रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झोजिला पासवरील बोगद्यासाठीचा पहिला स्फोट;


प्रामाणिक प्रयत्नांच्या मदतीने आपण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो: गडकरी

श्रीनगर खोरे आणि लेह दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.1 च्या माध्यमातून बाराही महिने प्रवासाची मिळणार खात्री

बोगद्याच्या आराखड्याच्या पुनर्रचनेमुळे खर्चात 4000 कोटी रुपयांची आणि प्रवासासाठीच्या वेळेत 4 तासांची बचत

Posted On: 15 OCT 2020 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म, लघू तसेच मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी एका समारंभात जम्मू-काश्मीरमधील झोजिला बोगदयासाठीचा पहिला स्फोट घडवून आणला. या बोगद्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर, श्रीनगर खोरे आणि लेह (लडाख पठार) यादरम्यान वर्षातील बाराही महिने अखंड वाहतूक सुरु राहू शकणार आहे. हा बोगदा झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये (आताचे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश) सर्वंकष आर्थिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेला चालना मिळेल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 द्वारे, श्रीनगर आणि लेहला द्रास आणि कारगिलमार्गे जोडणाऱ्या झोजिला पास या रस्त्यावरची वाहतूक, वर्षाचे फक्त सहा महिने सुरु असते. हा रस्ता वाहनाने वाहनाने जाण्यासाठीचा जगातील हा सर्वात धोकादायक रस्ता आहे. त्याच्या खालून जाणार असलेल्या या 14.15 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाचा प्रकल्प भौगोलिक दृष्ट्या संवेदनशील देखील आहे असे गडकरी म्हणाले. हा आशियातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा असून यामुळे या प्रदेशातील सामाजिक- आर्थिक चित्र सुधारणार आहे. या बोगद्याच्या आराखड्याची पुनर्रचना केल्यानंतर 4000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. प्रामाणिक प्रयत्नांच्या मदतीने आपण आपल्या देशाचा कमी खर्चात विकास घडवून आणू शकतो असे ते म्हणाले. वेळापत्रकानुसार या बोगद्याच्या कामाला सहा वर्ष लागणार असली तरी याच सरकारच्या कार्यकाळात बोगदा पूर्ण होऊन त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

बोगद्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये लेह तसेच जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, मुख्य सचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी असतील असे ते म्हणाले.

जम्मू- काश्मीरमध्ये रस्त्यांवरील 7 बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काझीगुंड आणि बनिहाल दरम्यानचा 8450 मीटर लांबीचा दुहेरी बोगदा येत्या मार्चपर्यंत बांधून पूर्ण होईल. त्यानंतर रामबन आणि बनिहाल दरम्यान 2968 मीटर लांबीचे सहा एकपदरी बोगदे बांधण्याची कामे डिसेंबर 2021 मध्ये संपतील. तसेच खिलानी आणि किश्तवाड दरम्यानचा 450 मीटर लांबीचा बोगदा जून 2022 पर्यंत पूर्ण होईल.

चेन्नई-अनंतनाग बोगदा, सिंथन पासवरील बोगदा, खाख्लानी बायपास बोगदा तसेच छत्रू-अनंतनाग बोगदा यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाले असून त्यांच्या निविदा काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्ली आणि कटरा या महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या 650 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-कटरा हरित द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी भूमी अधिग्रहणाचे काम सुरु असून प्रत्यक्ष कामाला येत्या डिसेंबरमध्ये सुरुवात होईल अशी माहिती गडकरी यांनी दिली. या महामार्गावरून वाहने घेऊन जाणाऱ्या चालकांना हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार असून हा महामार्ग अमृतसरसह अनेक गुरुद्वारांना जोडत, जम्मू महामार्गाशी देखील जोडला जाईल, यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंची उत्तम सोय होईल असे त्यांनी सांगितले.

जम्मू-उधमपूर चौपदरी रस्त्याचे तसेच श्रीनगर-बनिहाल चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उधमपूर-रामबन मार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, रामबन-बनिहाल रस्ता पुढच्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी दिली.

झोजिला पास रस्त्यावरून प्रवासाचा अनुभव असल्यामुळे या भागातील जनतेच्या समस्यांशी उत्तमरीत्या परिचित असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ.व्ही.के.सिंग यांनी सांगितले. नव्या बोगद्यामुळे लडाख आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासानांमध्ये समन्वय सुधारेल असे त्यांनी सांगितले.   

 

S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664825) Visitor Counter : 180