सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी
Posted On:
12 OCT 2020 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
विजयाराजे यांनी आपल्या पुस्तकामध्ये माझा परिचयात्मक उल्लेख गुजरातमधील ‘युवा नेता’ असा केला आहे, असा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, आज इतक्या वर्षांनंतर आपण देशाचे प्रधान सेवक म्हणून कार्यरत आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताला योग्य दिशेने नेण्यासाठी नेतृत्व करणा-यांपैकी एक राजमाता विजयाराजे शिंदे होत्या. त्या धडाडीने निर्णय घेणा-या आणि कुशल प्रशासक होत्या. भारतीय राजकारणाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्याच्या राजमाता साक्षीदार ठरल्या. मग त्यामध्ये परदेशी वस्त्रांची होळी करण्याचा काळ असो अथवा देशात जारी झालेल्या आणीबाणीचा काळ आणि राममंदिर जनआंदोलनाचा काळ असो, या सर्व महत्वापूर्ण घटनांच्या राजमाता विजयाराजे साक्षीदार होत्या. यामुळेच सध्याच्या पिढीला राजमाता यांच्या जीवनकार्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी एखाद्या विशिष्ट कुटुंबामध्ये जन्म घेणे आवश्यक नाही, अशी शिकवण आम्हाला राजमातांनी दिली, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाबद्दल प्रेम आणि लोकशाहीवादी विचारांनी घडलेला स्वभाव असला पाहिजे, असे राजमाता सांगत होत्या, विशेष म्हणजे हाच विचार, आदर्श त्यांनी स्वतःच्या जीवनात ठेवला होता, हे दिसून येते. राजमातांकडे हजारो कर्मचारी होते, भव्य राजवाडा होता आणि सर्वप्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्याकडे होत्या तरीही गरीबांच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्या सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्ध होत्या तसेच समाजाबरोबर सातत्याने संपर्कात होत्या. देशाच्या भविष्यासाठी त्यांनी आपले जीवन त्यागले होते. राजमाता या पदासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी त्या जगल्या नाहीत किंवा त्यांनी त्याचे राजकारणही कधी केले नाही.
राजमाता विजयाराजेंना अनेकदा विविध पदे स्वीकारण्यासाठी आग्रह करण्यात आला होता, परंतु अतिशय नम्रतेने त्यांनी पदांचा स्वीकार करणे नाकारले, अशी आठवण सांगून पंतप्रधान म्हणाले, एकदा अटलजी आणि अडवाणीजी यांनी त्यांना जनसंघाचे अध्यक्ष होण्याची विनंती केली होती. परंतु राजमाता यांनी आपल्याला कार्यकर्त्या म्हणून जनसंघामध्ये सेवा करणे पसंत असल्याचे नमूद केले होते.
राजमाता आपल्या बरोबर काम करणा-यांना अगदी नावानिशी ओळखत होत्या, आणि सहकारींविषयी भावनिक ऋणानुबंध जोडले गेल्यामुळे त्यांना प्रत्येकाच्या मनात स्थान होते. आदर असावा परंतु गर्व नसावा, हे राजकारणाचे महत्वाचे सूत्र आहे. राजमातांचे व्यक्तिमत्व अध्यात्मिक दृष्टीनेही महान होते, असेही मोदी यावेळी म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक प्रकारे बदल घडून आले आहेत. जनजागृती आणि जनआंदोलनामुळेच या मोहिमांना यश मिळणे शक्य झाले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी, राजमातांच्या आशीर्वादामुळे देश विकासाच्या मार्गावर प्रगती करीत असल्याचे अधोरेखित केले.
आज देशात नारीशक्ती सर्व क्षेत्रात अग्रगण्य असून प्रगती करीत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, महिला सक्षमीकरणाचे राजमातांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार जी पावले उचलत आहे, त्यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.
रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी लढा दिला, आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचे श्रीराम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, हा अद्भूत योगायोग म्हणावा लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशस्वीतेमुळे आपल्याला राजमातांच्या दूरदृष्टीप्रमाणे दृढ, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणाले, राजमाता विजयाराजे शिंदे म्हणजे जणू पारसाप्रमाणे होत्या. त्यांनी यावेळी राजामाता यांच्याविषयी आपल्याला आलेले व्यक्तिगत अनुभव सामायिक केले. कोणत्याही राजकीय महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी त्या कार्य करीत नव्हत्या तर विशिष्ट मूल्यांवर आधारित त्यांचे राजकारण होते. त्यांनी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी म्हणून आपल्या मूल्यांबरोबर कधीच तडजोड केली नाही. मूल्ये सोडून राजकारण करण्यास त्यांचा विरोध होता. माणसांना ज्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडे विपूलतेने होत्या. जर त्यांची इच्छा असती तर राजमाता आपले आयुष्य अगदी आरामात, सुखात व्यतित करू शकल्या असत्या, परंतु त्यांनी जनतेची सेवा करण्याचा मार्ग स्वीकारला.
या आभासी कार्यक्रमामध्ये विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या परिवारातील सदस्य मंडळी सहभागी झाले होते. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र सिंग यांनी पंतप्रधान आणि सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच कार्यक्रमाचे समन्वयन केले.
राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ, अर्थ मंत्रालयाच्यावतीने हे 100 रूपयाचे विशेष नाणे काढण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे दृश्यचित्रण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663781)
Visitor Counter : 145