आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक बँक -आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वार्षिक बैठक 2020 ला संबोधित केले


“कोविड महामारीने अडथळे निर्माण केले मात्र आपल्याला अधिक लवचिक आणि भविष्यासाठी तयार राहण्यासाठी एक उत्तम धडा देखील दिला ”

"महामारीने आपल्याला शिकवले की, सज्जतेसाठी त्याच्या प्रभावाच्या अगदी थोडासा खर्च होतो, मात्र या गुंतवणूकीवरील परतावा घसघशीत असतो."

Posted On: 21 OCT 2020 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी  आज नवी  दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जागतिक बँक-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला संबोधित केले.  मानवी भांडवलाच्या माध्यमातून सर्वांसाठी  दक्षिण आशियाई शतक खुले करणे आणि कोविड -19  लस आणि प्राथमिक आरोग्य सेवा वितरण प्रणालीत गुंतवणूक करणे ही या बैठकीची संकल्पना होती.

महामारीच्या काळात  भारताने बजावलेल्या भूमिकेवर भर देताना डॉ हर्ष वर्धन म्हणाले, भारताच्या प्रतिसादाच्या सर्वसमावेशकतेमुळे  महामारीचे व्यवस्थापन शक्य झाले आहे. कोविड महामारीने सामान्य जीवनात अडथळे निर्माण केले मात्र  आपल्या सर्वांना अधिक लवचिक  आणि भविष्यासाठी तयार राहण्याची  एक वेगळी शिकवण देखील दिली.  हे प्रयत्न सर्व हितधारकांच्या वचनबद्धतेचा परिणाम  आहेत.जागतिक महामारीमुळे उद्‌भवलेल्या आव्हानांचे  व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण समाज, संपूर्ण सरकार दृष्टिकोनासह सक्रिय  प्रतिसादाचा भारत अवलंब  करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

कोविड -19  व्यवस्थापनात भारताच्या खासगी क्षेत्राच्या मदतीचे कौतुक करताना ते म्हणाले, खासगी क्षेत्राच्या नाविन्य, क्षमता आणि चपळाईने कोविडशी मोठ्या प्रमाणात लढा देण्याच्या प्रयत्नांना मदत झाली.  पीपीई, एन 95 मास्कऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि नैदानिक चाचण्या किट जलद गतीने विकसित करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झालीमार्च 2020 मध्ये केवळ एकच प्रयोगशाळा होती, आज ही संख्या 2000 वर गेली असून यापैकी निम्म्या  खाजगी क्षेत्रातील आहेत.  समर्पित आयसीयू सुविधा आणि विलगीकरण केंद्रांच्या बाबतीतही असेच आहे.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, महामारीमुळे जगासमोर निर्माण झालेल्या अभूतपूर्व  आव्हानांमुळे  कोविड व्यवस्थापनाच्या प्रत्येक बाबींमध्ये भारत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहे - आरोग्यसेतु ऍप्प आणि आयटीआयएएचएस,या  सेल्युलर आधारित  ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा उपयोग देखरेख  ठेवण्यासाठी आणि  संभाव्य क्लस्टरची ओळख पटवण्यासाठी केला गेला तसेच  चाचणीसाठी आरटी-पीसीआर ॲप,दाखल रूग्णांच्या माहितीचे  व्यवस्थापन करण्यासाठी सुविधा अ‍ॅप,विकसित करण्यात आले.

ते पुढे म्हणाले, आरोग्यशास्त्र ऍपचा वापर सध्या 170  दशलक्षाहून अधिक भारतीयांनी केला आहे आणि हा जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेला अ‍ॅप बनला आहे. बिगर कोविड  आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी वेब-आधारित दूरध्वनी-सल्ला सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक  दूरध्वनी-सल्ले  घेण्यात आले आहेत आणि बरेच लोक याचा लाभ घेत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व देशांना परवडणारी आरोग्य सेवा पोचवण्याची  भारताची बांधिलकी आणि महामारीचा सामना करण्यासाठी भारताची तयारी याबद्दल सविस्तर माहिती दिली.  ते म्हणाले, आम्ही आत्मनिर्भर भारत अभियान (सेल्फ रिलायन्स इंडिया प्रोग्राम) अंतर्गत भारताच्या जीडीपीच्या 10% म्हणजे 272 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विशेष आर्थिक आणि व्यापक पॅकेज आणले, ज्यामध्ये भविष्यातील साथीच्या आजारासाठी भारताला तयार करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सुधारणांमध्ये वाढीव  गुंतवणूकीचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी निदर्शनाला आणून दिले की कोविड 19 साठी  सध्याचा संशोधन कार्यक्रम  परवडणारी लस उपलब्ध करुन देणे तसेच त्याचे योग्य वितरण सुनिश्चित करणे हा आहे. सध्या, विदेशी / देशांतर्गत संशोधन संस्थांच्या सहकार्याने तीन भारतीय औषध निर्मिती कंपन्या लसीच्या जलद गतीने चाचण्या करत आहेत.

ते पुढे म्हणाले, भारताला सर्वात मोठा फायदा हा आहे की आमच्याकडे  आधीपासूनच एक मजबूत लसीकरण कार्यक्रम आहे. आम्ही सध्या जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहोत, आणि वार्षिक सुमारे 27 दशलक्ष नवजात बालकांचे  लसीकरण उद्दिष्ट ठेवले आहे.  सार्वत्रिक  लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत,आमच्याकडे  शेवटच्या व्यक्तीपर्यंत  लसींचा पुरवठा, साठवण आणि वितरण यासाठी प्रस्थापित पायाभूत सुविधा आहे, जिथे आम्ही दरवर्षी मुलांना सुमारे 600 दशलक्ष डोस देतो. 330 दशलक्ष मुलांना सामावून घेणारी जगातील सर्वात मोठी गोवर-रुबेला मोहिम आम्ही राबवतो.

डॉ. हर्ष वर्धन यांनी भारत सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आणि आश्वासन दिले की ही लस शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने संशोधन आणि उत्पादन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली  आम्ही लस प्रशासनावर एक राष्ट्रीय तज्ज्ञ गट स्थापन केला आहे जो सर्व बाबींवर काम करत आहे तसेच ग्रामीण व दुर्गम भागात लसींचे वितरण करण्याच्या नाविन्यपूर्ण रचना आखत आहे. कोविड -19  विरोधात लढा देण्यात   खासकरुन जेव्हा संपूर्ण जगासाठी मोठ्या प्रमाणात लस बनवण्याची वेळ येते, तेव्हा भारताची भूमिका महत्वपूर्ण असेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666571) Visitor Counter : 204