संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे प्रतिनिधी मार्क एस्पर यांच्यामध्ये व्दिपक्षीय प्रतिनिधीमंडळ स्तरावरील बैठक; उभय देशांच्यावतीने बीईसीए करारावर स्वाक्षरी करणार

Posted On: 26 OCT 2020 8:56PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री डॉ. मार्क टी. इस्पर यांच्या दरम्यान आज मंत्रिस्तरीय बैठक झाली. नवी दिल्लीतल्या साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये उभय नेत्यांनी व्दिपक्षीय संरक्षण सहकार्य, सुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि माहितीचे सामायिकीकरण या विषयांवर चर्चा केली. यामध्ये संरक्षण व्यापार आणि औद्योगिक विषय यांच्यावरही चर्चा होऊन व्दिपक्षीय सहकार्य असेच पुढे नेण्याविषयी बोलणे झाले.

सशस्त्र दलाकडून होत असलेल्या कार्याबद्दल उभय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. संयुक्त स्तरावर सेवा देण्यासाठी नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी यावेळी उभय नेत्यांनी केली. संपूर्ण जगभर सध्या कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही, विशेषतः लष्करी क्षेत्रात सहकार्यासाठी संवाद निरंतर सुरू राहण्यावर यावेळी भर देण्यात आला. यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याबद्दलही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली.

बीईसीए म्हणजेच संरक्षणविषयक भू-अवकाशीय आदान-प्रदान आणि सामंजस्य करारावर लवकरच स्वाक्षरी होणार असल्याबद्दल यावेळी भारत आणि अमेरिकेच्या मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मलाबार 2020 कवायतीमध्ये ऑस्ट्रेलियाचाही सहभाग असणार आहे, याबद्दल अमेरिकेच्या सरंक्षण मंत्र्यांनी स्वागत केले.

भारतामध्ये संरक्षण उद्योगात गुंतवणुकीसाठी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सरकारने सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. संरक्षण उद्योग कंपन्यांसाठी भारताने उदार धोरण तयार केले असून देशात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी अमेरिकन  कंपन्यांना त्यांनी आमंत्रित केले.

-------

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667671) Visitor Counter : 259