संरक्षण मंत्रालय

देशी बनावटीची एएसडब्ल्यू कॉर्वेट ‘कवरट्टी’ चे विशाखापट्टणम येथे जलावतरण होणार

Posted On: 21 OCT 2020 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

प्रोजेक्ट 28 (कमोर्ता श्रेणी ) अंतर्गत चार स्वदेशी पाणबुडी रोधक युद्धनौका (एएसडब्ल्यू) पैकी  ‘आयएनएस कवरट्टी’ ही   शेवटची युद्धनौका आहे. लष्कर प्रमुख  जनरल मनोज मुकुंद नरवणे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी हे  गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020 रोजी, विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत या युद्धनौकेचे जलावतरण करतील. 

एक मजबूत एएसडब्ल्यू कॉर्वेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कवराटीची रचना  भारतीय नौदलाच्या  नेव्हल डिझाईन संचालनालयाने (डीएनडी) केली आहे, आणि कोलकाताच्या  गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) यांनी त्याची बांधणी केली आहे . स्वदेशीकरणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची भारतीय  नौदल, जीआरएसई आणि देशाची वाढती क्षमता यातून दिसून येते . या जहाजासाठी  90% देशी सामग्री वापरली असून सुपरस्ट्रक्चरसाठी कार्बन कंपोझिटचा वापर करून भारतीय जहाज बांधणीत कौतुकास्पद यश मिळवले आहे. जहाजाचा शस्त्रे आणि सेन्सर विभाग पूर्णपणे स्वदेशी आहे आणि ते या क्षेत्रात देशाची  वाढती क्षमता दाखवते.

कवरट्टीकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सॉर विभाग असून पाणबुडी शोधून त्यावर कारवाई करण्यास सक्षम आहे. पाणबुडीविरोधी युद्धनौकेच्या क्षमतेव्यतिरिक्त, जहाजात एक विश्वासार्ह स्वसंरक्षण क्षमता आणि लांब पल्ल्याच्या तैनातीसाठी चांगली चिकाटी देखील आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जहाजावर बसवलेल्या सर्व यंत्रणांच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या असून  नौकेला यानंतर  नौदलात नेण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीमुळे लागू करण्यात  आलेले निर्बंध विचारात घेता  ही  एक प्रशंसनीय कामगिरी आहे. कवरट्टीला ताफ्यात  समाविष्ट केल्यामुळे भारतीय नौदलाची सज्जता वाढेल.

कवरट्टीने तिचे नाव तत्कालीन  आयएनएस  कवराटी वरून घेतले आहे जी  अर्नाळा श्रेणीतील क्षेपणास्त्र जहाज होते. 1971  मध्ये बांगलादेश मुक्तीच्या समर्थनार्थ  कामगिरी बजावली होती. 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666601) Visitor Counter : 253