल्याला आनंद होईल. या आव्हानात्मक काळात आम्ही तेल आणि गॅस मूल्य साखळी द्वारे गुंतवणूक अनुभवली आहे. इतर क्षेत्रातही अशीच चिन्हे आम्हाला दिसून येत आहेत.

 

मित्रहो,

भारताच्या शेजारी सर्व प्रथमया धोरणाचा भाग म्हणून परस्परांच्या हितासाठी आम्ही  शेजारी राष्ट्रांशी ऊर्जा  कॉरीडॉर आम्ही विकसित करत आहोत.

 

मित्रहो,

सूर्याची किरणे मानवाच्या प्रगतीचा प्रवास उजळतात. सूर्य देवतेच्या रथाला असलेल्या सात अश्वाप्रमाणे भारताच्या ऊर्जा  नकाशाची सात प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ती याप्रमाणे-

- गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वळण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देणे

- जीवाश्म इंधन विशेष करून पेट्रोलियम आणि कोळसा यांचा  स्वच्छ  वापर

- जैव इंधनासाठी देशांतर्गत स्त्रोतांवर अधिक निर्भरता

- 2030 पर्यंत नविकरणीय उर्जेसाठी 450 गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करणे.

- विजेचे योगदान वाढवणे

- हायड्रोजनसह नव्याने समोर येणाऱ्या इंधनाकडे वळणे

- सर्व ऊर्जा  प्रणालीत डिजिटल नवोन्मेश

गेल्या सहा वर्षात आणण्यात आलेल्या जोमदार ऊर्जा  धोरणात सातत्य राखले जाईल.

 

मित्रहो,

भारत ऊर्जा  मंच- सेरा सप्ताह, उद्योग, सरकार आणि समाज यांच्यातला महत्वाचा मंच म्हणून काम करत आहे. उत्तम ऊर्जा  भवितव्यासाठी या परिषदेत फलदायी चर्चा होईल याचा मला विश्वास आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की भारताची ऊर्जा  संपूर्ण जगाला चैतन्य देईल.  धन्यवाद.

पुन्हा आभार.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667697) Visitor Counter : 232